स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया तळमळीने राबवणार्‍या सौ. छाया गणेश देशपांडे यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया तळमळीने राबवणार्‍या संभाजीनगर येथील सौ. छाया गणेश देशपांडे (वय ६१ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

सौ. छाया देशपांडे (डावीकडे) यांना श्रीकृष्णाचे चित्र देऊन त्यांचा सत्कार करतांना सौ. अक्षरा बाबते

संभाजीनगर, २८ जानेवारी (वार्ता.) – शारीरिक त्रास होत असतांनाही सतत सेवेविषयी विचार करणार्‍या, तळमळीने स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवणार्‍या येथील सनातनच्या साधिका सौ. छाया गणेश देशपांडे (वय ६१ वर्षे) या ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाल्या आहेत, ही आनंदवार्ता सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी दिली. २२ जानेवारी २०२२ या दिवशी एका ‘ऑनलाईन’ सत्संगात त्यांनी हे घोषित केले. या वेळी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. अक्षरा दिनेश बाबते यांनी सौ. देशपांडे यांना श्रीकृष्णाचे चित्र देऊन त्यांचा सत्कार केला.

स्वतःत आंतरिक पालट करणार्‍या आणि प्रतिकूल स्थितीतही परात्पर गुरुदेवांवर दृढ श्रद्धा असणार्‍या सौ. छाया देशपांडे ! – सद्गुरु नंदकुमार जाधव

सद्गुरु नंदकुमार जाधव

• सौ. देशपांडे यांना प्रथम सहसाधकांविषयी बर्‍याच प्रतिक्रिया यायच्या; पण आता त्यांना प्रतिक्रिया येत नाहीत. हा त्यांच्यातील पालट आहे. साधकांचा उत्साह वाढावा आणि त्यांनी सेवा करावी, यासाठी त्या साधकांना प्रोत्साहन देतात, तसेच त्यांच्या अडचणीही सोडवतात.

• मध्यंतरी त्यांचे शस्त्रकर्म होते. तेव्हाही त्या सतत परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे स्मरण करत होत्या. ‘तेच माझे शस्त्रकर्म करणार असल्याने त्रास होणार नाही’, अशी त्यांची दृढ श्रद्धा होती. प्रत्यक्षातही त्यांना कोणताही त्रास झाला नाही.

• सौ. छाया देशपांडे आणि त्यांचे यजमान श्री. गणेश देशपांडे यांनी स्वतःचे घर सनातन संस्थेला अर्पण केले आहे. हा त्यांचा त्यागच आहे.

सौ. छाया देशपांडे यांचे मनोगत !

सौ. छाया देशपांडे

• आध्यात्मिक पातळी घोषित होणे ही परात्पर गुरुमाऊलींची कृपा !

• माझी आध्यात्मिक पातळी घोषित होणे, ही परात्पर गुरुमाऊलींची कृपा आहे. प्रत्यक्षात माझे काहीच प्रयत्न नाहीत. त्यामुळेच हे सर्व देवानेच करून घेतले आहे.

सौ. छाया देशपांडे यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केलेले मनोगत !

परात्पर गुरुदेवांनीच माझ्या कुटुंबियांची आध्यात्मिक प्रगती करून घेतली ! – गणेश देशपांडे (यजमान)

माझ्या कुटुंबात परात्पर गुरुदेवांनी प्रथम माझी आई (कै. मथुराबाई देशपांडे) हिची आध्यात्मिक प्रगती करून घेतली. त्यानंतर माझी भावजय सौ. कल्पना देशपांडे, तसेच नातवंडे यांची आध्यात्मिक प्रगती झाली. (यासंदर्भातील सविस्तर माहिती बाजूच्या सारणीत दिली आहे.) ‘गुरुदेव कुणालाच सोडत नाहीत, ते सर्वांना मोक्षापर्यंत घेऊन जातात’, अशी माझी श्रद्धा आहे.

आईची आध्यात्मिक प्रगती झाल्याचे ऐकून आनंद झाला ! – पंकज देशपांडे (मुलगा) आणि सौ. स्वप्नजा जीवन तळेगावकर (मुलगी)

आई पुष्कळ तळमळीने सेवा करत होती. आई आणि वडील यांचे सेवा अन् साधना या पलीकडे काहीच विश्व नाही. आज आईची प्रगती झाली खूपच आनंद झाला.

परिस्थिती आनंदाने स्वीकारून सकारात्मक रहाणार्‍या सौ. छाया देशपांडे ! – महेश देशपांडे (दीर)

परात्पर गुरुदेवांवर असलेली अपार श्रद्धा, तसेच त्रासावर मात करून परिस्थिती आनंदाने स्वीकारून आणि सकारात्मक राहिल्यामुळे गुरुदेवांनी वहिनींना त्यांच्या त्यांना चरणांपाशी घेतले.

सौ. छायाताईंमध्ये पालट झाल्याने आध्यात्मिक प्रगती शक्य ! – सौ. कल्पना देशपांडे (जाऊ) (६२ टक्के आध्यात्मिक पातळी)

अखंड सेवा करणे, सतत सकारात्मक सत्मध्ये रहाणे आणि प्रेमभाव अशा अनेक स्तरांवर सौ. छायाताईंमध्ये पालट दिसत होता. यामुळेच त्यांची प्रगती झाली.

सौ. छाया देशपांडे यांचे आध्यात्मिक स्तरावरील कुटुंब

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक