आनंदी, सतत सेवारत असलेल्या आणि परिपूर्ण सेवेचा ध्यास असणार्‍या सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमातील कु. निधी देशमुख !

‘मला निधीताईसारखी साधना करणारी बहीण मिळाली. तिनेच मला साधनेचा मार्ग दाखवला आणि मायेत गुंतण्यापासून वाचवले. माझ्या जीवनातील प्रत्येक आध्यात्मिक घटना, उदा. साधनेला आरंभ करणे, सूक्ष्मातून ईश्वरी ज्ञान प्राप्त करण्याची सेवा करणे, पूर्णवेळ साधक होणे, आश्रमनिवासी होणे इत्यादींचे मूळ कारण माझी ताईच आहे. ती मला साधनेत साहाय्य करत असल्याने आई-बाबांच्या नंतर तीच माझ्यासाठी गुरुस्वरूप आहे. एकदा परात्पर गुरुदेवांनी सांगितले, ‘‘निधीताईचीही आध्यात्मिक उन्नती होत आहे.’’ अशा मार्गदर्शक आणि मला साधनेत साहाय्य करणार्‍या निधीताईमध्ये मला जाणवलेले पालट येथे दिले आहेत.

कु. निधी देशमुख

१. वर्ष २०२० ते २०२१ या कालावधीत कु. निधी देशमुख यांच्यात झालेले पालट 

१ अ. विविध अडचणी आल्यानंतरही परिपूर्ण सेवा करण्याचा ध्यास वाढणे : ‘निधीताईचा पूर्वीच्या तुलनेत परिपूर्ण सेवा करण्याचा ध्यास वाढला आहे. ती ‘सेवा पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या स्तरावर काय उपाययोजना करू शकतो ?’, असा विचार करून त्यानुसार कृती करते.

१ आ. ‘ऑनलाईन’ सत्संगांच्या संहितेत व्याकरणासह तात्त्विक स्तरावरील त्रुटी सांगून परिपूर्ण सेवा करण्यासाठी साधकांना साहाय्य करणे : ताईने लहानपणापासूनच अनेक संतांचे सत्संग ऐकले आहेत आणि विविध ग्रंथ वाचले आहेत. त्यामुळे तिला अध्यात्मासंबंधी अनेक गोष्टींचे चांगले ज्ञान आहे. या ज्ञानाचा उपयोग ती अनेक ‘ऑनलाईन’ सत्संगांची संहिता परिपूर्ण करण्यासाठी प्रयत्न करते. सत्संगांची संहिता परिपूर्ण होण्यासाठी ताईने ‘ऑनलाईन’ सत्संगांच्या संहितेतील केवळ व्याकरण न पडताळता त्या संहितेतील त्रुटीही साधकांना सांगायला आरंभ केला आहे.

१ इ. परिपूर्ण सेवेचा ध्यास असणे : मे-जून २०२१ मध्ये ताईच्या मनात ‘सनातन संस्थेच्या वतीने हिंदी भाषेतील ‘ऑनलाईन’ सत्संगांत काही सुधारणा होण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत’, असे विचार तीव्रतेने येऊ लागले. त्यानंतर ताईने त्यासंबंधी दायित्व असणार्‍या साधकाला सांगून संबंधित साधकांचे ४ ‘हिंदी अभ्यासवर्ग’ घेतले.

१ ई. लहानपणापासूनच वाईट शक्तींचा तीव्र त्रास असूनही सेवेत सवलत न घेणे आणि आध्यात्मिक त्रासातही अखंड सेवारत राहिल्यामुळे त्रासाची तीव्रता न जाणवणे : ताईला लहानपणापासूनच वाईट शक्तींचा तीव्र त्रास होता, तरीही तिने कधी सेवेत सवलत घेतली नाही. ती सतत सेवारत असते. ती सेवेशी एकरूप होत असल्यामुळे तिच्यावर तीव्र आध्यात्मिक त्रासाचा फारसा परिणाम होत नाही.

सप्टेंबर २०२० मध्ये ‘तिचा आध्यात्मिक त्रास न्यून झाला आहे’, हे समजल्यावर गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करतांना ती म्हणाली, ‘‘आध्यात्मिक त्रास न्यून होण्यासाठी मी काहीच प्रयत्न केले नाहीत; परंतु माझ्या आध्यात्मिक त्रासात वाढ झाल्याची जाणीव होऊ न देता गुरुदेवांनी माझ्याकडून अखंड सेवा करवून घेतली. ही त्यांची अपार कृपाच आहे.’’ ‘प्रत्यक्षात ती अखंड सेवारत राहिल्यामुळेच तिला आध्यात्मिक त्रासाची तीव्रता जाणवली नाही’, असे मला वाटते.

१ उ. वाईट शक्तीचा त्रास आणि मनातील अनावश्यक विचार येण्याचे प्रमाण न्यून झाल्यामुळे ताईचा तोंडवळा तेजस्वी दिसणे : अनेक साधिका ताईला विचारतात, ‘‘तू काय प्रयत्न केलेस ? तुझा ताेंडवळा पूर्वीपेक्षा अधिक तेजस्वी झाला आहे.’’ तिची स्वीकारण्याची वृत्तीही वाढली असल्याचे माझ्या लक्षात आले. ‘तिच्या मनात येणारे अनावश्यक विचारांचे प्रमाण न्यून होऊन तिचे गुरुदेवांशी अनुसंधान आणि साधनेची तळमळ यांत वाढ झाल्यामुळे तिचा तोंडवळा पूर्वीपेक्षा अधिक तेजस्वी दिसत आहे’, असे मला वाटते.

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगानंतर मन स्थिर असणे, ‘साधनेमुळे तिचा व्यक्त भावाकडून अव्यक्त भावाच्या दिशेने प्रवास चालू आहे’, असे वाटणे 

ताईला लहानपणापासूनच ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग मिळावा’, असे वाटते. सत्संगानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे स्मरण आणि चर्चा करत राहिल्याने तिला सत्संगातून मिळालेला उत्साह २ – ३ आठवड्यांपर्यंत टिकून रहात असे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभल्यानंतर १ – २ दिवसांतच ती स्थिर होऊन अत्याधिक आनंद अनुभवत होती. तिने सांगितले, ‘‘सत्संगामुळे मला पुष्कळ स्थिरता आणि आनंद अनुभवता आला.’’ या वेळी ती पूर्वीसारखे सत्संगाविषयी पुनःपुन्हा बोलत नव्हती; परंतु तिची सेवेची तळमळ पुष्कळ वाढली होती. हे पाहून मला वाटले, ‘पूर्वी सत्संगामुळे तिचा व्यक्त भाव दीर्घकाळ, म्हणजे १ – २ आठवड्यापर्यंत जागृत रहात होता. आता ती व्यक्त भावातून अव्यक्त भावाच्या दिशेने चालली आहे. त्यामुळे ती सत्संगानंतर स्थिर असून अधिक आनंदी अन् सेवारत आहे.’

श्री. निषाद देशमुख

३. ‘ताईच्या अंतर्मनावर भक्तीचा संस्कार झाल्यामुळे तिला स्वप्नात संत आणि गुरु यांचे दर्शन होणे अन् निरंतर साधनेमुळे भक्ती वाढून गुरुतत्त्व जे शिकवणार आहे, ते स्वप्नांच्या माध्यमातून ताई शिकत आहे’, असे वाटणे 

१०.१०.२०२१ या दिवशी ललितापंचमी होती. त्या दिवशी ताईला स्वप्नात दिसले, ‘आमच्या घरी परात्पर गुरु डॉ. आठवले येणार आहेत आणि ती त्यांच्या स्वागताची सिद्धता करत आहे.’ तो संपूर्ण दिवस तिला अकस्मात् अत्याधिक सेवा करावी लागली. त्यानंतर तिने कृतज्ञता व्यक्त करतांना आम्हा सर्वांना ‘प.पू. भक्तराज महाराज यांची शिकवण’ या ग्रंथातील एक प्रसंग सांगितला, ‘‘प.पू. बाबा (प.पू. भक्तराज महाराज) शिष्य डॉ. आठवले यांना म्हणत होते, ‘मला तुझ्या घरी यायचे आहे.’ याचा भावार्थ असा होता की, ‘ते शक्ती देऊन गुरुकार्य करवून घेतील.’’ हा प्रसंग सांगून ताई आम्हाला म्हणाली, ‘‘मला स्वप्नात दिसले, ‘गुरुदेव आपल्या घरी येणार आहेत. गुरुदेव मला सांगत होते, ‘मी तुझ्याकडून सेवा करवून घेईन’ आणि माझी क्षमता नसतांनाही आज त्यांनी माझ्याकडून अधिक सेवा करवून घेतली.’’

तिचा कृतज्ञताभाव पाहून ‘तिच्या अंतर्मनावर भक्तीचा संस्कार झाल्यामुळे तिला स्वप्नात संत आणि गुरु यांचे दर्शन होते. निरंतर साधनेमुळे आता तिची भक्ती वाढल्यामुळे गुरुतत्त्व तिला जे शिकवणार आहे, ते ती स्वप्नांच्या माध्यमातून शिकत आहे’, असे मला वाटले.

४. साधनामार्गात निरंतर साहाय्य करणार्‍या निधीताईप्रती कृतज्ञता

वर्ष २०१६ च्या उज्जैन कुंभमेळ्यानंतर माझ्या आध्यात्मिक त्रासाची तीव्रता वाढली होती. तेव्हा ताईनेच आध्यात्मिक उपायांसाठी माझे रामनाथी आश्रमात जाण्याचे नियोजन केले. त्या वेळी मला तिच्याप्रती काहीच कृतज्ञता वाटली नव्हती. माझा त्रास न्यून झाल्यावर सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाकांनी मला विचारले, ‘‘तू ताईप्रती कृतज्ञता व्यक्त केलीस कि नाही ? गुरुदेवांनी तिच्याच माध्यमातून तुझा त्रास न्यून केला आहे.’’ त्या वेळी माझ्या लक्षात आले, ‘केवळ याच प्रसंगात नाही, तर माझ्या जन्मापासूनच मी साधनामार्गावरून भरकटू नये, यासाठी मला मार्ग दाखवणारी आणि मला सतत साहाय्य करणार्‍या ताईची साथ गुरुदेवांनीच मला दिली आहे.’

साधनामार्गात सतत मार्गदर्शक असणारी निधीताई आणि तिला माझ्या ताईच्या स्वरूपात देणारे ‘मोक्षगुरु’ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.’

– श्री. निषाद देशमुख (लहान भाऊ, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.१०.२०२१)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषि मुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.