परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने त्यांच्या सत्संगात शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगात साधिकेला जाणवलेली आणि शिकायला मिळालेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सत्संगात केलेले मार्गदर्शन

अश्‍विनी कुलकर्णी

अ. ‘आपल्या वाणीत चैतन्य असेल, तर अन्य व्यक्ती किंवा साधक यांना ‘आपण सांगितलेले ऐकून त्यावर कृती करावी’, असे वाटते. त्यासाठी आपण अधिकाधिक नामजप करायला हवा आणि भावजागृतीचे प्रयत्न वाढवायला हवेत.

आ. व्यष्टी साधनेत शब्दांपेक्षा देव आणि गुरु यांच्याप्रतीच्या भावाचे महत्त्व अधिक आहे. समष्टी साधनेत ‘शब्द’ हे संवादाचे माध्यम असते.

इ. ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे. ज्ञान अनंत आहे. ज्ञान कितीही मिळवले, तरी ‘अजून ज्ञान मिळायला हवे’, असे वाटते. त्यामुळे ईश्वराशी एकरूपता साधण्यासाठी वेळ लागतो. याउलट भक्तीमुळे स्वतःला भगवंताशी सहजतेने जोडता येते.

ई. आई-वडिलांची सेवा करतांना ‘संतसेवा करत आहे’, असा भाव ठेवला, तर त्यातूनही आपली साधना होईल.

उ. आपण घरी रहातांना ‘भगवंताच्या घरात रहात आहोत’, असा भाव ठेवला, तर घराविषयीची आसक्ती उणावून ‘साक्षीभाव’ निर्माण होतो.

ऊ. ज्याच्यात जिज्ञासा, तळमळ आणि भाव असतो, त्यालाच देव शिकवतो.

ए. दैनिक ‘सनातन प्रभात’शी संबंधित सेवा करणार्‍या साधकांकडून झालेल्या चुका दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये छापून येतात. ‘दैनिक ‘सनातन प्रभात’ चांगले बनवणे’, एवढेच आपले ध्येय नाही, तर ‘दैनिक ‘सनातन प्रभात’शी संबंधित सेवा करणारे साधक ‘चांगले साधक बनवणे’, हे आपले ध्येय आहे.

ऐ. आपण एखादी सेवा केली नाही, तर ती सेवा अन्य साधक करू शकतील; मात्र आपली व्यष्टी साधना आपणच करायला हवी. ती अन्य कुणीही करू शकत नाही.’

२. सत्संगात जाणवलेली सूत्रे

२ अ. बालसाधकांची उच्च आध्यात्मिक पातळी आणि त्यांच्यातील भाव पाहून ‘सतत शिकण्याच्या स्थितीत राहून भावपूर्ण साधना केली पाहिजे’, असे जाणवणे : सत्संगात ‘देवतांची चित्रे, सूर्यदेवाची प्रतिमा आणि सूक्ष्म गंध’ यांविषयी घेतलेल्या प्रयोगांत तेथे उपस्थित असलेल्या दैवी बालकांना अत्यंत उच्चस्तरीय अनुभूती आल्या. ते बालसाधक ज्या शब्दांत त्यांना जाणवलेली सूत्रे किंवा अनुभूती सांगत होते, ते ऐकून ‘त्यांची मागील आणि वर्तमान जन्मांतील साधना चांगली असल्यानेच त्यांची क्षमता, त्यांच्यातील भाव अन् त्यांची आध्यात्मिक पातळी उच्च आहे. आपणही शिकण्याच्या स्थितीत राहून तळमळीने आणि भावपूर्ण साधना केल्यानेच आपला उद्धार होणार आहे. त्यासाठी ‘आपण भगवंताच्या चरणी शरण जायला हवे’, असे मला जाणवले.

२ आ. सर्वसामान्य व्यक्तीपेक्षा साधकांमध्ये गुणग्राहकता आणि अंतर्मुखता अधिक असणे : समाजातील व्यक्ती नेहमी ‘मी काय केले ? मला कसे चांगले जमले ? इतरांच्या चुका किंवा स्वभावदोष’, इत्यादींविषयी सांगतात. याउलट साधक संकुचित विचार करीत नाहीत. साधक ‘ते साधनेत किंवा सेवेत कुठे अल्प पडले ? कुटुंबीय आणि साधक यांचे जाणवलेले गुण अन् त्यांनी केलेले साहाय्य’ यांविषयी सांगतात.

२ इ. सेवा करत असलेल्या यंत्रांप्रतीही कृतज्ञताभाव असायला हवा ! : श्रीमती क्षमा राणेकाकूंनी सांगितले, ‘‘बेकरीतील यंत्रे त्यांच्याशी बोलतात आणि यंत्रे त्यांना सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सांगतात आणि सेवा झाल्यावर सर्व यंत्रे कृतज्ञता व्यक्त करतात.’’ तेव्हा ‘मला प्रतिदिन माझ्या सेवेत संगणक, भ्रमणभाष, अन्य कितीतरी यंत्रे साहाय्य करतात. त्यामुळे राणेकाकूंप्रमाणे माझ्यात कृतज्ञताभाव असायला हवा आणि तसा भाव निर्माण होण्यासाठी देवाला सतत शरण जायला हवे’, याची मला जाणीव झाली.

२ ई. भगवंत आणि भक्त यांच्यातील अद्वैत अनुभवणे : कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) त्यांच्या खोलीतील श्रीकृष्णाच्या चित्रात झालेल्या पालटांविषयी सांगत असतांना परात्पर गुरु डॉक्टरांचे मुखकमल गुलाबी दिसू लागले. त्या वेळी मधुराताईच्या मनात ‘आपले गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) आपल्यासाठी किती करतात !’, हा भाव दाटून आला होता आणि गुरुदेवांच्या मुखकमलावर ‘हिच्यात किती भक्ती आहे ?’, असा प्रीतीस्वरूप गुलाबी रंग निर्माण झाला. ‘हेच भक्त आणि भगवंत यांच्यातील अद्वैत आहे’, असे मला जाणवले.

३. सत्संगात आलेल्या अनुभूती

३ अ. ‘सत्संग वेगळ्या लोकात चालू आहे’, असे मला जाणवले. सर्वांना हे सूत्र सांगतांना माझ्या शरिरावर रोमांच येऊन माझी भावजागृती झाली.

‘हे गुरुमाऊली, केवळ आपल्या कृपेनेच मला ही सूत्रे शिकायला मिळाली’, त्यासाठी मी आपल्या पावन चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– अश्विनी कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक