पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांतील आणि गोवा राज्यातील ४०० हून अधिक शिक्षकांचा शिबिरामध्ये ‘ऑनलाईन’ सहभाग !
अनेकांना ‘संपूर्ण वन्दे मातरम्’ किती कडव्यांचे आहे, हेही ठाऊक नाही ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडयेसध्या धर्मशिक्षण आणि राष्ट्ररक्षण यांविषयी कुठेही जागृती केली जात नसल्याने अनेक विद्यार्थी अन् पालक यांना ‘संपूर्ण वन्दे मातरम्’ किती कडव्यांचे आहे, हेही ठाऊक नाही. |
सोलापूर – सध्या कोणत्याही विद्यालयात किंवा महाविद्यालयात विद्यार्थ्यांना धर्मशिक्षण मिळत नसल्याने त्यांच्यामध्ये धर्माभिमान निर्माण होत नाही. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना धर्मशिक्षण दिल्यास ते देशाचे आणि धर्माचे उज्ज्वल भवितव्य घडवू शकतात. शाळा आणि महाविद्यालय येथे विद्यार्थ्यांना स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया शिकवल्यास त्यांच्यात नैतिकता येण्यास साहाय्य होईल, तसेच एक आदर्श पिढी जगासमोर उभी राहील. त्यामुळे त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये धर्माभिमान निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांतील आणि गोवा राज्यातील शिक्षकांसाठी ‘ऑनलाईन’ शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्या मार्गदर्शन करत होत्या. या शिबिरामध्ये ४०० हून अधिक शिक्षक ‘ऑनलाईन’ सहभागी झाले होते.
शिबिराचा उद्देश हिंदु जनजागृती समितीचे भोर (जिल्हा पुणे) येथील प्राध्यापक श्रीकांत बोराटे यांनी सांगितला, तर सूत्रसंचालन सौ. सुनिता पंचाक्षरी यांनी केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण गोवा आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये यांनीही शिक्षकांना मार्गदर्शन केले.
शिबिराचा उद्देश
भारताकडे ज्ञानशक्तीमुळे संपूर्ण जग आकर्षित होते. सध्या राष्ट्र आणि धर्म यांविषयी जागृती करणारे शिक्षण कुठेही दिले जात नाही. त्यामुळे आजच्या तरुण पिढीमध्ये राष्ट्रतेज आणि धर्मतेज निर्माण होण्यासाठी शिक्षक या नात्याने आपण कोणते प्रयत्न करू शकतो, याविषयी शिक्षकांना अवगत व्हावे, या उद्देशाने शिबिराचे आयोजन हिंदु जनजागृती समितीने केले होते.
मुलांमध्ये नैतिकता रुजवण्याचे मोठे दायित्व शैक्षणिक क्षेत्रावर ! – मनोज खाडये, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि गुजरात राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती
मनुष्याची व्यावहारिक आणि आध्यात्मिक प्रगती साधली जाते, ते खरे ज्ञानदान होय. आतापर्यंत शिक्षणव्यवस्थेवर अनेक धार्मिक आक्रमणे झाली, परकीय आक्रमकांकडून भारतीय शिक्षणपद्धतीचा विध्वंस करण्यात आला. सध्या धर्मशिक्षणाच्या अभावामुळे नैतिकतेचे धिंडवडे निघत आहेत. त्यामुळे मुलांमध्ये नैतिकता रुजवण्याचे मोठे दायित्व शैक्षणिक क्षेत्राचे आहे. राष्ट्रीय ऋणातून मुक्त होण्याची जाणीव सध्याच्या भावी पिढीला कुणीही करून देत नाही. जिथे राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव नाही, तेथे धर्मकर्तव्याची जाणीव दूरच रहाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना धर्मशिक्षण देऊन ‘हिंदु राष्ट्र संघटक’ बनवण्याचे दायित्व शिक्षकांचे आहे.
विशेष१. शिबिरात सहभागी झालेल्या शिक्षकांनी ‘आपण मुलांमध्ये नैतिकता निर्माण करण्यासाठी, तसेच त्यांना धर्मशिक्षण देण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न करत आहोत आणि यापुढे कसे प्रयत्न करणार’, याविषयी सांगितले. २. या वेळी गोवा येथील शिक्षिका सुरेखा पाटील म्हणाल्या, ‘‘स्वत:समवेत अन्य शिक्षकांपर्यंतही हा विषय पोचण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. यापुढे आम्ही अन्य शिक्षकांपर्यंत हा विषय पोचवण्याचा प्रयत्न करू. ’’ ३. शिबिरानंतर अनेक शिक्षकांनी शिबिरातील विषय आवडल्याचे कळवले, तसेच यापुढे मुलांना धर्मशिक्षण देण्याचाही निर्धार शिक्षकांनी व्यक्त केला. |