गोळीबाराच्या घटनेनंतर असदुद्दीन ओवैसी यांना ‘झेड’ दर्जाची सुरक्षा

एम्.आय.एम्. अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी

नवी देहली – एम्.आय.एम्. अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या वाहनावर उत्तरप्रदेशातील मेरठ येथे झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर आता त्यांना केंद्र सरकारने केंद्रीय राखीव पोलीस दलाची ‘झेड’ दर्जाची सुरक्षा दिली आहे. या गोळीबाराच्या प्रकरणी पोलिसांनी शुभम आणि सचिन यांना अटक केली आहे. हिंदूंच्या विरोधातील विधानांवरून हे आक्रमण केल्याचे या दोघा आरोपींनी सांगितले आहे, अशी माहिती हापूडचे पोलीस अधीक्षक दीपक भुकेर यांनी दिली.

या आरोपींकडून गोळीबारासाठी वापरण्यात आलेले पिस्तुल जप्त करण्यात आले आहे. हे आरोपी ओवैसी यांच्यावर आक्रमण करण्यासाठी गेल्या अनेक काळापासून सिद्धता करत होते. याचसाठी ते ओवैसी यांच्या प्रत्येक सभेला उपस्थित रहात होते. ते गेल्या अनेक दिवसांपासून ओवैसींचा पाठलाग करत होते; पण त्यांना आक्रमणाची संधी मिळत नव्हती. मेरठ येथे ओवैसी यांची गाडी टोल नाक्यावर थांबली असता त्यांनी गोळीबार केला.

ओवैसी यांचा सुरक्षा स्वीकारण्यास नकार : ‘माझी वेळ येईल, तेव्हा माझा मृत्यू होईल !’

ओवैसी त्यांना मिळालेल्या सुरक्षेविषयी म्हणाले की, मी वर्ष १९९४ मध्ये माझ्या राजकीय कारकीर्दीला प्रारंभ केला. आतापर्यंत मी कोणतीही सुरक्षा घेतली नाही. मला ती आवडतही नाही. माझी सुरक्षा हे सरकारचे दायित्व आहे. मी भविष्यातही सुरक्षा घेणार नाही. जेव्हा माझी वेळ येईल, तेव्हा माझा मृत्यू होईल.