भाजप सरकारी यंत्रणेचा वापर करत असल्याचा काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड या पक्षांचा आरोप

डावीकडून सुनील कवठणकर आणि दुर्गादास कामत

पणजी, २६ जानेवारी (वार्ता.) – विरोधी पक्षांकडून आपला पराभव होईल, या भीतीने विरोधी पक्षांचा प्रचार रोखण्यासाठी भाजप सरकारी यंत्रणेचा वापर करत आहे, असा आरोप काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड या पक्षांनी केला आहे. गोवा प्रदेश काँग्रेसचे महासचिव सुनील कवठणकर आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे महासचिव दुर्गादास कामत यांनी २४ जानेवारीला पणजी येथे पत्रकार परिषद घेतली. या वेळी ते म्हणाले, ‘‘आमच्या पक्षांच्या विरोधात जर भाजपने अनावश्यक कारवाई केली, तर भाजपला त्याचे परिणाम भोगावे लागतील.’’

काँग्रेसचे सुनील कवठणकर म्हणाले, ‘‘लोकशाहीची तत्त्वे धोक्यात आली आहेत. भाजपचे नेते १० किंवा त्याहून अधिक समर्थकांसह त्यांचा प्रचार करत आहेत; परंतु त्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई केली जात नाही. आम्ही सर्व नियम पाळून प्रचार केला, तरी आमची छळवणूक केली जात आहे. भाजपला निराशा आली असून ते विरोधी पक्षातील नेत्यांना लक्ष्य करत आहेत.’’

गोवा फॉरवर्डचे दुर्गादास कामत म्हणाले, ‘‘काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड युतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना न्यायालयात उभे रहावे लागेल. मुख्यमंत्री त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करून विरोधी पक्षांची छळवणूक करत आहेत. याविषयी आम्ही गप्प बसणार नाही. भाजपच्या या कृतीविषयी आम्ही देहली येथे निवडणूक आयोगाला कळवणार आहोत. सध्या सरकारी अधिकारी भाजप सरकारच्या हातातील बाहुले बनले आहे.’