मकरसंक्रांतीचे वाण देतांना प्लास्टिकमुक्त आणि आरोग्यपूरक वस्तूंचा वापर करण्याचे पुणे जिल्हा परिषदेचे आवाहन !

  • प्लास्टिकमुक्त मकरसंक्रांत साजरी करण्याचे पुणे जिल्हा परिषदेचे आवाहन कौतुकास्पद आहे. धर्मशास्त्रानुसार सात्त्विक वस्तूंचे उदा. सौभाग्याच्या वस्तू, उदबत्ती, उटणे, धार्मिक ग्रंथ दिल्यास त्याचा लाभ देणार्‍याला आणि घेणार्‍याला आध्यात्मिक स्तरावर होतो. – संपादक 
  • आरोग्यपूरक आणि पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करण्याचे आवाहन केवळ हिंदूंच्या सणांच्या वेळीच केले जाते अन्य धर्मियांच्या वेळी नाही, हे लक्षात येते. – संपादक 

पुणे – मकरसंक्रांतीचा सण कोविड नियमांचे पालन करून पर्यावरणपूरक पद्धतीने आणि प्लास्टिकमुक्त साजरा करावा, तसेच वाण देतांना आरोग्यपूरक आणि स्वयंसाहाय्यता समुहाद्वारे उत्पादित वस्तूंचा (मास्क, कापडी पिशवी, सेंद्रिय हळद, सेंद्रिय गूळ, तीळ इत्यादी) वापर करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी पत्राद्वारे केले आहे.

‘उमेद अभियान’ अंतर्गत गावागावांत महिला स्वयंसाहाय्यता समूह स्थापन करण्यात आले आहेत. या सर्व समुहांचा मिळून ग्रामसंघ स्थापन करण्यासाठी ‘गाव तेथे ग्रामसंघ’ असा उपक्रम जिल्हा परिषदेने हाती घेतला आहे. या अनुषंगाने आपल्या गावातील समुहात समाविष्ट नसलेल्या महिलांचे समूह स्थापन करण्यात येत आहेत. या समुहाचे प्रत्येक गावात एक असा ग्रामसंघ स्थापन करण्यात येत आहे. प्रत्येक गावात मकर संक्रांतीच्या निमित्ताने ग्रामसंघातील महिलांचा एकत्रित तीळगूळ समारंभ साजरा करावा, तसेच पर्यावरणपूरक आणि प्लास्टिकमुक्त मकरसंक्रांत साजरी करण्यासाठी सरपंच, उपसरपंच, सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी सहकार्य करावे, असे आवाहनही श्रीमती पानसरे यांनी केले आहे.