५८ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली पुणे येथील चि. तन्मयी पुष्कर महाकाळ (वय २ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. तन्मयी महाकाळ ही या पिढीतील एक आहे !

चि. तन्मयी महाकाळ
‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’

– परात्पर गुरु डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

सर्व सूत्रे संग्राह्य असलेला लेख लिहिणार्‍या महाकाळ कुटुंबियांचे अभिनंदन !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘२० जानेवारी २०२२ या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘५८ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली पुणे येथील चि. तन्मयी पुष्कर महाकाळ (वय २ वर्षे) !’ या मथळ्याखाली चि. तन्मयीचे बाबा श्री. पुष्कर, आई सौ. गौरी महाकाळ आणि आजी (आईची आई) सौ. अनिता बुणगे यांनी लिहिलेला लेख प्रसिद्ध झाला आहे. या लेखातून तन्मयीची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये कळली. सर्व सूत्रे समष्टीला शिकता येण्यासारखी आहेत, तसेच संग्राह्य असलेला हा पहिलाच लेख आहे. या लेखासाठी सर्वांचे कौतुक करावे तेवढे थोडे !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२०.१.२०२२)

१. गर्भधारणा होण्यापूर्वी

१ अ. स्वप्नात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी एका संतांचे छायाचित्र दाखवून ‘तू यांचे चरण कधीच सोडू नकोस’, असे सांगणे, नंतर एक आपट्याचे पान देऊन ‘हे सांभाळून ठेव’, असे सांगणे आणि त्यानंतर गर्भधारणा होणे : ‘मला गर्भधारणेपूर्वी पुढील स्वप्न पडले, ‘मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आहे. तिथे एक मोठा कार्यक्रम चालू आहे. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी मला एका संतांचे छायाचित्र दाखवले आणि त्या मला म्हणाल्या, ‘या संतांमध्ये आपल्या डोळ्यांना दिसते, त्यापेक्षा पुष्कळ अधिक शक्ती आहे. तू त्यांचे चरण कधीच सोडू नकोस. त्यांचे आर्ततेने स्मरण कर, म्हणजे तू नक्कीच देवापर्यंत पोचशील.’ त्यानंतर त्यांनी सुंदर हास्य केले. तेव्हा मला त्या साक्षात् देवीच दिसत होत्या. त्यांनी मला एक आपट्याचे पान दिले आणि सांगितले, ‘हे सांभाळून ठेव.’ त्यानंतर ‘मला गर्भधारणा झाली’, असे माझ्या लक्षात आले.’ – सौ. गौरी पुष्कर महाकाळ (आई), पुणे

१ आ. पहाटे नामजप करतांना ‘आजी होणार’, असे ३ वेळा ऐकू येणे आणि त्यानंतर सून गरोदर असल्याचे समजणे : ‘सौ. गौरी गरोदर रहाण्याआधी एकदा मी पहाटे नामजप करतांना मला ‘आजी होणार’, असे ३ वेळा ऐकू आले. काही दिवसांनी गौरी घरी आल्यावर मी तिला ही अनुभूती सांगितली. त्यानंतर काही दिवसांनी गौरी गरोदर असल्याचे आम्हाला समजले.’ – सौ. स्वाती रवींद्र महाकाळ (आजी (वडिलांची आई)), पनवेल

सौ. गौरी महाकाळ

२. जन्मापूर्वी

अ. ‘माझा अस्वस्थ आणि चिडचिड्या स्वभावाच्या काही व्यक्तींशी संपर्क आल्यास माझ्या पोटातील गर्भ अस्वस्थ होऊन अधिक हालचाल करायचा आणि ‘त्या ठिकाणाहून निघून जावे’, असे वाटून मी तिथून निघून जायचे.

आ. आठव्या मासात माझा रक्तदाब पुष्कळ वाढला. तेव्हा आधुनिक वैद्यांनी मला सांगितले, ‘‘१५ दिवस तरी रक्तदाब नियंत्रित रहायला हवा.’’ त्या वेळी मी सनातनचे १९ वे संत पू. रमेश गडकरी (वय ६४ वर्षे) यांना याविषयी विचारल्यावर त्यांनी मंत्रजप आणि नामजप करायला सांगितला. मी ते उपाय सलग २ दिवस केले. त्यानंतर पुढील १५ दिवसांत माझा रक्तदाब न्यून होऊन स्थिर झाला.

इ. गरोदरपणी मला स्वप्नात विविध देवता आणि संत यांचे दर्शन होत असे.

ई. मी ‘विष्णुसहस्रनाम, अथर्वशीर्ष आणि श्रीरामरक्षा’ ही स्तोत्रे म्हणतांना किंवा आमचे साधनेविषयी बोलणे चालू असतांना माझ्या पोटातील गर्भाची अधिक हालचाल होत असे.’

– सौ. गौरी पुष्कर महाकाळ

उ. ‘कु. तन्मयीच्या जन्मापूर्वी माझी पत्नी सौ. गौरी हिची आठव्या मासात ‘सोनोग्राफी’ केल्यावर आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘बाळाच्या एका हाताचे मधले बोट दुमडलेले आहे.’’ त्यांनी स्वतः ‘ते कसे दुमडले आहे ?’, हे दाखवले होते. त्या वेळी ‘ती अग्नितत्त्वाची (तेजतत्त्वाची) मुद्रा आहे’, असे माझ्या लक्षात आले.

(‘अंगठा आणि मध्यमा (मधले बोट) यांची टोके जोडल्यावर अग्नितत्त्वाची (तेजतत्त्वाची) मुद्रा होते.’ – संकलक)

श्री. पुष्कर महाकाळ

४. जन्मानंतर

४ अ. जन्म ते ६ मास

४ अ १. मुद्रा करणे : ती लहान असल्यापासूनच बोटांच्या विविध मुद्रा करते. ती अधिक प्रमाणात अग्नितत्त्वाची (तेजतत्त्वाची) मुद्रा करते.’

– श्री. पुष्कर महाकाळ (वडील), पुणे

४ अ २. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राकडे आणि श्रीकृष्णाच्या चित्राकडे पाहून हुंकार देऊन हसणे : ‘तन्मयी ३ मासांची असल्यापासून तिला दैनिक ‘सनातन प्रभात’ दाखवल्यावर ती केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राकडे बघून हसत असे. घराच्या भिंतीवर असलेले परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र आणि श्रीकृष्णाचे चित्र यांकडे पाहून आणि हसून ती हातवारे करत हुंकार देत बोलत असे.

४ अ ३. दैनिक ‘सनातन प्रभात’ न चुरगाळता हातांत धरणे : तन्मयी ६ मासांची असतांना एकदा मी तिच्या हातांत दैनिक ‘सनातन प्रभात’ दिले. तेव्हा तिने ते न चुरगळता हातांत धरले आणि त्यातील लिखाणाकडे पाहून ‘ते समजत आहे’, असा भाव तिच्या तोंडवळ्यावर होता.

४ आ. वय ७ मास ते १ वर्ष ३ मास

४ आ. सात्त्विकतेची ओढ

४ आ. १. आम्ही ‘ऑनलाईन’ सत्संग ऐकतांना त्यातील श्रीकृष्ण आणि सद्गुरु यांचा श्लोक ऐकून तन्मयी जिथे असेल, तिथून पळत येऊन श्लोक संपेपर्यंत हात जोडून उभी रहात असे. आम्ही कुणीही तिला अशी कृती करण्यासाठी शिकवले नाही.

४ आ. २. एखादे स्थान सात्त्विक असल्यास तिच्या ते लगेच लक्षात येते. एकदा आमच्या वसाहतीत दत्तजयंतीच्या निमित्ताने पूजा होती. मी तिला तिथे घेऊन गेले. तिने पूर्वी कधी दत्ताची मूर्ती पाहिली नव्हती. तेव्हा तिला नमस्कार करायला सांगण्यापूर्वीच तिने हात जोडले होते आणि ती दत्ताच्या मूर्तीकडे एकटक बघत होती.’

– सौ. गौरी पुष्कर महाकाळ

४ आ ३. ‘घरी साधक आल्यास तन्मयी लगेच त्यांच्याशी खेळायला जाते आणि रमते.

– श्री. पुष्कर महाकाळ

४ इ. वय १ वर्ष ४ मास ते २ वर्षे

४ इ १. ‘तन्मयी सतत आनंदी आणि हसतमुख असते.

४ इ २. व्यवस्थितपणा : घरातील पायपुसणी तिरकी झाली असेल किंवा दुमडली असेल, तर तन्मयी लगेच ती सरळ करते. आम्ही अंथरूण घालत असतांना तन्मयी ‘चादरीला चुण्या पडणार नाहीत’, अशा पद्धतीने चादर सरळ करते. तिला एखादी वस्तू जागेवर ठेवायला दिल्यास ती ठरलेल्या ठिकाणीच वस्तू ठेवते.’

– सौ. गौरी पुष्कर महाकाळ

४ इ ३. सहनशील : ‘तिला काही लागले, तरी ती शांतपणे सहन करते. अनेक वेळा तिला लागल्याचे आम्हाला दुसर्‍या दिवशी तिच्या अंगावरील ओरखडा किंवा रक्ताचा डाग दिसल्यावर कळते.’ – श्री. पुष्कर महाकाळ

४ इ ४. प्रेमभाव

अ. ‘ती दीड वर्षाची असतांना एकदा तिच्या हातातून वाटी खाली पडली. तेव्हा ती म्हणाली, ‘‘वाटी धप, वाटी बाऊ, वाटी औष’’, म्हणजे ‘वाटीला बाऊ झाला आणि तिला औषध लाव’, असे ती मला सांगत होती. एखादी वस्तू खाली पडल्यास तन्मयी मला त्या वस्तूला औषध लावायला सांगते.

आ. तिला इतरांना खाऊ किंवा वस्तू द्यायला आवडतात.’

– सौ. गौरी पुष्कर महाकाळ

इ. ‘आम्ही रामनाथी आश्रमात गेलो असतांना एका साधिकेने तिला बिस्किटाचा पुडा दिला. तेव्हा तिने त्यातील एक बिस्किट खाल्ले आणि दुसरे बिस्किट तिथे असलेल्या एका बालसाधिकेला स्वतःच्या हाताने भरवले.’ – श्री. पुष्कर महाकाळ

४ इ ५. गायींवर प्रेम करणे : ‘तन्मयीला गायींची विशेष आवड आहे. ती गायींच्या जवळ जायला घाबरत नाही. एकदा आम्ही तन्मयीला घेऊन ढवळी (गोवा) येथील श्री महालक्ष्मी मंदिरात गेलो होतो. ती तिथे असलेल्या गायींच्या कळपाकडे धावत गेली आणि वासरांना प्रेमाने हात लावू लागली. आम्ही मंदिराच्या बाहेर आल्यावरही एक गाय आणि काही वासरे आमच्यामागे येऊन उभी होती. नंतर आम्ही घरी जाण्यासाठी निघाल्यावर ती गाय आमचा पाठलाग करत आली. ‘आम्ही तन्मयीला घेऊन जाऊ नये’; म्हणून ती गाय आम्हाला गाडीवरही बसू देत नव्हती. तन्मयीलाही तिथून निघण्याची इच्छा नव्हती.’ – सौ. गौरी पुष्कर महाकाळ

सौ. अनिता बुणगे

४ इ ६. देवाची ओढ

अ. ‘आम्ही सर्व जण घरी आरती करतो. तेव्हा तिला पुष्कळ आनंद होतो. त्या वेळी ती आनंदाने उड्या मारत टाळ्या वाजवत स्वतःभोवती गोल फिरते.

आ. तन्मयीचे आजोबा (आईचे वडील श्री. राजन बुणगे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) देवपूजा केल्यावर देवघरासमोर साष्टांग दंडवत घालतात. तेव्हा तन्मयीही त्यांच्याप्रमाणे देवाला साष्टांग दंडवत घालते.’

– सौ. अनिता राजन बुणगे (आजी (आईची आई)), पंढरपूर

४ इ ७. आश्रमात रमणे

अ. ‘तन्मयी दीड वर्षाची असतांना आम्ही तिला घेऊन प्रथमच रामनाथी आश्रमात गेलो होतो. तिथे गेल्यावर ती माझ्या कडेवरून खाली उतरली आणि आजूबाजूचे निरीक्षण करून आनंदी झाली. एरव्ही नवीन ठिकाणी गेल्यावर ती मला जराही सोडत नाही. आम्ही आश्रमात आल्यावर ‘आई कधी एकदा मला सांगते आणि मी पळते’, असे तिला वाटत होते. मी तिला ‘जा खेळ’, असे म्हटल्यावर ती अत्यानंदाने मार्गिकेत इकडून तिकडे धावू लागली. तिच्या तोंडवळ्यावरील आनंद अवर्णनीय होता.

आ. त्यानंतर आम्हाला काही साधक भेटले. तेव्हा ती लगेच त्यांच्या पायांना बिलगून हसू लागली. एरव्ही ती नवीन व्यक्तींकडे बघतही नाही आणि जातही नाही. सर्व साधकांना ती पूर्वीची ओळख असल्याप्रमाणे आनंदाने भेटली.

इ. ती एका संतांच्या खोलीच्या खाली उभी राहून बोट वर करून ‘बाबा, बाबा’, असे म्हणत होती.’

– सौ. गौरी पुष्कर महाकाळ

५. चि. तन्मयीमधील स्वभावदोष : ‘हट्टीपणा आणि जोरात ओरडणे

‘हे श्रीकृष्णा, ‘तुझ्याच कृपेमुळे मला हे तेजस्वी बालक मिळाले आणि तुझ्या या बालरूपाची सेवा करण्याची संधी मिळाली’, यासाठी तुझ्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. गौरी पुष्कर महाकाळ (७.९.२०२१)

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.