१. गुरुपौर्णिमेच्या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ‘साष्टांग नमस्कार’ असे म्हटल्यावर त्यांनीही ‘तुलाही नमस्कार’ म्हणणे, त्या वेळी गोंधळून जाणे आणि त्यांनी ‘मी तुझ्यातील गुरुतत्त्वाला नमस्कार केला’, असे सांगितल्यावर त्यांची ‘अहंशून्य’ अवस्था अनुभवता येणे
‘गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे संगीत सेवेविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी दूरभाषवर बोलणे झाले. गुरुपौर्णिमेच्या दिवशी साक्षात् माझे गुरुच माझ्याशी बोलत असल्याने अगदी न राहवून मी शेवटी त्यांना म्हणाले, ‘‘आपल्या चरणी आम्हा साधकांचा साष्टांग नमस्कार !’’ त्यावर क्षणाचाही विलंब न लावता ते मला म्हणाले, ‘‘तुलाही माझा नमस्कार.’’ त्यांच्या या वाक्याने मी गोंधळून त्यांना ‘‘नाही नाही’’, असे म्हणाले. त्यावर ते म्हणाले, ‘‘नाही नाही काय ? तुझ्यात गुरुतत्त्व नाही का ? तुझ्यातील गुरुतत्त्वाला मी नमस्कार केला.’’
या प्रसंगात परात्पर गुरु डॉक्टरांची अहंशून्य अवस्था मला अनुभवायला आली. किती सहजतेने त्यांनी ‘नमस्कार’, असे म्हटले ! माझ्यातील ‘मी’मुळे मला त्यांच्या वाक्याने गोंधळून जायला झाले. ‘लहान लहान कृती करतांनाही आपण किती सहज स्थितीत रहायला हवे’, हे त्यांनी मला अगदी सहजतेने स्वतःच्या कृतीतून शिकवले.
‘हे गुरुदेवा, असाच ‘माझ्यातील ‘मी’ आपल्या चरणांशी विरघळून जाऊ देत’, हीच आपल्या सुकोमल चरणी प्रार्थना !’
२. संगणकीय प्रणालीवर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाची ध्वनीचित्र-चकती पहातांना आलेली अनुभूती
२ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची पूर्वी त्यांनी सत्संगात केलेल्या मार्गदर्शनाची ध्वनीचित्र-चकती पहातांना ती ‘ऐकतच रहावी’ असे वाटून ‘प्रत्यक्ष त्यांच्या सत्संगात बसलो आहोत’, असे जाणवणे : गुरुपौर्णिमेनिमित्त सर्व साधकांना एक ध्वनीचित्र-चकती दाखवण्यात आली. त्यात पूर्वी एकदा परात्पर गुरु डॉक्टरांनी एका सत्संगात विविध साधकांनी साधनेच्या संदर्भात विचारलेले प्रश्न आणि त्यावर परात्पर गुरु डॉक्टरांनी दिलेली उत्तरे अन् त्यांचे अनमोल मार्गदर्शन होते. साधनेत प्रगती करतांना शिकण्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त अशा प्रश्नांच्या संदर्भात परात्पर गुरु डॉक्टरांनी चैतन्यमय वाणीत केलेले ते मार्गदर्शन ‘ऐकतच रहावे’, असे मला वाटत होते. त्या वेळी मला ‘मी खरंच त्यांच्यासमोर बसले आहे आणि ते मला मार्गदर्शन करत आहेत’, असेच वाटले. ‘आपण ध्वनीचित्र-चकती पहात आहोत’, याचा मला विसर पडला.’
– कु. तेजल पात्रीकर, संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (६.७.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |