सनातनचे ७ वे संत पू. पद्माकर होनप (वय ७३ वर्षे) यांनी साधकांची आठवण काढल्यावर किंवा साधकांना होणार्‍या त्रासाविषयी त्यांना सांगितल्यावर साधकांचा त्रास न्यून होणे

पू. पद्माकर होनप

१. साधकांना होत असलेल्या त्रासाविषयी स्थुलातून काही माहिती नसूनही पू. पद्माकर होनप यांनी त्याच वेळी त्यांची आठवण काढणे

‘पू. बाबा (सनातनचे ७ वे संत पू. पद्माकर होनप) सहज बोलतांना काही साधकांची आठवण काढून त्यांची विचारपूस करतात. त्याविषयी मी संबंधित साधकांना सांगितल्यावर लक्षात आले, ‘ज्या वेळी पू. बाबांनी त्यांची आठवण काढलेली असते, त्या वेळी त्या साधकांना आध्यात्मिक त्रास होत असतो किंवा घरी गेलेल्या काही साधकांना काही अडचण आलेली असते; पण बाबांनी त्यांची आठवण काढलेली असते, त्या वेळी त्रास होत असलेल्या साधकांचा त्रास न्यून होतो किंवा वैयक्तिक अडचणी असलेल्या साधकांना एक प्रकारची ऊर्जा मिळून त्या प्रसंगात स्थिर रहाण्याची शक्ती मिळते.’

सुश्री (कुमारी) दीपाली होनप

२. पू. पद्माकर होनप यांनी साधकाची आठवण काढल्यावर अथवा साधकांना होणार्‍या त्रासाविषयी त्यांना  केवळ सांगितल्यावर त्याच वेळी साधकाचा त्रास न्यून होणे

मी पू. बाबांना एखाद्या साधकाला त्रास होत असल्याचे सांगते. त्यानंतर त्याविषयी मी त्या साधकाला सांगितल्यावर त्याच्या बोलण्यावरून माझ्या लक्षात येते, ‘जेव्हा मी त्या साधकाचा त्रास पू. बाबांना सांगते, त्याच वेळी त्या साधकाचा त्रास न्यून झालेला असतो.’

यावरून ‘पू. बाबांची साधकांवर असलेली प्रीती’, ‘त्यांचा त्रास लवकर न्यून व्हावा’, यासाठीची तळमळ आणि आध्यात्मिक स्तरावर उपाय करण्याची अफाट क्षमता’ माझ्या लक्षात आली.

साधकांना आलेल्या अनुभूती मी पू. बाबांना सांगितल्यावर त्यांचा भाव जागृत होतो. त्या वेळी त्यांच्या डोळ्यांतून अश्रू येतात आणि ते म्हणतात, ‘‘मी कुठे काय करतो ? सगळे परम पूज्यांचेच आहे.’’ त्यानंतर ते एका वेगळ्या भावावस्थेत गेल्याचे मला जाणवते. त्यांची ती भावावस्था पाहून माझीही भावजागृती होते.’

– सुश्री (कुमारी) दीपाली होनप (मुलगी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.१२.२०२१)


पू. पद्माकर होनप यांनी आकाशातील विमानाला सहजतेने नमस्कार करणे आणि ‘मी विमानातील प्रवाशांच्या हृदयातील ईश्वराला नमस्कार केला’, असे त्यांनी सांगणे

‘पू. बाबा (सनातनचे ७ वे संत पू. पद्माकर होनप) आश्रमातील आगाशीत फिरायला जातात. एकदा फिरून झाल्यावर ते तेथील आसंदीत बसून आकाशाकडे बघत होते. मी त्यांना जेवायला बोलावण्यासाठी आगाशीत गेल्यावर मला दिसले की, पू. बाबा आकाशातून जाणार्‍या विमानाकडे पाहून हात जोडून नमस्कार करत आहेत. त्या वेळी ‘ते वेगळ्या अवस्थेत आहेत’, असे मला जाणवले. ते पूर्ववत् झाल्यावर मी हळूच जाऊन त्यांना विचारले, ‘‘बाबा, तुम्ही विमानाला नमस्कार केलात का ?’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘मी विमानातील प्रवाशांच्या हृदयातील ईश्वराला नमस्कार केला.’’ त्या वेळी प्रत्येक जिवामध्ये भगवंत पहाणार्‍या पू. बाबांच्या चरणी मी मनोमन वंदन केले आणि ‘मलाही असा भाव ठेवता येऊ दे’, अशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी प्रार्थना केली.’

– सुश्री (कुमारी) दीपाली होनप (मुलगी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.१२.२०२१)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक