१. विवाहापूर्वीची आणि आताची साधना
१ अ. लग्नापूर्वी नवनाथांच्या पोथीवाचनातून आध्यात्मिक ओढ निर्माण होणे : ‘वर्ष १९८९ पासून माझ्या साधनेला खर्या अर्थाने आरंभ झाला. तेव्हा मी नवनाथांची पोथी वाचत असे. त्यातील ‘गुरु-शिष्याचे नाते कसे असते ?’, हे वाचून मला त्याविषयी ओढ लागली. या कालावधीत मला अनुभूतीही आल्या.
१ आ. लग्नानंतर दिरांकडून नामस्मरणाचे महत्त्व कळणे; परंतु तरीही पोथीवाचनच सोपे वाटणे आणि हळूहळू नामजपात वाढ झाल्याने पोथीवाचन सुटून नामातूनच आनंद मिळणे : १९९९ मध्ये माझे लग्न झाले. मला नामस्मरणाचे महत्त्व ठाऊक होते; परंतु माझ्याकडून नामस्मरण होत नव्हते. माझे मोठे दीर श्री. संजय मुळ्ये (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांनी मला परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितलेला नामजप करण्यास सांगितले. तेव्हाही माझ्याकडून तो नामजप मनापासून आणि भावपूर्ण होत नसे. मला पोथीवाचनच सोपे वाटे. पुढे नामस्मरणात वाढ झाल्यावर हळूहळू पोथीवाचन सुटले आणि मला नामजपातच आनंद वाटू लागला.
२. स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन होण्यासाठी केलेले प्रयत्न
२ अ. रत्नागिरीला रहायला आल्यावर ‘दैनिक सनातन प्रभात’च्या वाचनातून स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया आणि गुणवृद्धी यांसाठी प्रयत्न होणे : आम्ही वर्ष २००८ मध्ये रत्नागिरीला राहण्यास आलो. तेव्हापासून आमच्याकडे ‘दैनिक सनातन प्रभात’ येऊ लागले. त्यातील ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया कशी राबवावी ? त्यासाठी कोणते प्रयत्न करावेत ?’, याविषयीचे मार्गदर्शन आणि साधकांच्या अनुभूती वाचल्यावर मला माझ्यातील स्वभावदोष शोधता आले. मला स्वयंसूचना सिद्ध करून त्या देता आल्या.
२ आ. गुरुदेवांच्या कृपेनेच काही प्रमाणात स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करता येणे : गुरुदेवांच्या कृपेने मला काही प्रमाणात स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करता येऊ लागले. आजही तेच सूक्ष्मातून माझे स्वभावदोष न्यून करण्यासह माझ्यात अल्प असलेले गुण दाखवून देतात आणि त्या गुणांची वृद्धी करण्यासाठी माझ्याकडून प्रार्थना अन् कृतज्ञता करवून घेतात. त्यांच्यामुळे माझ्याकडून भावजागृतीसाठी प्रयत्न होतात. आज मी जी आहे, ती परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळेच आहे. त्यांनी मला लेकरासारखी सांभाळली आहे. ‘गुरुमाऊली, मी तुमच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.’
३. मुलाच्या जन्माआधी दत्तगुरूंना केलेली प्रार्थना १९ वर्षानंतर मुलगा रामनाथी आश्रमात पूर्णवेळ साधना करू लागल्यावर पूर्ण होणे
माझा मुलगा श्रेयस (वय १९ वर्षे) याच्या जन्माच्या आधी मी श्री दत्तगुरूंना प्रार्थना केली होती, ‘या मुलाकडून तुमची सेवा घडो.’ ती प्रार्थना १९ वर्षांनी खरी झाली. जून २०१९ पासून श्रेयस रामनाथी आश्रमात पूर्णवेळ सेवा करत आहे. हे केवळ गुरुकृपेनेच घडले. त्यासाठी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
४. आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती
४ अ. परात्पर गुरु डॉक्टरांचे श्री दत्तगुरु आणि श्री नारायण यांच्या रूपांत दर्शन होणे : साधनेच्या आरंभी मी श्री दत्तगुरूंचा नामजप करत असे आणि त्यांचीच मानसपूजा करत असे. काही कालावधीनंतर मला श्री दत्तगुरूंनी परात्पर गुरु डॉक्टरांच्या रूपात दर्शन दिले. ‘परात्पर गुरु डॉक्टर हेच श्री दत्तगुरु आहेत आणि तेच श्री नारायण आहेत’, असे मला जाणवले. या दोन्ही रूपांत मी त्यांचे दर्शन घेतले आहे.
४ आ. नामजप करतांना ध्यानात प.पू. गुळवणी महाराजांच्या मठात जाणे, त्यांनी प्रसाद दिल्यावर ‘मला ध्यानात दिसलेले दृश्य खरे असेल, तर मला आश्रमातून खरोखरच प्रसाद मिळेल’, असा विचार करणे आणि प्रत्यक्षातही रामनाथी आश्रमातून प्रसाद मिळणे : माझ्या माहेरी श्री दत्तगुरूंची उपासना असल्यामुळे माझीसुद्धा दत्तगुरूंवर श्रद्धा आहे. लग्न झाल्यावर एके दिवशी मी नामस्मरणाला बसले होते. तेव्हा माझे ध्यान लागून मी कर्वेरोड, पुणे येथील ‘वासुदेव निवास’ या प.पू. गुळवणी महाराजांच्या आश्रमात गेलेली दिसले. मी प.पू. गुळवणी महाराजांच्या खोलीत जाऊन त्यांना नमस्कार केला. तेव्हा त्यांनी मला नारळ आणि फुलांचा हार प्रसाद म्हणून दिला. ध्यानातून बाहेर आल्यावर माझ्या मनात विचार आला, ‘जे दिसले, ते खरे असेल, तर आश्रमातून खरोखरच मला प्रसाद येईल.’ त्याप्रमाणे ४ दिवसांनी रामनाथी आश्रमातून माझे दीर श्री. संजय मुळ्ये हे आले. त्यांनी मला प्रसाद दिला आणि ते मला म्हणाले, ‘हा प्रसाद श्री दत्तगुरूंचा किंवा नवनाथांचा आहे’, असे समजून सेवन कर.’
४ इ. प.पू. गुळवणी महाराजांच्या जागी भगवान श्रीकृष्ण, प.पू. भक्तराज महाराज, परात्पर गुरु डॉ. आठवले दिसून ‘आम्ही सर्व एकच आहोत’, असा प्रत्यय परात्पर गुरुदेवांनी देणे : त्याच दिवशी संध्याकाळी नामजपाच्या वेळी मला मी परत प.पू. गुळवणी महाराजांच्या मठात सूक्ष्मातून गेलेली दिसले. नंतर त्यांच्या जागी अनुक्रमे भगवान श्रीकृष्ण, प.पू. भक्तराज महाराज, परात्पर गुरु डॉ. आठवले दिसले. माझ्या मनातील सर्व शंका दूर झाल्या. ‘आम्ही सर्व एकच आहोत’, असा प्रत्यय परात्पर गुरु डॉक्टरांनी मला दिला.
४ ई. मानसपूजा करतांना नृसिंहवाडीला नदीच्या काठावर बसल्याचे दृश्य दिसणे, अचानक पाण्याची पातळी वाढल्यावर भीती वाटून श्री गुरुदेवांचा धावा करणे आणि त्यांच्या चरणांना धरून अधांतरी तरंगतांना दिसणे, त्या वेळी गुरुदेवांनी उचलून घेऊन ‘घाबरू नकोस’, असे सांगून आश्वस्त करणे : मी प्रतिदिन सकाळी गुरुदेवांची मानसपूजा करते. एक दिवस मानसपूजा करतांना मला पुढील दृश्य दिसले. ‘मी नृसिंहवाडीला नदीच्या काठावर पायर्यांवर बसले होते. अचानक नदीचे पाणी वाढू लागले. मी पायर्या चढून भरभर वर येत होते, तसे पाणीही वेगाने माझ्या मागोमाग येत होते. ‘मी दमले’, असे मी कळवळून गुरुदेवांना सांगताच मला गुरुचरण दिसले. त्या चरणांना धरून मी तशीच अधांतरी हवेत तरंगत होते. मला पुष्कळ भीती वाटत होती आणि मी दमलेही होते. मी डोळे मिटून घेतले. काही वेळाने डोळे उघडले, तर परात्पर गुरुदेवांनी मला उचलून घेतले होते आणि माझ्या डोक्यावरून हात फिरवून मला म्हणाले, ‘बाळ, घाबरू नकोस. मी आहे.’
४ उ. रामनाथी आश्रमात आलेल्या अनुभूती : १६.५.२०१८ या दिवशी आम्ही उभयता आमचा मुलगा श्रेयस याच्यासह रामनाथी आश्रमात गेलो होतो. त्या वेळी मला पुढीलप्रमाणे अनुभूती आल्या.
१. मला आश्रमात प्रवेश केल्यावर सारखे रडू येत होते.
२. श्रीकृष्णाच्या छायाचित्राकडे पाहिल्यावर ‘त्याच्या डोक्यातून चक्राकार चैतन्य माझ्याकडे येत होते आणि श्रीकृष्णाला मला काही सांगायचे आहे’, असे वाटत होते.
३. सूक्ष्म-जगत प्रदर्शन परात्पर गुरु डॉक्टरांच्या केसांचे छायाचित्र पाहिल्यावर त्यांच्या सहस्रारातून अचानक पांढरा गोळा माझ्याकडे आला आणि माझे डोळे दिपले.
४. सूक्ष्म-जगत प्रदर्शनातील आरशात पाहिल्यावर विजेसारखी एक लहर अचानक माझ्या आज्ञाचक्रातून मुलाधारचक्रापर्यंत गेली.
५. आश्रमातील भिंतीला हात लावल्यावर गार वाटले. मला एका देवतेची पांढर्या रंगाची मूर्ती दिसली. नंतर प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राची चौकट (तसबीर) दिसली.
६. मी प.पू. डॉक्टरांच्या वाहनाला नमस्कार केल्यावर आत प.पू. भक्तराज महाराज बसलेले दिसले.
७. मी ध्यानमंदिरात बसले असतांना मला हिरव्या रंगाची चोळी आणि लाल रंगाची साडी परिधान केलेल्या अन् वाघावर बसलेल्या देवीचे दर्शन झाले.
५. मिळालेल्या पूर्वसूचना
५ अ. पुतणीला (६१ टक्के आध्यात्मिक पातळी असणारी मुलगी होण्यापूर्वी )परात्पर गुरु डॉक्टरांनी स्वप्नात येऊन घरी राहायला आल्याचे सांगणे : सप्टेंबर २०१४ या वर्षी (गणपतीच्या आधी) मला एक स्वप्न पडले. स्वप्नात मला पुढील दृश्य दिसले. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले आमच्या घरी आलेले दिसले. ते माझ्याजवळ बसले आणि मला म्हणाले, ‘मी तुमच्याकडे राहायला आलो आहे.’ त्यानंतर मला जाग आली. दोन दिवसांनी माझी पुतणी सौ. दीप्ती (श्री. संजय मुळ्ये यांची मुलगी) हिला दिवस गेल्याचे मला कळले. तिला मुलगी झाली. तिची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के असल्याचे घोषित करण्यात आले.
५ आ. स्वप्नात परात्पर गुरु डॉ. आठवले दिसल्यावर साधिकेने नमस्कार करणे, ‘आपली भेट बर्याच दिवसांनी झाली’, असे त्यांनी सांगणे आणि दुसर्याच दिवशी जाऊबाई श्रीमती अनुराधा मुळ्ये यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी झाल्याचे घोषित होणे : वर्ष २०१८ च्या नोव्हेंबर मासामध्ये गुरुद्वादशी होती. त्या रात्री मला स्वप्न पडले. त्यात परात्पर गुरु डॉक्टर आतल्या खोलीतून बाहेर आले. काहीतरी कामासाठी ते पटलाजवळ उभे होते. त्यांच्या कामात व्यत्यय नको; म्हणून मी त्यांना मनातूनच म्हणाले, ‘तुम्हाला नमस्कार करते.’ नमस्कार करून वर पाहिले, तर गुरुदेव माझ्याकडे पाहून प्रसन्नतेने हसत होते. ते मला म्हणाले, ‘आपली भेट बर्याच दिवसांनी झाली.’ त्यानंतर मला जाग आली. दुसर्या दिवशी माझ्या पनवेलच्या जाऊबाई श्रीमती अनुराधा मुळ्ये यांची पातळी ६१ टक्के घोषित झाल्याची आनंदाची वार्ता कळली.
हे सर्व गुरुदेवांनीच माझ्याकडून लिहून घेतले. त्याबद्दल गुरुचरणी मी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– सौ. ज्योती दीपक मुळ्ये, रत्नागिरी (१९.११.२०१९)
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या आणि संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |