एम्.आय.एम्.चे नेते वारिस पठाण यांना इंदूरमध्ये मुसलमान तरुणाने काळे फासले

वारिस पठाण देश आणि धर्म यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करून तेढ निर्माण करत असल्याने काळे फासल्याची तरुणाची स्वीकृती !

वारिस पठाण देशाविषयी आणि धर्मांविषयी तेढ कोण निर्माण करत आहेत, हे यातून स्पष्ट होते ! अशा धर्मांध नेत्यांच्या विरोधात पठाण यांच्यात धर्मातील तरुणच विरोध करत आहेत, हे पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी लक्षात घेतील का ? – संपादक

इंदूर (मध्यप्रदेश) – येथील खरजाना भागात काला खरजाना दर्ग्यामध्ये  एम्.आय.एम्.चे नेते आणि मुंबईतील माजी आमदार वारिस पठाण आलेे होते. या वेळी एका तरुणाने त्यांच्या चेहर्‍याला काळे फासले आणि तो पसार झाला. पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे. सद्दाम पटेल असे या तरुणाचे नाव आहे. अटकेनंतर सद्दामची जामिनावर सुटका झाली आहे. काळे फासल्याच्या घटनेचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे.

सद्दाम पटेल याने काळे फासल्याविषयी सांगितले की, देशाविषयी आणि विविध धर्मांविषयी वारिस पठाण हे सातत्याने आक्षेपार्ह विधाने करत आहेत. त्यामुळे दोन धर्मांत तेढ निर्माण होत असून त्यांच्या या कृतीचा निषेध करण्यासाठी आणि मनातील राग व्यक्त करण्यासाठी मी हे कृत्य केले.

काळे फासण्यात आलेच नसल्याचा पठाण यांचा दावा

वारिस पठाण यांनी मात्र असा कोणताही प्रकार घडला नसल्याचा दावा केला आहे. ‘एका लहान मुलाने मला काळे तीट लावले होते. ते मी एका ठिकाणी थांबून पुसले. तेव्हाची छायाचित्रे प्रसारित करण्यात आली असून यामागे काँग्रेसचा हात आहे’, असा आरोप पठाण यांनी केला. (याला म्हणतात ‘पडलो, तरी नाक वर’ ! – संपादक)

पठाण यांनी पूर्वी केलेले आक्षेपार्ह विधान

‘१५ कोटी मुसलमान १०० कोटी हिंदूंना भारी पडतील’, असे ते नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात म्हणाले होते. या विधानाला विरोध झाल्यानंतर त्यांनी विधान मागे घेतले होते.