कोल्हापूर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयास टाळे ठोकण्याचा भाजपचा प्रयत्न !

पांढरा हत्ती बनलेले प्रदूषण मंडळ ! – संपादक

कोल्हापूर, २७ जानेवारी (वार्ता.) – महानगरपालिकेकडे साठलेला आणि कुठलीही प्रक्रिया न केलेला कचरा बावडा परिसरातील शेतामध्ये पसरल्याचा प्रकार उघडकीस आणला होता. त्या वेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांनी केलेल्या पंचनाम्यात त्याठिकाणी अशास्त्रीय पद्धतीने आणि पर्यावरणाची कोणतीही काळजी न घेता कचरा टाकल्याचा उल्लेख केला होता. त्यानंतर वारंवार पाठपुरावा करूनही गेल्या २१ दिवसांत प्रदूषण मंडळाने यावर कोणतीही कारवाई केली नव्हती. याचा निषेध करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी २७ जानेवारी या दिवशी कोल्हापूर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला. (पंचनामा करूनही २१ दिवसांनंतरही कारवाई न करून प्रदूषण मंडळ काय साध्य करत आहे ? जनतेच्या कररूपी पैशांतून केवळ पांढरा हत्ती बनलेले प्रदूषण मंडळ आता शासनाने विसर्जित करावे ! – संपादक)

टाळे ठोकण्याचा प्रयत्न करणार्‍या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवल्याने भाजप कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात धक्काबुक्की झाली. या वेळी पोलिसांनी काही काळ कार्यकर्त्यांना कह्यात घेतले होते. (जनतेच्या तक्रारीवर प्रदूषण मंडळ निष्क्रीय रहात असल्याने मंडळाला जाग आणण्यासाठी नागरिकांमधून अशा प्रकारे उद्रेक होऊन टाळे ठोकण्यापर्यंत जनतेला जावे लागत आहे ! – संपादक)