गुळुंब (तालुका वाई, जिल्हा सातारा) येथे ‘मुलगी झाली हो’ या मालिकेचे चित्रीकरण चालू होते. मालिकेमध्ये जिल्ह्यातील अभिनेते किरण माने यांची महत्त्वाची भूमिका होती; मात्र काही कारणास्तव त्यांना मालिकेतून काढण्यात आले. याविषयी माने यांनी राजकीय आकस धरून मालिकेतून काढले असल्याचे स्पष्ट केले; मात्र मालिकेतील कलाकारांनी, विशेषत: महिला कलाकारांनी त्यांच्या अयोग्य वर्तनाचा पाढाच प्रसिद्धीमाध्यमांसमोर वाचून दाखवला. किरण माने यांनी मालिकेतील कलाकारांच्या प्रतिक्रियेला कोणतीही उलट प्रतिक्रिया न देता मालिकेतून काढल्याविषयी एका राजकीय पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांची भेट घेतली. माने यांना कदाचित् वाटले असेल की, आता आपल्याला मालिकेमध्ये पुन्हा घेतील; मात्र निर्मात्यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता माने यांना मालिकेत घेतलेच नाही. ‘माने यांनी राजकीय पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांची भेट घेतल्यामुळे मालिकेच्या चित्रीकरणात अडचणी येणार’, हा कयास निर्मात्यांनी बांधला होता. त्यामुळे चित्रीकरणस्थळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. प्रत्यक्षातही संभाजी ब्रिगेडच्या ९ कार्यकर्त्यांनी २० जानेवारी या दिवशी दुपारी चित्रीकरणस्थळी जाऊन गोंधळ घातला, तसेच चित्रीकरण बंद पाडण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी संभाजी ब्रिगेडच्या ९ कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंदवला.
या कारवाईमुळे मागील काही आठवणींना उजाळा मिळाला. मग ते जेम्स लेन प्रकरण असो किंवा पुणे येथील लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवल्याचे प्रकरण असो ! संभाजी ब्रिगेडची मानसिकता नेहमीच ‘सांस्कृतिक आतंकवाद’ माजवणारी ठरली आहे. ‘आम्ही म्हणू तोच इतिहास आणि आम्ही ठरवू तीच संस्कृती’ असे म्हणणार्यांची विकृती या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवली. राजकीय नेते आणि पक्षाचा पाठिंबा यांच्यावर अवलंबून सुसंस्कृत महाराष्ट्रात सांस्कृतिक आतंकवाद माजवण्याचा प्रयत्न केला जात आहे; परंतु ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील कलाकार, निर्माता, दिग्दर्शक यांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता किरण माने यांना मालिकेतून काढण्याचा ठाम निर्णय घेतला. मालिकेच्या चमूने समाजविघातक सांस्कृतिक आतंकवाद पायदळी तुडवत संपूर्ण महाराष्ट्राला स्वाभिमानी मानसिकतेचे दर्शन घडवले. यामुळे भविष्यात नाट्य आणि कलाक्षेत्र तरी राजकारण्यांच्या दबावापासून मुक्त राहील, अशी आशा व्यक्त करूया !
– श्री. राहुल देवीदास कोल्हापुरे, सातारा