माझे ट्विटरवरील ‘फॉलोअर्स’ (समर्थक) वाढू नयेत; म्हणून केंद्र सरकारचा ट्विटरवर दबाव ! – राहुल गांधी यांचा आरोप

नवी देहली – काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी आरोप केला आहे, माझे ट्विटरवरील ‘फॉलोअर्स’ (समर्थक) वाढू नयेत; म्हणून केंद्र सरकारचा ट्विटरवर दबाव आहे.’ यासंदर्भात राहुल गांधी यांनी ट्विटरला एक पत्र लिहिले आहे. यात त्यांनी लिहिले आहे की, ट्विटर भारत सरकारच्या दबावाखाली माझे नवीन फॉलोअर्स वाढू न देता ते मर्यादित करण्याचा प्रयत्न करत आहे. ऑगस्ट २०२१ मध्ये माझे खाते लॉक झाल्यापासून माझे फॉलोअर्स होते तेवढेच असून वाढत नाहीत.

या पत्रामध्ये काही तपशीलवार माहिती देण्यात आली आहे. यात म्हटले आहे की, प्रतिमहा सरासरी २ लाख ३० सहस्रांहून अधिक नवीन फॉलोअर्स वाढत होते. काही मासांमध्ये हा आकडा ६ लाख ५० सहस्रांपर्यंत गेला होता; परंतु ऑगस्ट २०२१ पासून मासाला केवळ २ सहस्र ५०० फॉलोअर्स वाढत आहेत. ऑगस्ट मासापासून ते आतापर्यंत माझे १ कोटी ९५ लाख फॉलोअर्स गोठवण्यात आले. ट्विटर भारतातील हुकूमशाहीच्या वाढीस सक्रीपणे साहाय्य करत नाही, याची निश्‍चिती करण्याची तुमचे मोठे दायित्व आहे. जगभरातील उदारमतवादी लोकशाही आणि हुकूमशाही यांच्यातील वैचारिक लढाई सामाजिक माध्यमांवर उदयास येत आहे. यामुळे ट्विटरसारख्या आस्थापनांचे नेतृत्व करणार्‍यांवर मोठे दायित्व आहे.