‘वीर सावरकर – दी मॅन हु कुड हॅव प्रिव्हेंटेड पार्टिशन’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यातील मान्यवरांचे विचार आणि क्षणचित्रे

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर नव्याने प्रकाश टाकणारे केंद्रीय माहिती आयुक्त श्री. उदय माहूरकर अन् सहलेखक श्री. चिरायू पंडित लिखित ‘वीर सावरकर – दी मॅन हु कुड हॅव प्रिव्हेंटेड पार्टिशन’ या पुस्तकाचे प्रकाशन ९ जानेवारी या दिवशी पणजी येथील ‘गोमंतक मराठा समाज – राजाराम स्मृति सभागृहा’त आयोजित विशेष कार्यक्रमात करण्यात आले. या वेळी व्यासपिठावर सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे आणि पुस्तकाचे लेखक श्री. उदय माहूरकर उपस्थित होते. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष मुंबई येथील श्री. प्रवीण दीक्षित (निवृत्त पोलीस महासंचालक) हेही या कार्यक्रमाला ‘ऑनलाईन’ स्वरूपात उपस्थित होते. हिंदु जनजागृती समितीच्या ट्विटर आणि ‘यू ट्यूब’ खात्यांवरून थेट प्रक्षेपण करण्यात आले. हे प्रक्षेपण सहस्रो लोकांनी पाहिले. या सोहळ्यातील मान्यवरांची मार्गदर्शने येथे देत आहोत.

 

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर आधारित पुस्तकामुळे समाजाला प्रेरणा मिळेल ! – धर्मभूषण प.पू. ब्रह्मेशानंद स्वामी महाराज, पिठाधीश, श्रीक्षेत्र तपोभूमी

धर्मभूषण प.पू. ब्रह्मेशानंद स्वामी महाराज यांनी कार्यक्रमासाठी पाठवलेला लेखी संदेश

प.पू. ब्रह्मेशानंद स्वामी महाराज

केंद्रीय माहिती आयुक्त श्री. उदय माहुरकर आणि सहलेखक श्री. चिरायू पंडित यांनी लिहिलेल्या ‘वीर सावरकर – दी मॅन हु कुड हॅव प्रिवेंटेड पार्टिशन’ या पुस्तकाच्या वाचनामुळे अनेकांना राष्ट्र आणि धर्म कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे. हिंदु जनजागृती समितीने या पुस्तकाच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करून हा विषय सर्वांसमोर आणला आहे. आज राष्ट्रभक्तीचे धडे पाठ्यपुस्तकांतून नाहीसे झाले आहेत. समाजात देश आणि धर्म यांना प्राधान्य दिले जात नाही, हे भयावह आहे. श्रीक्षेत्र तपोभूमी देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी कार्यरत आहे. आज आपण देशभक्तीची ही ज्योत प्रज्वलित ठेवली पाहिजे, असे प्रतिपादन श्रीक्षेत्र तपोभूमी येथील धर्मभूषण प.पू. ब्रह्मेशानंद स्वामी महाराज यांनी कार्यक्रमस्थळी लेखी संदेश पाठवून केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार आजच्या काळातही अनुकरणीय ! – प्रवीण दीक्षित, अध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक (निवृत्त पोलीस महासंचालक, महाराष्ट्र)

 

श्री. प्रवीण दीक्षित

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार हे आजच्या काळातही अनुकरणीय आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर हे एक बहुआयामी व्यक्तीमत्त्व होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याचा अभ्यास करू लागल्यास ती व्यक्ती कधी ‘सावरकरमय’ होते, हे तिला कळतच नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांतून स्फूर्ती घेऊन अनेकांनी मोठे कार्य झाले आहे. ‘वीर सावरकर – दी मॅन हु कुड हॅव प्रिव्हेंटेड पार्टिशन’ या पुस्तकाचे सर्वांनी वाचन करून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार आचरणात आणावे.


‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करण्याचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्वप्न सिद्ध करण्याचे दायित्व आता हिंदूंचे ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था.

श्री. चेतन राजहंस

स्वातंत्र्यवीर सावरकर हे द्रष्टे नेते होते. देशाच्या स्वातंत्र्याला ७० वर्षे उलटूनही स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार ही देशासाठी वैचारिक संपत्ती आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी म्हटले होते, ‘भारतियांना स्वाभिमानाने जीवन जगायचे असल्यास भारत ‘हिंदु राष्ट्र’ झाले पाहिजे. हे आज शक्य नाही झाले, तरी नंतर ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन होईल. हे दायित्व मी माझ्या पुढील पिढीकडे सुपुर्द करतो.’ यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी दिलेले ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करण्याचे दायित्व आता आपल्यावर आले आहे. ‘वीर सावरकर – दी मॅन हु कुड हॅव प्रिव्हेंटेड पार्टिशन’ या पुस्तकाचे वाचन केल्याने हिंदूंना नवीन विचार आणि ऊर्जा प्राप्त होईल आणि ते ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करण्याच्या कार्यात सहभागी होऊ शकतील.


‘मी हिंदूसंघटक आहे’, हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे वाक्य हिंदूंनी विसरू नये ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

श्री. रमेश शिंदे

‘एकवेळ माझी ‘मार्सेलिस’ची उडी विसरलात, तरी चालेल; पण मी ‘हिंदूसंघटक’ आहे, हे विसरू नका’, असे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सांगितले आहे. हेच विचार स्वीकारून आपल्याला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हिंदु राष्ट्राचे कार्य पुढे न्यायचे आहे. ‘चरख्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले’, असे म्हटले जाते, तर मग देश स्वतंत्र होऊन अनेक वर्षांनी म्हणजे वर्ष १९६१ मध्ये गोवा, दमण आणि दीव या भागाला स्वातंत्र्य का मिळाले ? अखंड भारताच्या निर्मितीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ‘हिंदु राष्ट्र’ निर्माण करण्याच्या कार्यात सर्वांनी सहभाग घेऊया. स्वातंत्र्यवीर सावरकर आज हयात नसले, तरी त्यांचे विचार आपल्याकडे आहेत. या विचारांच्या आधारे यापुढे देशाचे होणारे विभाजन आपण रोखू शकतो.


सनातन संस्थेचे कार्य समाजात चांगले संस्कार निर्माण करते ! – उदय माहूरकर, केंद्रीय माहिती आयुक्त, भारत सरकार

श्री. उदय माहूरकर

‘सनातन संस्थेशी माझे गेल्या २० वर्षांपासून चांगले संबंध आहेत. मी बडोदा (गुजरात) येथे असतांना सनातन संस्थेचे साधक मला भेटायचे. त्यांनी माझ्या मुलांवर पुष्कळ चांगले संस्कार केले आहेत. सनातन संस्था समाजात चांगले संस्कार निर्माण करणारी संस्था आहे’, असे गौरवोद्गार श्री. उदय माहूरकर यांनी त्यांच्या मार्गदर्शनाच्या वेळी काढले.