सुप्रसिद्ध मल्ल्याळम् चित्रपट निर्माते अली अकबर बनले ‘राम सिम्हन’ !

शुद्धीकरणाच्या वेळी पत्नी लुसिम्मा उपस्थित

भारतात भीती आणि प्रलोभने यांमुळे हिंदु धर्म सोडलेले कोट्यवधी लोक आहेत. त्यांनीही अकबर यांच्याकडून प्रेरणा घेऊन योग्य पाऊल उचलल्यास आश्चर्य नाही ! -संपादक

अली अकबर

नवी देहली – सुप्रसिद्ध मल्ल्याळम् चित्रपट निर्माते अली अकबर यांनी १३ जानेवारी या दिवशी विधीवत् स्वरूपात हिंदु धर्म स्वीकारला. या वेळी त्यांच्यासमवेत त्यांची पत्नी लुसिम्मा याही उपस्थित होत्या. या शुद्धीकरण विधीनंतर अली अकबर हे ‘राम सिम्हन’ या नावाचे ओळखले जातील. तिन्ही संरक्षण दलांचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर इस्लामी कट्टरतावाद्यांनी विविध सामाजिक माध्यमांवर आनंद  व्यक्त केला होता. त्यामुळे व्यथित झालेले अली अकबर यांनी गेल्या डिसेंबरमध्ये इस्लाम सोडून हिंदु धर्म स्वीकारत असल्याची घोषणा केली होती.

अली अकबर आणि लुसिम्मा यांची काही छायाचित्रे सामाजिक माध्यमांत प्रसारित झाली आहेत. त्यात एका शुद्धीकरण समारंभामध्ये दोघेही हवनकुंडाजवळ बसून आहुती देत असल्याचे दिसत आहे. या वेळी अली अकबर यांनी सात्त्विक पोशाखामध्ये खांद्यावर भगवे वस्त्र आणि जानवे धारण केले होते.

अली अकबर यांनी ‘राम सिम्हन’ नाव धारण करण्यामागील वैशिष्ट्यपूर्ण कारण !

अली अकबर यांनी ‘राम सिम्हन’ हे नाव धारण करण्यामागे एक जुनी घटना सांगितली जाते. अनुमाने ८ दशकांपूर्वी मलाबारमध्ये अशाच प्रकारे एका मुसलमानाने इस्लामचा त्याग करून ‘राम सिम्हन’ हे नाव धारण केले होते. त्यानंतर धर्मांधांनी ईशनिंदेचा आरोप करत त्या व्यक्तीच्या घरावर आक्रमण करून राम सिम्हन आणि त्यांचे बंधू यांची हत्या केली होती, तसेच त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांना बलपूर्वक अज्ञात ठिकाणी उचलून नेले होते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही आठवड्यातच ही दुर्दैवी घटना घडली होती. मलाबारमधील या घटनेतून प्रेरणा घेत अली अकबर यांनी ‘राम सिम्हन’ हे नाव धारण केल्याचे बोलले जात आहे.