पौष मासातील (२३.१.२०२२ ते २९.१.२०२२ या सप्ताहातील) शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व

‘३.१.२०२२ या दिवसापासून पौष मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

१. हिंदु धर्मानुसार ‘प्लव’ नाम संवत्सर, शालिवाहन शक – १९४३, उत्तरायण, हेमंतऋतू, पौष मास आणि कृष्ण पक्ष चालू आहे.

(संदर्भ : दाते पंचांग)

२. शास्त्रार्थ

सौ. प्राजक्ता जोशी

२ अ. अमृतयोग : नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने ‘अमृतयोग’ किंवा ‘अमृतसिद्धीयोग’ होतो. रविवारी हस्त नक्षत्र, सोमवारी मृग नक्षत्र, मंगळवारी अश्विनी नक्षत्र, बुधवारी अनुराधा नक्षत्र, गुरुवारी पुष्य नक्षत्र, शुक्रवारी रेवती नक्षत्र आणि शनिवारी रोहिणी नक्षत्र असेल, तर ‘अमृतयोग’ किंवा ‘अमृतसिद्धीयोग’ होतो. अमृतयोगावर कोणतेही शुभ कार्य केल्यावर यश प्राप्त होते. रविवार, २३.१.२०२२ या दिवशी सकाळी ११.०९ पासून २४.१.२०२२ या दिवशी सूर्याेदयापर्यंत हस्त नक्षत्र असल्याने अमृतयोग आहे.

२ आ. भद्रा (विष्टी करण) : ज्या दिवशी ‘विष्टी’ करण असते, त्या काळालाच ‘भद्रा’ किंवा ‘कल्याणी’ असे म्हणतात. भद्रा काळात शुभ आणि मंगल कार्ये करत नाहीत; कारण त्या कार्यात विलंब होण्याचा संभव असतो. २४.१.२०२२ या दिवशी सकाळी ८.४४ पासून रात्री ८.२० पर्यंत आणि २७.१.२०२२ या दिवशी दुपारी ३.२९ पासून उत्तररात्री २.१७ पर्यंत विष्टी करण आहे.

२ इ. कालाष्टमी : प्रत्येक मासातील प्रदोषकाळी असलेल्या कृष्ण अष्टमीला ‘कालाष्टमी’ म्हणतात. कालाष्टमीच्या दिवशी शिवोपासना करतात. या दिवशी शिवाच्या भैरव स्वरूपाची उपासना करतात. २५.१.२०२२ या दिवशी सकाळी ७.४९ पासून २६.१.२०२२ या दिवशी सकाळी ६.२६ पर्यंत अष्टमी तिथी आहे. या दिवशी अष्टमी तिथी सूर्याेदयसमयी नसल्याने तिथी क्षय झाला आहे. क्षयतिथीला उपासनेचे महत्त्व अधिक असते.

२ ई. घबाड मुहूर्त : हा शुभ मुहूर्त आहे. २७.१.२०२२ या दिवशी सकाळी ८.५१ पासून उत्तररात्री २.१७ पर्यंत घबाड मुहूर्त आहे.

२ उ. षट्तिला एकादशी : पौष कृष्ण पक्षातील एकादशीला ‘षट्तिला एकादशी’ म्हणतात. या दिवशी तिळाच्या तेलाने मसाज करून तीळमिश्रित पाण्याने स्नान करतात. तिळाचे दान आणि हवन करून तीळमिश्रित प्रसाद भक्षण करतात. या दिवशी भगवान विष्णूची पूजा करतात.

२ ऊ. शनिप्रदोष : प्रत्येक मासातील शुक्ल आणि कृष्ण त्रयोदशीला ‘प्रदोष’ असे म्हणतात. शनिवारी येणार्‍या प्रदोष तिथीला ‘शनिप्रदोष’ म्हणतात. २९.१.२०२२ या दिवशी शनिप्रदोष आहे. संतती सुखासाठी आणि जीवनात येणार्‍या अडचणींच्या निवारणार्थ शनिप्रदोष हे व्रत करतात. प्रदोष या व्रताची देवता ‘शिव’ आहे. या दिवशी सायंकाळी शिवपूजन करावे. शिवकवच आणि शिवमहिम्नस्तोत्र वाचावे.

– सौ. प्राजक्ता जोशी (ज्योतिष फलित विशारद, वास्तू विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल शास्त्री, हस्ताक्षर मनोविश्लेषणशास्त्र विशारद, हस्तसामुद्रिक प्रबोध), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (७.१.२०२२)

टीप १ – ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याेदयानंतर वार पालटतो.

टीप २ – अमृतयोग, भद्रा (विष्टी करण), क्षयदिन, कालाष्टमी, घबाड मुहूर्त, एकादशी आणि प्रदोष यांविषयीची अधिक माहिती पूर्वी प्रसिद्ध केली आहे.

टीप ३ – वरील सारणीतील शुभ / अशुभ दिवस पाहून ‘दिवस अशुभ आहे’, हे कळल्यावर ‘प्रवास किंवा इतर सेवा केल्यास त्याचे अशुभ परिणाम भोगावे लागतील’, अशी शंका साधकांच्या मनात निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा साधकांनी संतांची पुढील वचने लक्षात ठेवावीत.

१. हरिचिया दासा हरि दाही दिशा । भावें जैसा तैसा हरि एक ।। – संत एकनाथ

अर्थ : भक्ताला सर्वत्र देवाचेच दर्शन होते. भक्ताचा जसा भाव असतो, त्या स्वरूपात त्याला देव दिसतो.

२. तुका म्हणे हरिच्या दासा । शुभ काळ दाही दिशा ।। – संत तुकाराम

अर्थ : तुकाराम महाराज म्हणतात, ‘भक्तासाठी सर्व दिशा आणि वेळ ही शुभच असते.’

ज्या व्यक्तीच्या मनात सतत ईश्वरप्राप्तीचा ध्यास आहे, अशा भक्ताची काळजी ईश्वर घेतो.’