रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाच्या आसमंतात ढगांच्या रूपाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दिसलेले श्री गणेशाचे सुंदर रूप !

माघ शुक्ल पक्ष चतुर्थी (४.२.२०२२) या दिवशी असलेल्या श्री गणेशजयंतीच्या निमित्ताने…

कु. सायली डिंगरे

‘अकार चरणयुगुल । उकार उदर विशाल ।
मकार महामंडल । मस्तकाकारें ॥

हे तिन्ही एकवटले । तेथें शब्दब्रह्म कवळलें ।
तें मियां गुरुकृपा नमिलें । आदिबीज ॥

– ज्ञानेश्वरी, अध्याय १, ओवी १९ आणि २०

अर्थ : ॐकाराची प्रथम अकारमात्रा हे त्या गणपतीचे दोन पाय असून, दुसरी उकारमात्रा हे त्याचे मोठे पोट आहे आणि तिसरी मकारमात्रा हाच त्याच्या मोठ्या आणि वाटोळ्या मस्तकाचा आकार आहे. या तिन्ही मात्रा एकत्र झाल्या म्हणजे संपूर्ण वेद कवटाळला जातो. त्या मूळ बीजरूपी गणेशाला मी गुरुकृपेमुळे नमस्कार करतो.

ज्ञानेश्वरीच्या प्रारंभी संत ज्ञानेश्वर माऊलींनी वर्णन केलेले हे श्री गणेशाचे रूप ! या श्लोकाप्रमाणेच एका विशाल श्री गणेशाचे दर्शन सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमाच्या पूर्वेकडील आसमंतात घडले ! ३१.०५.२०२१ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना त्यांच्या खोलीच्या बाहेर आकाशामध्ये ढगांचा आकार गणपतीसारखा झालेला दिसला. तो आकार त्यांनी साधकांना दाखवला. त्यामुळे त्याचे छायाचित्र काढता आले. गणपतीचा तो आकार सात्त्विक दिसत आहे, तसेच तो मनाला आनंद देणारा आहे.

ढगांच्या रूपात दिसत असलेला श्री गणेशाचा आकार

१. ‘रामनाथी आश्रमाच्या आकाशात दर्शन देऊन श्री गणेशाने साधकांना प्राणशक्ती दिली, तसेच वातावरण शुद्ध केले’, असे जाणवणे

ढगांमध्ये श्री गणेशाचे दर्शन श्रीमन्नारायणस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांना घडणे, हा सनातनच्या साधकांना मोठा आशीर्वाद आहे. श्री गणेश ही विद्येची देवता आहे. तो विघ्नहर्ता आहे. त्याचे संकल्पपूर्वक पूजन केल्याने कार्य निर्विघ्नपणे पार पडते. श्री गणेश प्राणशक्तीदाताही आहे. सध्या करोना महामारीमुळे सर्वजण त्रस्त आहेत. ‘देवाने सनातनच्या रामनाथी आश्रमाच्या आकाशात ढगांमध्ये गणपतीचा आकार निर्माण करून साधकांना प्राणशक्ती दिली, तसेच तेथील वातावरण शुद्ध केले’, असे जाणवले. ‘गणपति हा दशदिशांचा स्वामी आहे. त्याने दर्शन देऊन आश्रमाच्या भोवतीच्या वातावरणातील विषाणूंचे निवारण केले’, असेही जाणवले.

२. ढगांचा श्री गणेशासारखा आकार होणे, हे सनातनच्या आश्रमाबाहेरील वातावरण सात्त्विक झाल्याचे दर्शक

सनातनच्या रामनाथी येथील आश्रमात महर्षींनी श्रीमहाविष्णुचे अवतार म्हणून गौरवलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या समवेत सनातनचे सद्गुरु आणि संत यांचे मंगलमय वास्तव्य आहे. येथे गेली १७ वर्षे शेकडो साधकांनी साधना केली आहे. त्यामुळे आश्रमात सात्त्विक वातावरण आहे. आश्रमातील या वातावरणाचा प्रभाव त्याच्या परिसरातील वातावरणावरही पडतो. त्यामुळे आश्रमाभोवतीचे वातावरण सात्त्विक झाले आहे. अशा या सात्त्विक वातावरणात निसर्गाच्या माध्यमातून ईश्वर अनुभूती देतो. त्यामुळे आकाशात पिवळसर सोनेरी प्रकाश दिसणे, इंद्रधनुष्य दिसणे, ढगांचे सात्त्विक आकार दिसणे अशा अनेक अनुभूती येतात. या अनुभूतींमुळे आश्रमातील साधकांचे मन अधिक उत्साही होते. त्यांना आनंद मिळतो. ईश्वर साधना करणार्‍यांना अनुभूती देतो. निसर्गातील असे सात्त्विक पालट सामान्य माणसाच्या पटकन लक्षात येत नाहीत; पण संत, उन्नत साधक यांच्या ते लक्षात येऊ शकतात.

सनातनच्या आश्रमात ज्याप्रमाणे विविध देवतातत्त्वे आणि पंचमहाभूते यांचे विविध माध्यमांतून प्रकटीकरण होत आहे, त्याप्रमाणे आश्रमाबाहेरील वातावरणातही अशा प्रकारे सात्त्विक अनुभूती येत आहेत. हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. विघ्नहर्ता श्री गणेश आणि साधकांच्या जीवनाचे अध्यात्मीकरण करणारे अन् सर्वव्यापी वसलेल्या भगवंताचे विविध माध्यमांतून घडणारे दर्शन अनुभवण्यास शिकवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !’

– कु. सायली डिंगरे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.१.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक