निवडणुकांना आलेले बाजारीस्वरूप जाणा !

गोवा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, मणीपूर आणि पंजाब या ५ राज्यांत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने…

प्रतिकात्मक छायाचित्र

१. अनेक व्यावसायिक तज्ञांनी उमेदवार आणि पक्ष यांच्यासाठी प्रचारयंत्रणेची कोट्यवधी रुपयांची कंत्राटे घेणे !

‘निवडणुकीसाठी प्रचारयंत्रणा उभी करून ती चालवण्यासाठी अनेक व्यावसायिक तज्ञांनी उमेदवार आणि पक्ष यांच्यासाठी कंत्राटे घेतली अन् त्यासाठी त्यांना कोट्यवधी रुपये देण्यात आले. एकट्या काँग्रेस पक्षाने वर्ष १९९६ मध्ये अशा १४ तज्ञ मंडळींना निवडणूक प्रचाराचे कंत्राट दिल्याचे समजते.

२. निवडणुकीचा बाजार हा सरकारी नियम धाब्यावर बसवून गुरांच्या बाजारापेक्षाही मोकाट झालेला असणे !

अनेक लोकप्रतिनिधींनी जाहीर सभांतून बोलतांना आणि स्वतःचा प्रचार करतांना वापरलेले तंत्र निकृष्ट दर्जाचे अन् अनुचित असे होते. व्यापारी आस्थापनेही विक्रीवृद्धीकरता इतक्या खालच्या स्तरावर जात नाहीत. किंबहुना स्पर्धा करणार्‍या आस्थापनाच्या मालावर टीका करणे, हे कायदेशीर संहितेतही बसत नाही; परंतु दुर्दैव असे की, निवडणुकांचा बाजार हा आता प्रत्येक वेळी गुरांच्या बाजारापेक्षाही मोकाट झालेला आहे. या बाजारात सरकारी नियमही धाब्यावर बसवले जातात. या अनागोंदी प्रचारमोहिमेत अनेक किळसवाणे प्रकार घडतात.

३. अमेरिकेत खुल्या निवडणुका होतात; परंतु तेथे अनेक जाती, धर्म आणि विभिन्न भाषा असे प्रकार नसल्याने निवडणुका काही विशिष्ट तत्त्वांवर अन् कार्यक्रमांवर होतात.

४. प्रचारमोहिमेतील भपकेबाजपणामुळे मतदाराला खरा कर्तृत्ववान आणि चारित्र्यवान उमेदवार समजणे अशक्य होणे !

निवडणुकीच्या काळात विविध पक्षांचे जाहीरनामे प्रसिद्ध केले जातात; पण त्यामध्ये असलेला उथळपणा जाणवतो. ते जाहीरनामे वाचून कुणीही फारसे मतदान करत नाही. प्रचारमोहिमेतील भपकेबाजपणा हा मतदारांना भुलवत असतो. दुर्दैवाने काही विशिष्ट पंथाचे मतदार धर्माचाही विचार करतात. आपल्या समाजात असलेल्या विषमतेच्या भिंती मतदारांना खुल्या वातावरणात विचार करूच देत नाहीत. आपण बाजारात गेल्यावर ग्राहक म्हणून कोणतीही वस्तू विकत घेण्याचे आपल्याला स्वातंत्र्य असते, असे आपण समजतो; परंतु तेथेही विज्ञापनामुळे आणि दुकानातील भपकेबाजपणामुळे आपल्याला चांगली वस्तू कोणती ? याचा निर्णय घेता येत नाही. तीच गोष्ट उमेदवारांविषयी होते. खरा कर्तृत्ववान आणि चारित्र्यवान उमेदवार कोणता आहे ? हे समजणे मतदाराला अशक्य होते.’

(सध्या पार पडत असलेल्या निवडणुकांचे बाजारीकरण आणखीनच वाढले आहे. आज राजकीय पक्ष आणि लोकप्रतिनिधी दोघेही निवडणुकीच्या काळात प्रचारासाठी कोट्यवधी रुपये व्यय करतात. त्यासह निवडणुकीमध्ये स्वतःला सर्वाधिक मते मिळण्यासाठी आणि स्वपक्षाची सत्ता येण्यासाठी मतदारांना देण्यात येणारी आश्वासने म्हणजे एक प्रकारची लाच म्हणावी लागेल, अशी दुःस्थिती आहे. तसेच निवडणुकांना उभे रहाणारे शेकडो उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असतात. एकूणच निवडणुकांचे होणारे बाजारीकरण टाळण्यासाठी आणि ही स्थिती पालटण्यासाठी कर्तृत्ववान, चारित्र्यवान, राष्ट्राभिमानी अन् सात्त्विक शासनकर्ते असलेले हिंदु राष्ट्र अपरिहार्य आहे ! – संपादक)

– डॉ. प्र.चिं. शेजवलकर (साभार – मासिक ‘प्रसाद’, जून १९९६)