महर्षींच्या आज्ञेनुसार रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘श्री राजमातंगी यज्ञाचे’ कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण आणि त्याविषयी त्यांना मिळालेले दैवी ज्ञान !

महर्षींच्या आज्ञेनुसार रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘श्री राजमातंगी यज्ञा’चे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण आणि त्याविषयी त्यांना मिळालेले दैवी ज्ञान !

‘१४.१.२०२२ या दिवशी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात महर्षींच्या आज्ञेनुसार ‘श्री राजमातंगी यज्ञ’ झाला. देवाने माझ्याकडून या यज्ञाच्या सूक्ष्म परीक्षणाची सेवा करवून घेतली. श्रीगुरुकृपेने श्री राजमातंगीदेवीच्या संदर्भात मिळालेल्या दिव्य ज्ञानाची सूत्रे येथे दिली आहेत. 

कु. मधुरा भोसले

१. श्री राजमातंगीदेवीच्या मूर्तीविज्ञानामागील अध्यात्मशास्त्र 

१ अ. श्री राजमातंगीदेवी अष्टभुजा असण्याचे महत्त्व : श्री राजमातंगीदेवीच्या अष्टभुजांमध्ये अष्टमहासिद्धींचा, म्हणजे गूढ शक्तीचा वास आहे. या दिव्य अष्टमहासिद्धींच्या बळावर संपूर्ण ब्रह्मांडावर राज्य करता येते.

संदर्भ : ‘भारतीय संस्कृतीकोश’ या ग्रंथातून.

१ आ. श्री राजमातंगीदेवीच्या मस्तकावर डाव्या बाजूला चंद्रकोर असण्याचे महत्त्व  : श्री राजमातंगीदेवीचे तारक रूप हे चंद्रकोरीप्रमाणे शांती आणि शीतलता यांची अनुभूती देणारे आहे. देवीने तिच्या मस्तकाच्या डाव्या बाजूला चंद्रकोर धारण केल्यामुळे तिच्यामध्ये आवश्यकतेनुसार चंद्राच्या कला १ ते १६ या संख्येने जागृत होऊन चंद्राच्या कलांप्रमाणे देवीकडून चैतन्यदायी तारकतत्त्व प्रक्षेपित होते.

१ इ. श्री राजमातंगीदेवीच्या हातामध्ये वीणा असण्याचे महत्त्व : श्री राजमातंगीदेवीमध्ये महासरस्वतीदेवीचेही तत्त्व आहे. महासरस्वतीदेवी ही संगीताची देवी असल्यामुळे श्री राजमातंगीदेवीच्या हातात सरस्वतीदेवीची वीणा आहे. जेव्हा श्री राजमातंगीदेवी वीणावादन करते, तेव्हा त्यातून प्रगट होणार्‍या सात्त्विक नादामुळे नादमय असणार्‍या ज्ञानशक्तीच्या सूक्ष्मतम लहरींचे प्रक्षेपण संपूर्ण ब्रह्मांडात होते. त्यामुळे धर्मशक्तीला पूरक असणारी नादमय ज्ञानशक्ती प्रगट होऊन ती विविध सात्त्विक जिवांच्या माध्यमातून कार्यरत होते. अशाप्रकारे जेव्हा प्रभु श्रीराम रामराज्य करत होते, तेव्हा श्री राजमातंगीदेवीच्या हातातील वीणेतून सूक्ष्मातून प्रगट झालेल्या दैवी नादामुळे प्रभु श्रीरामाची सुषुम्नानाडी अधिक प्रमाणात कार्यरत होत असे आणि त्याच्यामध्ये सुप्तावस्थेत असलेले धर्मतेज प्रगट होत असे अन् धर्मराज्य स्थापन करून ते चालवण्यासाठी आवश्यक असणारे धर्मज्ञान अन् दिव्य ज्ञान जागृत होत असे. त्यामुळे प्रभु श्रीरामाला ज्ञानशक्तीच्या पायावर ‘धर्मराज्य’, म्हणजे ‘रामराज्य’ स्थापन करून ते दीर्घकाळ चालवता आले.

१ ई. श्री राजमातंगीदेवीच्या दोन्ही हातांवर पोपट असण्याचे महत्त्व : इच्छाशक्तीचा सूक्ष्म रंग पोपटी (ज्ञानशक्तीचा रंग पिवळा आणि क्रियाशक्तीचा रंग लाल आहे.) असल्यामुळे श्री राजमातंगीदेवीच्या हातांवरील पोपटांच्या माध्यमातून तिच्यातील इच्छाशक्ती कार्यरत होते. त्यामुळे प्रभु श्रीरामामध्ये आसुरी शक्ती आणि दुर्जन प्रवृत्ती असणार्‍या जिवांचा नाश करण्याची सात्त्विक इच्छा जागृत होऊन त्याच्यातील सुप्तावस्थेतील विष्णुतत्त्व जागृत होऊन त्याच्याकडून असुरांचा नाश करण्याचे अवतारी कार्य पूर्ण झाले.

१ उ. श्री राजमातंगीदेवीच्या उजव्या हातात कमळ आणि डाव्या हातात ऊस असण्याचे महत्त्व : ‘कमळ’ हे ‘सृजनता’ (म्हणजे ‘नवनिर्मिती’) आणि ‘ऊस’ हे ‘ऐश्वर्य अन् भरभराट’ यांचे प्रतीक आहे. श्री राजमातंगीदेवीमध्ये असणार्‍या महालक्ष्मीस्वरूप तारक शक्तीमुळे तिच्याकडून सृजनतेचे कार्य होते. अशाप्रकारे प्रभु श्रीरामाच्या माध्यमातून श्री राजमातंगीदेवीची सृजनात्मक शक्ती धर्मशक्तीला साहाय्यक झाल्यामुळे प्रभु श्रीरामाने प्रथम अधर्मी शक्तीचा सूक्ष्मातून विनाश केला. त्यानंतर स्थुलातून दुष्टप्रवृत्तीच्या वालीचा वध करून किष्किंधाचे राज्य धर्मनिष्ठ असणारा वानरराज सुग्रीव याला दिले, तसेच लंकाधिपती अधर्मी रावणाचा नाश करून लंकेचे राज्य धर्मपरायण बिभीषण याला दिले. अशाप्रकारे प्रभु श्रीरामाच्या संकल्पशक्तीमध्ये श्री राजमातंगीदेवीची सृजनात्मक शक्ती कार्यरत झाल्यामुळे किष्किंधा आणि लंका येथे असणारे आसुरी राज्य संपून तेथे रामराज्याची, म्हणजे नवीन राज्याची स्थापना झाली. ही रामराज्ये धर्माधिष्ठित असल्यामुळे त्यांच्यावर श्री राजमातंगीदेवीची कृपा होऊन या राज्यांची ऐहिक आणि पारमार्थिक स्तरांवर भरभराट होऊन त्यांची उन्नती झाली.

१ ऊ. श्री राजमातंगीदेवीच्या उजव्या हातात अंकुश आणि डाव्या हातात पाश ही शस्त्रे असण्याचे महत्त्व : देवीच्या हातातील अंकुशामुळे प्रभु श्रीरामाच्या पृथ्वीवरील वास्तव्यामुळे अधर्मावर अंकुश, म्हणजे नियंत्रण ठेवले गेले. देवीच्या हातातील पाश हा इंद्रिय निग्रहाचे द्योतक आहे. देवीच्या कृपेमुळे रामराज्य चालवणारा अयोध्येचा राजा प्रभु श्रीराम, किष्किंधेचा राजा सुग्रीव, लंकेचा राजा बिभीषण आणि मथुरेचा राजा शत्रूघ्न, तसेच प्रभु श्रीरामावर श्रद्धा ठेवून भरतखंडात विविध ठिकाणी रामराज्य करणारे विविध राजे यांची इंद्रिये त्यांच्या नियंत्रणात होती. त्यामुळे ते कोणत्याही मोहाला बळी न पडता किंवा अहंकारी न होता विनम्र राहिले. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून श्री राजमातंगीदेवीचे तत्त्व सतत कार्यरत होते. त्यामुळे त्यांना धर्माधिष्ठित रामराज्य चालवता आले.

१ ए. श्री राजमातंगीदेवी निळसर रंगाच्या सरोवरातील मोठ्या गुलाबी रंगाच्या कमळावर विराजमान असण्याचे महत्त्व : ‘सरोवर’ हे आपतत्त्वाचे प्रतीक आहे आणि ‘कमळ’ हे ‘ज्ञान आणि सृजनता’ यांचे द्योतक आहे. ‘सरोवरातील कमलासनावर बसणे’, म्हणजे जलरूपी मायेच्या विश्वात सूक्ष्म रूपाने वास करणार्‍या कमळरूपी दिव्य ज्ञानाचे अधिष्ठान असलेल्या पदावर आरूढ असणे. श्री राजमातंगीदेवी ही श्रीविष्णूच्या ७ व्या, म्हणजे प्रभु श्रीरामाच्या अवतारी कार्याला पूरक असणारी शक्ती असल्यामुळे तिच्यामध्ये धर्मसंस्थापनेसाठी आवश्यक असणारी इच्छा, क्रिया किंवा ज्ञान या तिन्ही शक्ती आवश्यकतेनुसार प्रगट होत होत्या. या सर्व शक्तींचा मूळ स्रोत ‘ब्रह्मज्ञान’ असल्यामुळे या ब्रह्मज्ञानस्वरूपी विशाल गुलाबी कमळावर देवी आसनस्थ आहे. यावरून ‘श्री राजमातंगीदेवीमध्ये संपूर्ण ब्रह्मांडात ब्रह्मज्ञानाच्या बळावर धर्माधिष्ठित रामराज्याची स्थापना करण्याचे अपूर्व सामर्थ्य आहे’, हे सूत्र लक्षात येते.

१ ऐ. श्री राजमातंगीदेवीचे उजवा चरण खाली आणि डावा चरण गुडघ्यात दुमडलेल्या स्थितीत ठेवल्याने कालचक्र नियंत्रित होऊन रामराज्याचा प्रारंभ होणे : देवीचा ‘दुमडलेला चरण’ हे अप्रगट आणि ‘खाली सोडलेले चरण’ हे प्रगट शक्तीचे प्रतीक आहे. श्री राजमातंगीदेवीची सूर्यनाडी चालू असल्यामुळे तिच्या उजव्या चरणातून पाताळाकडे सतत प्रकट मारक शक्ती प्रवाहित होऊन तिच्या चरणांच्या खाली, म्हणजे पाताळात वास करणारी रज-तम प्रधान अनिष्ट आणि अधर्मी शक्ती दबली गेली. त्यामुळे प्रभु श्रीरामाला पृथ्वीवर स्थुलातून रामराज्य स्थापन करणे संभव झाले. त्याचप्रमाणे श्री राजमातंगीदेवीची चंद्रनाडी अकार्यरत असल्यामुळे तिच्या दुमडलेल्या चरणामध्ये अप्रगट, म्हणजे निर्गुण-सगुण अवस्थेतील शक्तीचा वास होता. श्री राजमातंगीदेवीने तिच्या डाव्या चरणातील निर्गुण-सगुण अवस्थेतील शक्तीच्या बळावर काळावर नियंत्रण मिळवून कालचक्राला नियंत्रित करून त्याला पूरक बनवले. त्यामुळे प्रभु श्रीरामाच्या १४ वर्षांचा वनवासाचा कालावधी पूर्ण झाल्यावर प्रभु श्रीरामाच्या अधिपत्याखाली भरतखंडात रामराज्याचा प्रारंभ झाला आणि त्यानंतर संपूर्ण पृथ्वीवर स्थापन झालेले रामराज्य दीर्घकाळ टिकून राहिले. हे काळावर धर्मशक्तीने मिळवलेल्या विजयाचे उत्तम उदाहरण आहे.

१ ओ. श्री राजमातंगीदेवीची कांती निळसर असण्याचे महत्त्व : श्री राजमातंगीदेवीमध्ये विष्णुप्रिया श्रीमहालक्ष्मीदेवीचे तत्त्व प्रभु श्रीरामाच्या अवतारी कार्याच्या पूर्ततेसाठी कार्यरत झाले होते. त्यामुळे श्री राजमातंगीदेवीला विष्णुतत्त्वमय असणार्‍या निळसर रंगाची कांती प्राप्त झाली होती.

१ औ. श्री राजमातंगीदेवीच्या तत्त्वाचा रंग पोपटी असण्याचे महत्त्व : श्री राजमातंगीदेवीमध्ये रामराज्याची स्थापना करण्याचे, म्हणजे नवनिर्मिती करण्याचे सामर्थ्य असल्यामुळे तिच्यामध्ये इच्छाशक्ती पुष्कळ प्रमाणात कार्यरत झाली आहे. या सृजनात्मक इच्छाशक्तीचा रंग पोपटी असल्यामुळे श्री राजमातंगीदेवीच्या तत्त्वाचा रंग पोपटी आहे.

२. प्रभु श्रीरामाला साहाय्य करण्यासाठी कार्यरत झालेल्या श्री राजमातंगीदेवीचे सूक्ष्मातील कार्य

प्रभु श्रीराम हा अत्यंत मितभाषी आणि शांत स्वभावाचा होता. तो शिवात्मा दशेत असल्यामुळे तो स्वत:च्या जीवनात घडणार्‍या आणि विश्वात घडणार्‍या घटनांकडे साक्षीभावाने पहात असे. शांतीची, म्हणजे निर्गुण स्थितीतील सर्वाेच्च अनुभूती घेणार्‍या प्रभु श्रीरामाकडून अवतारी कार्य होण्यासाठी महाशक्तीचे ‘श्री राजमातंगी’ हे रूप त्याला साहाय्य करण्यासाठी प्रगट झाले. या तत्त्वामुळे तो शिवात्मा दशेतून शिवदशेत येऊन त्याने इच्छा, क्रिया आणि ज्ञान या शक्तींशी संबंधित असणारे अवतारी कार्य केले.

कृतज्ञताभावाने नमन : ‘ज्ञानावतार आणि विश्वगुरु असणारे विष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे श्री राजमातंगीदेवीच्या संदर्भात वरील दैवी ज्ञान मिळाले आणि तिचा महिमा लक्षात आला’,  यासाठी मी श्रीगुरुचरणी कृतज्ञताभावाने नमन करते.’

३. श्री राजमातंगीदेवीमध्ये कार्यरत असणार्‍या श्री सरस्वती, श्री महालक्ष्मी आणि श्री महाकाली देवी आणि देवीतत्त्व यांचे प्रमाण

१. शक्तीचा प्रकार 

१ अ. तारक

१ आ. मारक

२. शक्तीचे स्वरूप

२ अ. इच्छाशक्ती

२ आ. क्रियाशक्ती

२ इ. ज्ञानशक्ती

३. शक्तीचा स्तर 

३ अ. सगुण

३ आ. सगुण-निर्गुण

३ इ. निर्गुण-सगुण

३ ई. निर्गुण

कृतज्ञताभावाने नमन : ‘ज्ञानावतार आणि विश्वगुरु असणारे विष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे श्रीराजमातंगीदेवीच्या संदर्भात वरील दैवी ज्ञान मिळाले आणि तिचा महिमा लक्षात आला’,  यासाठी मी श्रीगुरुचरणी कृतज्ञताभावाने नमन करते.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातनू मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.१.२०२२)

  • सूक्ष्म :व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक