अनधिकृत प्रार्थनास्थळाला अनुमती देणार्यांवर कारवाई करण्याची हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी !
|
बेंगळुरू (कर्नाटक) – येथील दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या क्रांतीवीर संगोळ्ळी रायण्णा रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ५ मध्ये हमालांच्या विश्रांती कक्षाला प्रार्थनास्थळ बनवण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. याला हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी विरोध केला आहे. यासंदर्भात बजरंग दल, राष्ट्र रक्षणा पडे (राष्ट्र रक्षण दल), हिंदू महासभा, विश्व हिंदु परिषद आणि हिंदु जनजागृती समितीच्या यांच्यावतीने रेल्वे स्थानकाच्या कार्यकारी अधिकार्यांना निवेदन देण्यात आले. यात म्हटले आहे की, बेंगळुरू रेल्वे स्थानकाच्या बाहेर अनेक मशिदी असूनही रेल्वे स्थानकाच्या फलाटावर प्रार्थना करण्यास अनुमती देणे हे एक षड्यंत्र आहे. आज प्रार्थनास्थळ बनवून उद्या त्याचेच मशिदीत रूपांतर करण्याची शक्यता आहे; म्हणून अनधिकृत प्रार्थनास्थळाला अनुमती देणार्यांवर कारवाई करावी. तसे न घडल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे बजावण्यात आले आहे.
रेल्वे स्थानकाच्या फलाटावर अन्य धर्माच्या प्रार्थनास्थळाला अनुमती देणे कितपत योग्य आहे ? – श्री. मोहन गौडा, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
याविषयी हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. मोहन गौडा म्हणाले की, सध्या बेंगळुरू हे आतंकवाद्यांचे आश्रयस्थान झाले आहे. वर्ष २०१८ मध्ये राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने बेंगळुरू कँटोनमेंट स्थानकात मूलतः बंगालचा असलेल्या आतंकवादी आदील असदुल्ला याला अटक केली होती. वर्ष २०१९ला मॅजेस्टिक क्षेत्रात केंद्रीय अन्वेषण विभागाच्या अधिकार्यांनी महंमद अक्रम नावाच्या आतंकवाद्याला अटक केली होती. बेंगळुरूच्या कॉटनपेटे मशिदीत आश्रय घेतलेल्या मूलतः बांग्लादेशच्या जमात-उल-मुजाहिदीन संघटनेच्या सदस्याला वर्ष २०२० ला पोलिसांनी अटक केली होती. असे असूनही रेल्वे स्थानकाच्या फलाटावर अन्य धर्माच्या प्रार्थनास्थळाला अनुमती देणे कितपत योग्य आहे ? तत्परतेने तेथील अनधिकृत प्रार्थनास्थळ बनवण्यास अनुमती देणार्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि तिथे प्रार्थना करण्यास अनुमती देऊ नये. हे तत्परतेने थांबवण्यात यावे, असे सांगण्यात आले आहे.
रेल्वे स्थानकाच्या व्यवस्थापकांना प्रार्थनास्थळ उभारल्याचे ठाऊकच नाही !
रेल्वेचे अधिकारी इतके निष्क्रीय असतील, तर स्थानकावर उद्या जिहादी आतंकवाद्यांनी घातपात केल्यास आश्चर्य वाटू नये ! – संपादक
हिंदु संघटनांचे कार्यकर्ते रेल्वे स्थानकावर अधिकार्यांना निवेदन देण्यास गेले असता प्रार्थनास्थळाच्या ठिकाणी १०० हून अधिक पोलीस उपस्थित होते. ‘अनधिकृत प्रार्थनास्थळ एकदा पाहून अधिकार्यांना निवेदन देतो’, असे कार्यकर्त्यांनी सांगितल्यावर पोलिसांनी नकार दिला. त्यानंतर पोलीस केवळ ५ जणांना प्रार्थनास्थळ दाखवण्यासाठी घेऊन गेले. प्रार्थनास्थळात गेल्यावर तेथे मशिदीत ज्या प्रमाणे पाय धुण्यासाठी नळ असतो, तसा तेथे नळ बसवण्यात आला होता. नमाजपठणासाठी अरबी भाषेत लाकडी फलक होता. मुसलमानांना सूचना देण्यासाठी मोठा लाकडी फलक होता. तो दिसणार नाही, असा ठेवण्यात आला होता. त्याच्यावर अरबी भाषेत सूचना लिहिली होती. स्थानकाचे व्यवस्थापक या प्रार्थनास्थळाच्या आत गेल्यावर त्यांना ते पाहून धक्का बसला. ते म्हणाले, ‘‘इतका पालट करण्यात आल्याचे आम्हाला ठाऊकच नाही.’’
या प्रार्थनास्थळाचे ‘मुसुल्ला मशीद’, असे नामकरण करून या रेल्वेस्थानकावर आणि जवळच्या बस स्थानकावर येथे येणार्या मुसलमानांना नमाजाची व्यवस्था करून देण्यात आली होती.
श्री. प्रमोद मुतालिक (संस्थापक, श्रीराम सेना) – हे लवकरात लवकर पालटले नाही, तर सर्व संघटनांना एकत्र करून श्रीराम सेना १० सहस्र हिंदूंना घेऊन ते काढील.
श्री. पुनीत केरेहळ्ळी (राष्ट्रीय रक्षणा पडे) – धर्मनिरपेक्षतेमध्ये सर्व धर्मांसाठी एकसारखी सोय करणे आवश्यक असतांना एका विशिष्ट धर्मियांना अशा प्रकारची कृती करण्यास अनुमती देण्यात येते; मात्र अन्य जणांना देण्यात येत नाही. आता निधर्मीवादी कुठे आहेत ?
श्री. सुरेश जैन (हिंदू महासभा) – येथे काही दुर्घटना घडली, तर त्याला रेल्वे प्रशासन उत्तरदायी असेल.