पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांकांची अवस्था

‘पाकिस्तानमध्ये हिंदु, शीख, ख्रिस्ती आणि कादियानी यांना अल्पसंख्यांक मानण्यात आले आहे. त्यांचे प्रमाण केवळ ४ प्रतिशत एवढेच आहे. येथे शिया मुसलमान २० प्रतिशत आहेत. सुन्नी मुसलमान संघटना त्यांनाही अल्पसंख्यांक घोषित करू इच्छितात. आतंकवादी संघटनांचे कार्यकर्ते अल्पसंख्यांक आणि शिया मुसलमानांना विविध प्रकारे त्रास देऊन त्यांचे सुन्नी मुसलमानांमध्ये धर्मांतर करण्याचा प्रयत्न करतात. पाकिस्तान संयुक्त राष्ट्र आणि राष्ट्रमंडळ यांचा सदस्य आहे. त्यामुळे त्याला आंतरराष्ट्रीय नियम आणि कायदे यांचेही पालन करावे लागते. त्याने अनिवार्यपणे आपल्या ४ राज्यांच्या विधानसभा आणि राष्ट्रीय सभागृहातील काही जागा या अल्पसंख्यांकासाठी राखीव ठेवल्या आहेत अन् राष्ट्रीय मानवाधिकार आयोगही स्थापन केला आहे. लाहोरमधील कचरा गोळा करण्याची समस्या येऊ नये; म्हणून ऑगस्ट १९४७ मध्ये मुसलमान नेत्यांनी वाल्मिकी समाजाच्या लोकांना त्यांनी भारतात न जाता लाहोरमध्येच रहावे, असे आवाहन केले. त्यामुळे लाहोर येथील सार्वजनिक स्वच्छता आणि कचरा उचलण्याचे काम व्यवस्थित चालू आहे.

१. पाकिस्तानमध्ये धार्मिक आतंकवाद

रावळपिंडीमधील मंदिरे खुली केली जावीत, यासाठी गेली २५-३० वर्षे तेथील एका उच्च न्यायालयात त्याविषयीचा खटला चालला. योगायोगाने उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी निर्णय दिला की, कोणतेही धर्मस्थळ बंद रहाणार नाही. त्यामुळे रावळपिंडीमधील मंदिर खुले करण्यात आले. त्यानंतर ४-५ दिवसांतच आतंकवाद्यांनी ते मंदिर फोडून तेथील मूर्ती उद्ध्वस्त केल्या. कराचीतील सर्वांत मोठ्या मंदिराच्या चारही बाजूंनी ६०० दुकाने असून तीदेखील भाडेतत्त्वावर देण्यात आलेली आहेत. येथील पुजारीही इस्लामी टोपी घालतात. कराचीत एक जुनी स्मशानभूमी असून येथे दहनविधी झाल्यानंतर मृतांच्या अस्थी कलशांत ठेवल्या जातात. पाकिस्तान सरकारने अनुमाने ३०-४० वर्षांनंतर  हिंदूंना ते कलश भारतात नेऊन गंगेत प्रवाहित करण्याचा आदेश दिला. येथे मोठ्या आवाजात भजन-कीर्तन करू दिले जात नाही. तसेच पूजा करतांनाही खिडक्या आणि दारे बंद करून हळू आवाजात करण्याचीच अनुमती आहे.

२. पाकमधील हिंदूंची अन्य भयावह स्थिती

येथील धर्मांधांकडून हिंदु मुलींचे अपहरण केले जाते आणि त्यानंतर त्यांचे धर्मांतर करून त्यांच्याशी बळजोरीने विवाह केला जातो. तसेच हिंदूंना धमकी देऊन धन लुटले जाते. याचसमवेत हिंदूंवर धर्मांतरासाठी दडपण आणणे, त्यांच्याकडून जिझिया कर घेणे आणि गोहत्या करणे आदी गोष्टी आता सामान्य घटना झाल्या आहेत. येथे हिंदूंना हिंदु संस्कृतीनुसार नवे घर बांधण्याची अनुमती दिली जात नाही. त्यामुळे हिंदूंना साधी घरे बांधावी लागतात. येथील हिंदू जर ईद किंवा बकरी ईद साजरी करत असतील, तरच त्यांना दिवाळी किंवा होळी साजरी करण्याची अनुमती दिली जाते.’

लेखक : मूलचंद गोयंका

(संदर्भ : हिंदु सभा वार्ता (साप्ताहिक), १५ ते २१ जुलै २०१५)

(पाकिस्तानमधील अल्पसंख्यांक हिंदूंची मांडलेली स्थिती आता वर्ष २०२० मध्ये आणखीनच भयावह झालेली आहे. तेथील हिंदूंना एक प्रकारे नरकयातनाच भोगाव्या लागत आहेत, असे म्हटल्यास चुकीचे होणार नाही. पाकमधील हिंदूंना सहन कराव्या लागणार्‍या त्रासाविषयी भारतातील तथाकथित पुरो(अधो)गामी, बुद्धीप्रामाण्यवादी आणि निधर्मी याविषयी काही ‘ब्र’देखील काढणार नाहीत, तसेच या विषयावरून दूरचित्रवाहिन्यांवर कोणत्याही प्रकारच्या चर्चा होणार नाहीत, हेही तितकेच खरे ! यावरून भारतात नुकत्याच झालेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याची आवश्यकता किती आहे, हेच दिसून येते ! – संपादक)