मुंबईत अमली पदार्थांची तस्करी करणार्‍या धर्मांधाला काश्मीरमधून अटक !

  • अमली पदार्थांनी भारताची भावी पिढी उद्ध्वस्त करणे, हे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र आहे. संपूर्ण भारतात अमली पदार्थांच्या व्यसनाने लक्षावधी युवक-युवतींचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळे अशांना कठोरात कठोर शिक्षा करणे आवश्यक आहे ! – संपादक 
  • मुंबईसारख्या शहरांमध्ये पुलांखाली शेकडो अमली पदार्थांचे विक्रेते आहेत. सामान्यांना ते सहज लक्षात येतात. अनेक वाहिन्यांनीही त्यांची वृत्ते प्रसिद्ध केली आहेत; मात्र असे असूनही पोलिसांना ते दिसत नाहीत, यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही. त्यांना अटक करण्यात पोलिसांचे हात कुणी बांधले आहेत, हेही पुढे आले पाहिजे ! – संपादक 
  • मुंबईतील उपनगरांत उच्छाद मांडलेल्या नायजेरियन अमली पदार्थ विक्रेत्यांची तर पोलिसांना कित्येकदा भीतीच वाटते. अशांचा मुळातून बंदोबस्त करणे मुंबई पोलीस का टाळत आहेत, हेही सामान्यांना कळले पाहिजे ! – संपादक 

मुंबई – अमली पदार्थांची तस्करी करणार्‍या गुलजार मकबूल अहमद खान याला  मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ८ जानेवारीला काश्मीरमधील श्रीनगरच्या मगरमल बाग परिसरातून त्याच्या दुकानातून अटक केली. हा परिसर संवेदनशील असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलिसांच्या पथकासह १०० सशस्त्र कर्मचारी तैनात करण्यात आले होते. मुसळधार बर्फवृष्टीमुळे तेथील बोगदा बंद झाल्याने मुंबई पोलीस दोन दिवस या संवेदनशील भागात अडकले होते.

खान मुंबईतील विक्रेत्यांना २५ टक्क्यांची सूट देऊन अमली पदार्थांचा पुरवठा करत होता. यापूर्वी वर्ष २०१० मध्ये वरळीच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अमली पदार्थांशी संबंधित एका प्रकरणात अटक केली होती. (अमली पदार्थांसारख्या राष्ट्राची पिढी उद्ध्वस्त करणार्‍या व्यवसायाच्या प्रकरणी कुणालाही जामीन न मिळण्याचा कायदा हवा ! – संपादक)

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये दहिसर टोल नाक्यावरून २४ किलो शुद्ध काश्मिरी चरससह चार जणांना अटक केल्यानंतर खान यंत्रणांचे लक्ष्य होता. उदयनशिव (वय  ५३), त्याची पत्नी क्लारा (वय ५२), मुलगी सिंथिया (वय २३), जस्सर जहांगीर शेख (वय २४) यांना गेल्या वर्षी काश्मीरमधून चरस घेऊन परतत असतांना अटक करण्यात आली होती.