‘कॅनडामध्ये रहाणार्या सौ. भारती बागवे यांना लेखात दिलेल्या अनुभूती येतात. याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच ! भारतात रहाणार्या किती साधकांना अशा अनुभूती येतात ? भारतातील साधकांनी याचा गंभीरपणे विचार केला पाहिजे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
१. हृदयातील आश्रमात प.पू. भक्तराज महाराज आणि परात्पर गुरु डॉक्टर यांचे अस्तित्व जाणवणे
‘पूर्वी ‘गुरुदेव माझ्या हृदयात आहेत’, याची अनुभूती मला येत होती; परंतु या वर्षीपासून हृदयात प्रकर्षाने रामनाथी आश्रमाचे अस्तित्व जाणवते. हृदयातील या आश्रमात प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) रहातात आणि परात्पर गुरु डॉक्टर त्यांची सेवा करतात, असे मला दिसते. परात्पर गुरु डॉक्टर प्रत्येक वेळी ‘पंचा, चप्पल, काठी’, यांपैकी काहीतरी हातात घेऊन प.पू. भक्तराज महाराज यांच्या सेवेसाठी तत्पर असतात. प.पू. बाबा बोलतांना परात्पर गुरु डॉक्टर त्यांचे ऐकत असतात. या आश्रमात वावरतांना मी १० ते १२ वर्षांची मुलगी असते. मी परात्पर गुरु डॉक्टरांना सेवेत साहाय्य करते. परात्पर गुरु डॉक्टर नामस्मरण करतात. तेव्हा प.पू. बाबा मलाही नामस्मरण करायला बसवतात. परात्पर गुरु डॉक्टर प.पू. बाबांची पाद्यपूजा करतात, तेव्हा प.पू. बाबा मला त्यांना साहाय्य करण्यास सांगतात. एकदा पाद्यपूजा करतांना मी तबकातील फुले परात्पर गुरु डॉक्टरांच्या हातात देत होते. ती देतांना दोन फुले थाळीतच राहिली; म्हणून मी ती फुले त्यांना देण्यासाठी उचलत असतांना बाबा म्हणाले, ‘ती दोन फुले तुझ्यासाठी राहू देत.’ नंतर ती फुले बाबांनी मला त्यांच्या चरणांवर वहायला सांगितली.
२. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी हृदयातील आश्रमात गुरुपादुकांची प्रतिष्ठापना केल्यामुळे वेगळीच शांती अनुभवणे
‘मला नामजपाला बसायचे आहे’, असे मी प.पू. बाबांना सांगितल्यावर ते लगेच मला तिथेच त्यांच्या खोलीत नामजपाला बसवतात आणि कधी मला बकुळीच्या फुलांची टोपली देऊन म्हणतात, ‘नामस्मरण करत हार बनव’. परात्पर गुरु डॉक्टर खोलीत ग्रंथांविषयी विचारायला किंवा बोलायला येतात. तेव्हा प.पू. बाबांचे बोलणे मंत्रमुग्ध करणारे असते. एकदा प.पू. बाबा सगळ्या साधकांकडे पाहून म्हणाले, ‘या आश्रमात गुरुपादुकांची प्रतिष्ठापना कधी करणार ?’ आणि क्षणाचाही विलंब न करता श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ गुरुपादुका घेऊन आल्या अन् त्यांनी प्रतिष्ठापना केली. हे सर्व पहातांना माझे मन भारावून गेले आणि मला एक वेगळीच शांती अनुभवता आली.
३. ‘आश्रम आणि परात्पर गुरु डॉक्टर दूर नाहीत अन् स्वतः आश्रमातील पूर्णवेळ साधिका झाले आहे’, असे वाटणे
माझ्या चुका लक्षात आल्यावर मी प.पू. बाबांकडे जायचे आणि त्यांच्या चैतन्यमय वाणीतून ज्ञान ग्रहण करायचे. केवळ देवाच्या कृपेने मला हे सौभाग्य लाभले. ‘हे जीवन आपण प्रत्यक्षात जगत आहोत’, असे मला नेहमी वाटते. ‘आता आश्रम आणि परात्पर गुरु डॉक्टर दूर नाहीत, तर त्यांचा सहवास नित्याचा झाला आहे आणि आपण या आश्रमातील पूर्णवेळ साधिका झालो आहोत’, असे मला वाटते. गुरुपादुकांची नित्य पूजा करणे, खोलीची स्वच्छता करणे, बाबांचा पलंग नीट लावणे, यांसारख्या सेवा करत नामस्मरण करतांना माझा पूर्ण दिवस आनंदात जातो.
४. ‘प.पू. बाबा आध्यात्मिक जीवन जगायला शिकवत आहेत’, असे वाटणे
प.पू. भक्तराज महाराज यांच्या खोलीत गेल्यावर ते ‘नामजपादी उपाय, चुका, सेवा, मनाची स्थिती’, यांविषयी विचारपूस करतात आणि त्यावर लगेच मार्गदर्शन करतात. प.पू. बाबा निद्रा घेत असतांना सर्व सेवा सावकाश करून ‘ते जागे होणार नाहीत’, याकडे माझे लक्ष असते. वेळोवेळी प.पू. बाबा मला ‘परात्पर गुरु डॉक्टरांकडून काय शिकायला पाहिजे’, याचे मार्गदर्शन करतात आणि ‘केवळ प.पू. बाबांच्या कृपेने मला शिष्यावस्थेतील परात्पर गुरु डॉक्टर कसे आचरण करतात ?’, हे शिकायला मिळते. ‘प.पू. बाबा मला आध्यात्मिक जीवन जगायला शिकवत आहेत’, असे वाटते.
आश्रमात मी जाऊ कशाला ।
आश्रमच सदैव मनी वसतो ।
हृदयी मम गुरुचरण कमल दिसते ।।
‘हे गुरुराया, केवळ तुमच्या कृपेमुळे मला ही अनुभूती येत आहे. ‘आपण शिकवत असणार्या प्रत्येक गोष्टीचे आकलन होऊन ते कृतीत आणता येऊ दे’, हीच तुमच्या चरणी प्रार्थना आहे. ‘देवा, तुला जाणणे आणि ओळखणे माझ्या बुद्धीला शक्य नाही; पण तूच मला या सर्व गोष्टींची जाणीव करून देतोस, यासाठी तुझ्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. भारती बागवे, कॅनडा (६.२.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |