जगत्‌विख्यात वायोलिनवादक यहुदी मेन्युहिन यांनी नेहरूंना पाठवलेल्या पत्रातील लिखाण !

विदेशींना भारताचे महत्त्व कळणे; पण हिंदूंना न कळणे ! – संपादक 

१. ‘मी जेव्हा भारतासंबंधी विचार करतो, तेव्हा भारतातच प्रकर्षाने आढळणारी एक विशेष गुणसंपदा माझ्या दृष्टीसमोर उभी रहाते. ती म्हणजे प्राचीन दंतकथेतील ‘एडनच्या बगीच्या’तील आदिमानवासारखी असणारी निरागसता. असे वाटू लागते की, भारत म्हणजेच तेथील खेडी, तेथील लोकांची धीर-गंभीर उदात्तता, तेथील जीवनातील मनोज्ञ, सौंदर्यपूर्ण सुसंवादित्व !

२. भारत म्हटले की, माझ्या मनात विचार येतो तो तेथील मंदिरांचा, भारतियांच्या सौजन्ययुक्त सामर्थ्याचा, सहनशीलतेशी हातात हात घालून चालणार्‍या चिकाटीचा, शहाणपणा आणि चातुर्य असूनही आढळणार्‍या सरलतेचा, तसेच तेथील सर्वांगपरिपूर्ण समृद्ध जीवनाचा !

३. हिंदूंमध्ये मला दर्शन होते परंपरागत प्रतिष्ठित असलेल्या मनाच्या मोठेपणाचे आणि सहिष्णुतेचे !

४. जीवनात येणारी सुखे-दुःखे यांची तीव्रता आणि व्यापकता अनुभवतांनाही आपली उदात्त उदासीन वृत्ती ढळू न देण्याची विलक्षण क्षमता अन् कर्तृत्वाने प्राप्त होणारे दिव्य समाधान अनुभवतांनाही टिकून असणारी विनम्रता, ही या खेड्यांची वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे आहेत.’

(संदर्भ : त्रैमासिक ‘प्रज्ञालोक’ ऑक्टोबर १९८४)