चंदनाच्या ११ झाडांची चोरी होईपर्यंत उपाययोजना न काढणारे प्राणीसंग्रहालयाचे व्यवस्थापक ! आतातरी तेथील अडचणी सोडवून उपाययोजना काढावी ही अपेक्षा !
पुणे – कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयाच्या आवारातील ११ चंदनाची झाडे चोरी झाल्याची घटना घडली आहे. पाचव्यांदा झालेल्या चंदन चोरीच्या घटनेने सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. सुरक्षारक्षक अनिल वणवे यांनी चोरीच्या घटनेची भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. १३० एकर जागेत असलेल्या या प्राणीसंग्रहालयात ६१ प्रजातींच्या ४२५ वन्यजिवांचे वास्तव्य आहे. यापूर्वी झालेल्या चोरीपैकी एकाही चोराचा तपास लागला नाही. त्यामुळे अंतर्गत सुरक्षायंत्रणेतील कुणाचा चोरीच्या घटनेमध्ये सहभाग तर नाही ना ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. संग्रहालयाचे क्षेत्र मोठे असून सुरक्षारक्षकांची संख्या अपुरी आहे. संग्रहालयात असलेली घनदाट झाडी आणि अंधार यांचा अपलाभ घेऊन चोरीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सुरक्षाव्यवस्था बळकट करण्यावर भर देण्यात येईल, असे राजीव गांधी प्राणीसंग्रहालयाचे संचालक राजकुमार जाधव यांनी सांगितले.