|
नवी देहली – पंजाबमध्ये होणार्या विधानसभा निवडणुकीच्या काळात घातपात घडवून आणण्याचे कारस्थान पाकची गुप्तचर संस्था आय.एस्.आय.ने रचले आहे. ‘पंजाबमधील विधानसभा निवडणुकीचा काळ हा तेथे खलिस्तानी आतंकवाद फोफावण्यासाठीची नामी संधी आहे’, असे आय.एस्.आय.ला वाटत आहे. (खलिस्तान आतंकवाद फोफावण्यामागे पाकचा हात आहे, हेच यातून स्पष्ट होते. पाकला अद्दल घडवल्यावर या खलिस्तानी संघटनाही वठणीवर येतील ! – संपादक)
१. पंजाबसह उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड येथेही निवडणुकीच्या कालावधीत आतंकवादी कारवाया घडवून आणण्याचा कट आय.एस्.आय.ने रचला आहे. या राज्यांमधील शीख समुदायाचे समर्थन मिळवण्याचा खलिस्तानी आतंकवादी संघटनांचा डाव आहे.
२. पंजाबमध्ये विविध राजकीय पक्षांनी काढलेल्या पदयात्रा किंवा मिरवणुका यांना लक्ष्य करण्याचे आय.एस्.आय.चे कारस्थान आहे.
३. ‘सीख युथ फेडरेशन’, ‘बब्बर खालसा इंटरनॅशनल’, ‘खलिस्तान कमांडो फोर्स’ आणि ‘सीख फॉर जस्टीस’ या खलिस्तानी आतंकवादी संघटनांच्या हालचालींवर भारतीय सुरक्षायंत्रणा बारीक लक्ष ठेवून आहे.
४. पंजाबमध्ये कार्यरत असलेल्या आतंकवाद्यांना शस्त्रास्त्रे आणि स्फोटके पुरवण्यासाठी आय.एस्.आय.ने वर उल्लेख केलेल्या खलिस्तानी आतंकवादी संघटनांना हाताशी धरले आहे.