गलवानमधील संघर्षामध्ये चीनचे ३८ सैनिक नदीत वाहून गेले ! – ऑस्ट्रेलियाच्या दैनिकाचे वृत्त

चीनचे ४० ते ४५ सैनिक ठार झाल्याचा दावा बहुतेक प्रसारमाध्यमांनी आतापर्यंत केलेला आहे; मात्र खोटारडा चीन ते नाकारत आला आहे. तरीही या घटनेतून भारतीय सैन्याच्या क्षमतेची चीनला जाणीव झाली आहे, हेही नसे थोडके ! – संपादक

कॅनबेरा (ऑस्ट्रेलिया) – लडाखमधील गलवान खोर्‍यात जून २०२० मध्ये चिनी आणि भारतीय सैनिक यांच्यात झालेल्या संघर्षामध्ये चीनच्या ३८ सैनिकांचा मृत्यू झाला, अशी माहिती ऑस्ट्रेलियातील ‘दी क्लॅक्सन’ या दैनिकाने दिली आहे. या संघर्षामध्ये चीनने आतापर्यंत केवळ ४ चिनी सैनिकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे.

१. ‘द क्लॅक्सन’ने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अँथनी क्लान यांच्या नेतृत्वाखाली संशोधकांचे स्वतंत्र पथक स्थापन केले होते. या पथकाकडून ‘गलवान डीकोडेड’ (गलवानमागील रहस्य उलगडले) नावाने त्याचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. संशोधकांच्या म्हणण्यानुसार १५-१६ जून २०२० च्या रात्री अत्यल्प तापमानामध्ये ३८ चिनी सैनिक नदीत वाहून गेल्याने त्यांंचा मृत्यू झाला होता.

२. या वृत्तात चीनमधील सामाजिक माध्यम ‘वीबो’च्या अनेक वापरकर्त्यांच्या आधारे या पथकाने ३८ ही संख्या सांगितली आहे. चीनकडून ‘वीबो’वरील सर्व पोस्ट नंतर हटवण्यात आल्या होत्या. चीनकडून मृत्यूमुखी पडलेल्या ३८ जणांना पदक घोषित करण्यात आले.