समस्त वारकरी फडकरी दिंडी समाज संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी ह.भ.प. संजय महाराज देहूकर !

ह.भ.प. संजय महाराज देहूकर

पंढरपूर (जिल्हा सोलापूर), १४ जानेवारी (वार्ता.) – वारकरी संप्रदायातील शिखर संघटना म्हणून ओळख असलेल्या समस्त वारकरी फडकरी दिंडी समाज संघटनेची सर्वसाधारण सभा नुकतीच पंढरपूर येथील श्रीसंत कबीर महाराज फड येथे पार पडली. यात संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी संत तुकाराम महाराजांचे विद्यमान वंशज ह.भ.प. संजय महाराज देहूकर यांची एकमताने निवड करण्यात आली. या वेळी अध्यक्षपदाची सूत्रे पूर्वअध्यक्ष ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांच्या हस्ते नूतन अध्यक्षांकडे प्रदान करण्यात आली.

१. ह.भ.प. संजय महाराज देहूकर यांनी यापूर्वी संघटनेचे उपाध्यक्ष पद सांभाळले असून ‘वारकरी संप्रदायातील अतिशय संयमी व्यक्तीमत्त्व’, अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्या निवडीने वारकरी संप्रदायात सर्व स्तरांतून आनंद व्यक्त होत आहे.

२. या सर्वसाधारण सभेस सर्वश्री ह.भ.प. केशव महाराज नामदास, प्रभाकर दादा बोधले महाराज, देवव्रत राणा महाराज वासकर, नाना महाराज वासकर, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, भागवत महाराज चवरे, माधव महाराज शिवणीकर इत्यादी उपस्थित होते.

संतमहात्म्यांनी सांगितलेली संप्रदायाची मूळ विचारसरणी आणि तत्त्वे यांचे जतन करणार ! – ह.भ.प. संजय महाराज देहूकर

वारकरी संप्रदायातील संतमहात्म्यांनी सांगितलेली संप्रदायाची मूळ विचारसरणी आणि तत्त्वे यांचे जतन करून ती समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत, तसेच सर्वसामान्य वारकर्‍यांपर्यंत पोचवून समन्वयाने काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मिळालेल्या दायित्वातून करणार आहे.