|
शिरोली पुलाची (जिल्हा कोल्हापूर), २६ जानेवारी (वार्ता.) – येथील ग्रामस्थांनी सरपंच शशिकांत खवरे यांच्या नेतृत्वाखाली तलाठी आणि सर्कल यांच्या निष्क्रीय अन् भ्रष्ट कारभाराचा निषेध करत दोन्ही कार्यालयांना टाळे ठोकले. या वेळी उपसरपंच सुरेश यादव, तंटामुक्त अध्यक्ष सतीश पाटील, ग्रामपंचायत सदस्य बाजीराव पाटील, सूर्यकांत खटाळे, ज्योतिराम पोर्लेकर, उत्तम पाटील, प्रल्हाद खवरे, बाजीराव सातपुते आदी उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांपासून सरपंच शशिकांत खवरे यांच्याकडे शिरोली ग्रामस्थांनी तलाठी आणि सर्कल यांच्या कामकाजाविषयी तक्रारी मांडल्या होत्या. त्यावर प्रत्यक्ष कार्यालयात जाऊनच सरपंच खवरे यांनी खरेदी दस्ताची १ ते २ वर्षे नोंद करण्यात आलेली नाही यांसह ग्रामस्थांच्या तक्रारींचा पाढा वाचला. या वेळी सरपंचांनी सर्कल यांना तलाठ्यांविषयी इतक्या तक्रारी असूनही तलाठ्यांवर कारवाई का करण्यात आली नाही ? असा प्रश्न उपस्थित केला. नागरिकांनी या वेळी तलाठी कामासाठी पैसे मागत असल्याचा आरोपही खवरे यांनी केला.