सर्वोच्च न्यायालयाने बनवली अन्वेषण करण्यासाठी उच्चस्तरीय समिती !

पंजाबमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या संरक्षणव्यवस्थेतील गंभीर त्रुटींचे प्रकरण

नवी देहली – पंजाबमधील फिरोजपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ५ जानेवारी या दिवशी झालेल्या दौर्‍याच्या वेळी संरक्षणव्यवस्थेत राहिलेल्या गंभीर त्रुटींचे अन्वेषण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एका उच्चस्तरीय अन्वेषण समितीची स्थापना केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश इंदू मल्होत्रा या समितीच्या अध्यक्षा असतील. या समितीमध्ये एन्.आय.ए.चे महानिरीक्षक, चंडीगडचे पोलीस महासंचालक, पंजाबचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि पंजाब अन् हरियाणा उच्च न्यायालयाचे महानिबंधक यांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाने या ५ सदस्यीय समितीला संपूर्ण घटनाक्रमाचा अहवाल लवकरात लवकर सिद्ध करण्याचा आदेश दिला आहे.

पंजाब पोलीसदलातील वरिष्ठ अधिकारी काँग्रेसच्या कोणत्या मोठ्या नेत्याच्या सांगण्यावरून काम करत होते ? – भाजपने केले आरोप

देशाच्या सर्वोच्च राजकीय नेत्याच्या संरक्षणात हलगर्जीपणा ठेवणे, हे अक्षम्य आहे. भाजपने केलेल्या आरोपांमध्ये तथ्य आढळले, तर काँग्रेसच्या संबंधित नेत्यांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा का नोंदवला जाऊ नये ? – संपादक

भाजपने पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस आणि पंजाब पोलीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. भाजपच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी म्हटले आहे की, पंजाबच्या काँग्रेस सरकारने पंतप्रधानांना मुद्दामहून असुरक्षित वातावरणात वावरण्यास भाग पाडले. हे केवळ निंदनीय नव्हे, तर दंडनीय आहे. पंजाब पोलीसदलातील वरिष्ठ अधिकारी काँग्रेसच्या कोणत्या मोठ्या नेत्याच्या सांगण्यावरून काम करत होते ? पंजाबच्या पोलीस महासंचालकांनी पंतप्रधान मोदी यांना सुरक्षा पुरवणार्‍या गटाला ‘रस्त्यात काही अडचण नाही आणि संपूर्ण व्यवस्था ठीक आहे’, हे कोणत्या आधारे सांगितले ? पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी यांनी कार्यपद्धतींचे उल्लंघन करत काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी वढेरा यांना पंतप्रधानांच्या संरक्षणाच्या संदर्भातील माहिती का पुरवली ?, असा गंभीर आरोपही इराणी यांनी केला.

चन्नी, सिद्धू आणि पंजाबचे गृहमंत्री यांचा हाथ ! – विक्रम मजीठिया, नेता, शिरोमणि अकाली दल

शिरोमणि अकाली दलचे नेते विक्रम मजीठिया यांनी पंतप्रधान मोदी यांच्या संरक्षणातील चुकीमागे पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी, पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंह सिद्धू आणि राज्याचे गृहमंत्री यांचा हाथ असल्याचे सांगितले. पंतप्रधान आणि भाजप यांचा अवमान करण्यासाठीच पंजाब काँग्रेसने पंतप्रधान यांचा जीव धोक्यात घालून हे षड्यंत्र रचले होते.

५ जानेवारी या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंजाबच्या भटिंडा विमानतळावरून फिरोजपूरच्या हुसैनीवाला या पाक सीमेला लागून असलेल्या गावाकडे एका कार्यक्रमासाठी रस्त्यावरून निघाले होते. त्या वेळी काही आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांनी तो रस्ता अडवून आंदोलन केल्याने पंतप्रधानांच्या वाहनांच्या ताफ्याला तब्बल २० मिनिटे एका उड्डाणपुलावर खोळंबून रहावे लागले. यामागे पंजाबातील काँग्रेस सरकार आणि पंजाब पोलीस यांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे.

काँग्रेसने देशाची क्षमा मागायला हवी ! – योगी आदित्यनाथ

पंतप्रधानांच्या विरोधात ‘खूनी’ आणि ‘पूर्व प्रायोजित’ षड्यंत्र रचण्यात आले. कार्यपद्धतींकडे दुर्लक्ष करण्यात आले. काँग्रेसने या संपूर्ण घटनाक्रमावरून देशाची क्षमा मागायला हवी, असे वक्तव्य उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी १२ जानेवारीच्या सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केले.

भारताच्या माजी प्रशासकीय अधिकार्‍यांचे राष्ट्रपतींना पत्र

पंजाबमधील पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या घटनेचे सखोल अन्वेषण होणे अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये दोषी आढळणार्‍यांना कठोरात कठोर शिक्षा केली गेली पाहिजे. ही घटना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा मलीन करणारी होती, अशा आशयाचे पत्र भारताच्या काही माजी प्रशासकीय अधिकार्‍यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना लिहिले आहे.