विदेशी चलनाचे वेळेत नूतनीकरण न केल्याने शिर्डी येथील साई संस्थानचे खाते गोठवले !

शिर्डी (जिल्हा नगर) – विदेशी योगदान (नियमन) कायद्यानुसार वेळेत नूतनीकरण न झाल्याने साई संस्थानचे विदेशी चलनाचे खाते केंद्रीय गृहमंत्रालयाने १ जानेवारीपासून गोठवले आहे. यामुळे संस्थानचे कोट्यवधींचे चलन अडकून पडले आहे. यात साई संस्थानसह तिरूपती देवस्थानचाही समावेश आहे. सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रांत काम करणार्‍या अनेक संस्थांना विदेशातून आर्थिक साहाय्य मिळते. खाती गोठवल्याने साहाय्याचा ओघ थांबला आहे.

देशभरातील जवळपास ६ सहस्र आणि महाराष्ट्रातील १ सहस्र २६३ अशासकीय संस्थांनी केंद्रीय गृहमंत्रालयाकडे ‘एफ्.सी.आर्.ए.’ कायद्यानुसार ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत खात्याचे नूतनीकरण न केल्याने ही कारवाई करण्यात आली. साई संस्थानचा तात्पुरता कारभार तदर्थ समितीकडे होता. नूतनीकरणासाठी पदाधिकार्‍यांची ‘केवायसी’ उपलब्ध न झाल्याने नूतनीकरण रखडल्याचे सांगण्यात येते. लवकरच हे खाते कार्यान्वित होईल, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.