चाचणीच्या तुलनेत रुग्ण आढळण्याचे प्रमाण ३९.४ टक्के
पणजी, १३ जानेवारी (वार्ता.) : गोव्यात १३ जानेवारी या दिवशी कोरोनासंबंधी ९ सहस्र ४५९ चाचण्या करण्यात आल्या आणि यामध्ये कोरोनाबाधित ३ सहस्र ७२८ नवीन रुग्ण आढळले. चाचणीच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण ३९.४ टक्के आहे. १३ जानेवारी या दिवशी कोरोनाबाधित ९७१ रुग्ण कोरोनापासून बरे झाले आहेत आणि प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १६ सहस्र ८८७ झाली आहे. १३ जानेवारी या दिवशी कोरोनाबाधित ४ रुग्णांचे निधन झाले आणि यामुळे कोरोनाचा संसर्ग झाल्याने मृत्यू झालेल्यांची आतापर्यंतची एकूण संख्या ३ सहस्र ५४३ झाली आहे.
गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर आणि परिचारिका मिळून अंदाजे १०० जण कोरोनाबाधित
गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर, परिचारिका, सल्लागार डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रात साहाय्यकार्य करणारे मिळून एकूण अंदाजे १०० जण कोरोनाबाधित झाले आहेत आणि यामुळे राज्यातील वैद्यकीय क्षेत्रातील एक गणमान्य मानल्या गेलेल्या संस्थेवर सेवा बजावण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ताण आला आहे. या परिस्थितीमुळे गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील नियमित शस्त्रक्रिया आणि बाह्यरुग्ण विभाग १२ जानेवारी या दिवशी बंद ठेवण्यात आला होता, अशी माहिती महाविद्यालयातील एका वरिष्ठ डॉक्टरने दिली.