सात्त्विक पद्धतीने चिरलेली भाजी ग्रहण केल्याने व्यक्तीला आध्यात्मिक लाभ होणे

आहार आणि आचार यासंबंधी अद्वितीय संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

यू.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. रूपेश रेडकर

‘भेंडीची भाजी बहुतेक सर्वांनाच, विशेष करून लहान मुलांना अतिशय आवडते. सर्वसाधारणपणे भेंडीची भाजी चिरतांना पारंपरिक पद्धतीने, म्हणजे लहान आकारात गोल चकत्या करतात; पण आजकाल भेंडी तिरकी किंवा उभी चिरण्याची पद्धत प्रचलित झाली आहे. ‘विविध आकारांत भेंडीची भाजी चिरल्याने भाजीवर आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतो ? तसेच त्या भाज्या शिजवून ग्रहण केल्याने (खाल्ल्याने) व्यक्तीवर काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.

१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन

या चाचणीत भेंड्या चिरण्यापूर्वी त्यांची ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली. त्यानंतर भेंड्या तिरक्या, उभ्या आणि गोल आकारात चिरल्यानंतर त्यांची निरीक्षणे करण्यात आली. तिन्ही प्रकारे चिरलेल्या भेंड्यांच्या भाज्या केल्यानंतर (शिजवल्यानंतर) त्यांचीही निरीक्षणे करण्यात आली.

या चाचणीत आध्यात्मिक त्रास असलेला साधक, आध्यात्मिक त्रास नसलेला साधक आणि आध्यात्मिक त्रास नसलेला ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचा साधक असे एकूण ३ साधक सहभागी झाले होते. तिन्ही प्रकारे चिरलेल्या भेंड्यांच्या भाज्यांपैकी प्रत्येक प्रयोगात एक भाजी चाचणीतील साधकांना ग्रहण करण्यास सांगितले. तिन्ही प्रयोगांत भाजी ग्रहण करण्यापूर्वी आणि ग्रहण केल्यानंतर २० मिनिटांनी साधकांची निरीक्षणे करण्यात आली.

१ अ. भेंड्या तिरक्या, उभ्या आणि गोल या आकारांत चिरल्याने भेंड्यांवर झालेले परिणाम

वरील सारणीतून पुढील सूत्रे लक्षात येतात.

१. भेंड्या चिरण्यापूर्वी त्यांच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा काहीच नसून सकारात्मक ऊर्जा होती.

२. तिरक्या आणि उभ्या आकारात चिरलेल्या भेंड्यांमध्ये सकारात्मक ऊर्जेपेक्षा पुष्कळ प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आढळली.

३. गोल आकारात चिरलेल्या भेंड्यांमध्ये नकारात्मक ऊर्जा न आढळता पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळली.

१ आ. तिरक्या, उभ्या आणि गोल या आकारांत चिरलेल्या भेंड्यांच्या भाज्या केल्यावर (शिजवल्यावर) त्यांच्यावर झालेले परिणाम

वरील सारणीतून पुढील सूत्रे लक्षात येतात.

१. तिरक्या आकारात चिरलेल्या भेंड्यांच्या भाजीमध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली.

२. तिरक्या आणि उभ्या आकारांत चिरलेल्या भेंड्यांच्या भाज्यांपेक्षा गोल आकारात चिरलेल्या भाजीमध्ये पुष्कळ अधिक प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळली.

१ इ. तिरक्या, उभ्या आणि गोल या आकारांत चिरलेल्या भेंड्यांच्या भाज्या ग्रहण केल्यावर चाचणीतील साधकांवर झालेले परिणाम

सौ. मधुरा कर्वे

१ इ १. तिरक्या आणि उभ्या आकारांत चिरलेल्या भेंड्यांच्या भाज्या ग्रहण केल्याने साधकांवर नकारात्मक स्पंदनांचा परिणाम होणे : तिरक्या आणि उभ्या आकारांत चिरलेल्या भेंड्यांच्या भाज्या ग्रहण केल्याने आध्यात्मिक त्रास असलेला आणि नसलेला साधक यांच्यातील नकारात्मक ऊर्जेत वाढ झाली, तर आध्यात्मिक त्रास नसलेल्या आणि ६७ टक्के पातळीच्या साधकातील सकारात्मक ऊर्जा अल्प झाली.

१ इ २. गोल आकारात चिरलेल्या भेंड्यांची भाजी ग्रहण केल्याने साधकांवर सकारात्मक स्पंदनांचा परिणाम होणे : गोल आकारात चिरलेली भेंड्यांची भाजी ग्रहण केल्याने आध्यात्मिक त्रास असलेला आणि नसलेला साधक यांच्यातील नकारात्मक ऊर्जा अल्प झाली. तसेच आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आणि आध्यात्मिक त्रास नसलेल्या दोन्ही साधकांतील सकारात्मक ऊर्जेत वाढ झाली.

२. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण

२ अ. भाज्या सात्त्विक आकारात चिरल्याने भाज्यांवर सकारात्मक परिणाम होणे : हिंदु धर्मातील स्वयंपाकाशी संबंधित आचारांमागे अध्यात्मशास्त्र आहे. भाज्या सात्त्विक आकारात चिरल्याने भाजी चिरण्याच्या प्रक्रियेतून निर्माण होणार्‍या रज-तमात्मक स्पंदनांची निर्मिती थांबते. आजकाल भाज्या तिरक्या किंवा उभ्या आकारात चिरण्याच्या पद्धती प्रचलित आहेत. तिरक्या आणि उभ्या आकारात भाज्या चिरल्याने वायूमंडलातील तमोगुणी लहरी (त्रासदायक स्पंदने) भाज्यांमध्ये लगेच आकृष्ट होतात. त्यामुळे भाज्या नकारात्मक स्पंदनांनी भारित होतात.

२ आ. सात्त्विक आकारात चिरलेली भाजी ग्रहण केल्याने व्यक्तीला आध्यात्मिक स्तरावर लाभ होणे : भाजी सात्त्विक आकारात चिरल्याने भाजीच्या सात्त्विकतेत वाढ होते. भाजी शिजवतांना तिच्यावर अग्नीचा संस्कार होत असल्याने तिच्यातील सात्त्विकतेत आणखी वाढ होते. गोल आकारात चिरलेल्या भेंड्यांची भाजी शिजवल्यावर त्यातील सकारात्मक स्पंदनांमध्ये आणखी वाढ झाल्याचे चाचणीतून दिसून आले. ही भाजी ग्रहण केल्याने साधकांना ‘त्यांच्यातील नकारात्मक स्पंदने अल्प होणे आणि त्यांच्यामध्ये सकारात्मक स्पंदने निर्माण होणे किंवा तिच्यात वाढ होणे’, असे आध्यात्मिक स्तरावरील लाभ झाले.

गोल आकारात चिरलेल्या भेंड्यांच्या भाजीच्या तुलनेत तिरक्या आणि उभ्या आकारात चिरलेल्या भेंड्या शिजवल्यावर त्यांच्यामध्ये अल्प प्रमाणात सकारात्मक स्पंदने आढळली, तसेच तिरक्या आकारात चिरलेल्या भेंड्यांमध्ये नकारात्मक स्पंदने आढळली. साधकांनी तिरक्या आणि उभ्या आकारात चिरलेल्या भेंड्यांच्या भाज्या ग्रहण केल्याने त्यांच्यातील नकारात्मक स्पंदनांमध्ये वाढ होऊन त्यांच्यातील सकारात्मक स्पंदने अल्प झाली. याचा अर्थ या भाज्या ग्रहण केल्याने त्यांना आध्यात्मिक स्तरावर लाभ न होता, उलट हानी झाली.

थोडक्यात ‘भाजी चिरणे’ या कृतीचा भाजीवर, तसेच ती ग्रहण करणार्‍यावर किती सूक्ष्म परिणाम होतो’, हे या वैज्ञानिक चाचणीतून लक्षात येते. तसेच ‘हिंदु धर्मात स्वयंपाकाच्या संदर्भात सांगितलेले आचार किती योग्य आणि परिपूर्ण आहेत’, हेही लक्षात येते.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२६.२.२०२१)

ई-मेल : [email protected]