चुका लिहून देतांना त्या योग्य पद्धतीने लिहिणे, चुकांच्या परिमार्जनासाठी योग्य प्रायश्चित्त घेणे यांसह परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शिकवलेली सूत्रे आचरणात आणण्याचे महत्त्व स्पष्ट करणारे संशोधन !

हस्तलिखित आणि संगणकीय प्रत यांविषयी अद्वितीय संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘साधकांतील स्वभावदोष आणि अहं (मीपणाची जाणीव) यांमुळे त्यांच्याकडून लिखाणाच्या सेवेत व्याकरणाच्या अन् संकलनाच्या लहान-मोठ्या चुका होतात. यामुळे साधकांची साधना व्यय होते. सेवेत होणार्‍या चुकांचा अभ्यास करणे, त्याच त्याच चुका पुनःपुन्हा होऊ नयेत यासाठी उपाययोजना करणे, चुकांसाठी योग्य प्रायश्चित्त घेणे (चुकांमुळे साधकाची साधना व्यय होते. योग्य प्रायश्चित्त घेतल्याने चुकांचे काही प्रमाणात तरी परिमार्जन होते आणि साधकांची साधना वाचते. त्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांना नेहमी योग्य प्रायश्चित्त घेण्यास सांगतात.) इत्यादी गोष्टींचा संस्कार परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांवर केला आहे.

२०.५.२०२१ पासून परात्पर गुरु डॉक्टरांनी दैनिकातील चुका लक्षात आणून द्यायला आरंभ केला. त्यानंतर दैनिकाशी संबंधित सेवा करणार्‍या साधकांनी स्वतःकडून होणार्‍या व्याकरणाच्या आणि संकलनाच्या चुका कागदावर लिहून देण्यास आरंभ केला. प्रारंभी १ मास साधकांनी त्यांच्या चुका लहान चिटोर्‍यांवर (कागदाच्या लहान तुकड्यांवर) लिहून दिल्या. हे अयोग्य असल्याची जाणीव परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांना करून दिली. त्यानंतर साधकांनी चुकांची संगणकीय धारिका बनवून त्यात चुका लिहिण्यास आरंभ केला आणि त्याची प्रत (प्रिंट) काढून ती परात्पर गुरु डॉक्टरांकडे पाठवण्यास चालू केले.

साधकांच्या हस्तलिखित चुका (चुकांचे कागद) आणि चुकांची संगणकीय प्रत यांतून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा अभ्यास करण्यासाठी ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निरीक्षणे आणि त्यांचे विश्लेषण पुढे दिले आहे.

यू.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. रूपेश रेडकर

१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन

या चाचणीत जून ते सप्टेंबर २०२१ या कालावधीतील दैनिकाशी संबंधित सेवा करणार्‍या साधकांच्या हस्तलिखित चुकांचे (हाताने चुका लिहिलेल्या कागदांचे) आणि चुकांची संगणकीय प्रत (प्रिंट) यांची ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली.

१ अ. साधकांच्या हस्तलिखित चुका आणि चुकांची संगणकीय प्रत यांमध्ये नकारात्मक ऊर्जा आढळून येणे आणि तिचे प्रमाण हस्तलिखितांमध्ये पुष्कळ अधिक असणे : हे पुढे दिलेल्या सारणीतून लक्षात येते.

१ अ १. चुकांच्या हस्तलिखितांमध्ये नकारात्मक ऊर्जेचे प्रमाण पुष्कळ अधिक असण्याचे कारण : व्यक्तीच्या हस्तलिखितातून (हस्ताक्षरातून) प्रक्षेपित होणारी स्पंदने तिची आध्यात्मिक पातळी, तिला आध्यात्मिक त्रास असणे किंवा नसणे, लिखाणाचा विषय, लिखाण करतांनाची तिची मनःस्थिती इत्यादी अनेक घटकांवर अवलंबून असतात. साधकांच्या चुकांच्या हस्तलिखितांमध्ये सकारात्मक ऊर्जा काहीच नसून पुष्कळ प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आढळून आली. याचे कारण हे की, साधक चुका लिहून देतांना त्या अभ्यासपूर्ण लिहून देत नाहीत. त्यामुळे त्यात अनेक त्रुटी रहातात. काही वेळा साधकांकडून चुका लिहितांना पुढील चुकाही होतात.

अ. लिखाण करतांना एकाग्रता नसणे

आ. लिखाण करतांना खाडाखोड करणे

इ. चुकांचे चिंतन न करता वरवर चुका लिहिणे

ई. चुका लिहितांना त्याविषयी मनाला खंत न वाटणे

उ. चुका मनापासून न लिहिता केवळ ‘सांगितले आहे म्हणून लिहून देऊया’, असा चुकीचा दृष्टीकोन ठेवून लिहिणे

ऊ. चुकांवर योग्य प्रायश्चित्त न घेणे इत्यादी.

वरील सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून साधकांच्या हस्तलिखितांतून पुष्कळ नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित झाली.

सौ. मधुरा कर्वे

१ अ २. हस्तलिखित चुकांच्या तुलनेत संगणकीय प्रतीमध्ये नकारात्मक ऊर्जेचे प्रमाण अल्प असण्याचे कारण : कागदावर हाताने लिखाण करतांना होणार्‍या त्रुटी संगणकावर टंकलेखन करतांना टाळता येतात, उदा. एखादा शब्द टंकलेखन करतांना चुकला, तर तो सुधारता येतो; वाक्यरचना सुधारता येते इत्यादी. संगणकावर लिखाण करतांना सोपी अन् सुटसुटीत संरचना करणे इत्यादी गोष्टीही करता येतात, उदा. सारण्या सिद्ध करणे. संगणकावर लिखाण करतांना व्यक्तीच्या हस्ताक्षराचा थेट परिणाम होत नसला, तरी तिच्या मनःस्थितीचा सूक्ष्म परिणाम मात्र होतो. साधकांच्या हस्तलिखित चुकांच्या तुलनेत संगणकीय प्रतीमध्ये नकारात्मक ऊर्जेचे प्रमाण अल्प असण्याची कारणे पुढे दिली आहेत.

अ. परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांना हस्तलिखित चुकांच्या संदर्भात त्यांच्याकडून होणार्‍या चुका लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी संगणकावर लिखाण करण्यास आरंभ केला. त्यामुळे लिखाण करतांना होणार्‍या चुका टाळता आल्या.

आ. साधकांनी चुका टंकलेखन करतांना सारणीत दिलेल्या रकान्यांनुसार चुकांचे विवरण लिहिण्यास आरंभ केला, उदा. ‘चूक काय झाली ? योग्य काय असायला हवे होते ? चुकीसाठी उत्तरदायी साधकाचे नाव आणि त्याने काय प्रायश्चित्त घेतले ?’, आदी विवरण लिहिण्यास आरंभ केला. तसेच चुकांचे वर्गीकरण करून आधी लहान चुका, मग मध्यम चुका आणि शेवटी मोठ्या चुका यांच्या सारण्यांमध्ये त्या त्या स्वरूपाच्या चुका टंकलिखित केल्या.

इ. साधकांनी चुकांवर योग्य प्रायश्चित्त घेण्यास आरंभ केला.

वरील सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून चुकांच्या हस्तलिखितांच्या तुलनेत चुकांच्या संगणकीय प्रतीमध्ये नकारात्मक ऊर्जेचे प्रमाण अल्प असल्याचे दिसून आले.

१ अ ३. १४.७.२०२१ या दिवशीच्या संगणकीय प्रतीमध्ये सर्वांत अल्प प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आणि काही प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असण्याचे कारण : १४.७.२०२१ या दिवशी सूत्र ‘१ अ २’ मध्ये दिलेल्या सर्व सूत्रांसह साधकाने संगणकीय प्रिंट काढतांना पाठकोर्‍या कागदाचा उपयोग केला आणि तोही आवश्यक तेवढाच केला.

या दिवशी धारिकेत दोनच चुका असल्याने प्रिंट काढणार्‍या साधकाने प्रिंट काढून झाल्यावर खालील कोरा कागदा कापून तो बाजूला काढून ठेवला. यातून श्रीगुरूंनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) दिलेली शिकवण त्याने आचरणात आणली, असे लक्षात येते. (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना प्रत्येक कृती ‘सत्यं शिवं सुंदरम्’ करण्याची शिकवण दिली आहे. प्रत्येक कृती करतांना ती व्यवस्थितच करायला हवी, याची जाणीव ते साधकांना सतत करून देत असतात.) २०.९.२०२१ या दिवशी प्रिंट काढतांना साधकाने पाठकोर्‍या कागदावर न काढता दोन्ही बाजूने कोर्‍या असलेल्या कागदावर काढली, जे अयोग्य होते. परात्पर गुरु डॉक्टर कोणत्या प्रकारच्या लिखाणासाठी कोणता कागद वापरावा, लिखाणानुसार योग्य आकाराचा कागद घ्यावा इत्यादी गोष्टीही साधकांना सांगतात. ईश्वराने दिलेल्या प्रत्येक वस्तूचा योग्यरित्या वापर करायला हवा, अशी त्यांची शिकवण आहे.

थोडक्यात, साधकांनी स्वतःकडून होणार्‍या चुका अंतर्मुख होऊन चिंतन करून मनापासून लिहिल्याने आणि त्यावर योग्य प्रायश्चित्त घेतल्याने त्यांची साधना व्यय होण्याचे वाचते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे श्रीगुरूंनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) शिकवलेली सूत्रे आचरणात आणले जाते. ‘परात्पर गुरु डॉक्टर, आपण आम्हा साधकांना करत असलेल्या चैतन्यमय मार्गदर्शनाचा आम्हाला लाभ करून घेता येऊ दे’, अशी आपल्या कोमल चरणी आर्त प्रार्थना !’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (३१.१२.२०२१)
ई-मेल : [email protected]