स्वतःच्या प्रत्येक कृतीतून साधकांना घडवून त्यांना परिपूर्ण करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात प्रथमच आल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांच्या खोलीतील दैवी पालट दाखवणे

‘वर्ष २००५ पासून मला सूक्ष्मातून ज्ञान मिळत आहे. वर्ष २००६ मध्ये मी आणि माझे कुटुंबीय आश्रमदर्शनासाठी प्रथमच रामनाथी (गोवा) येथील  सनातनच्या आश्रमात आलो होतो. आमच्या परत निघण्याचा दिवशी आमच्या कुटुंबाला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत झालेले दैवी पालट बघायचे होते. आम्ही खोलीत पोचल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वतः आम्हाला त्यांच्या खोलीतील दैवी पालट दाखवले. परात्पर गुरु डॉक्टरांनी आमच्याकडून ‘खोलीत ठेवलेल्या लाकडी कपाटातील कोणत्या खणातून कोणता गंध येतो ? खोलीतील शौचालय, स्नानगृह आणि निवासाचा भाग यांपैकी कुठे अधिक चांगले वाटते ?’, असे वेगवेगळे प्रयोग करवून घेऊन आम्हाला अनुभूती घेण्यास सांगितले.

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील सर्वाधिक आध्यात्मिक लाभ होण्यासंबंधीचे सूक्ष्म-परीक्षण साधकाने त्यांना सांगणे

आम्हा सर्वांचे प्रयोग करून झाले. त्यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘प्रत्येक प्रयोगात काय जाणवले ?’, असे आम्हाला विचारले. माझी मोठी बहीण कु. निधी हिने सांगितले ‘खोलीत सर्वाधिक आध्यात्मिक स्तरावरील लाभ शौचालयात झाले.’ यावर मी पटकन म्हणालो, ‘‘हो. खोलीतील अन्य भागांत परात्पर गुरु डॉ. आठवले सहजावस्थेत वावरतात. त्या वेळी त्यांच्या मनात कुठलाही विशिष्ट असा विचार नसतो. याउलट शौचालयात गेल्यावर ‘मूत्र, विष्टा यांप्रकारच्या रज-तमाचे लय व्हावे’, असा एकच विचार त्यांच्या मनात असतो. संतांच्या मनात येणारा विचार म्हणजे संकल्पच ! त्यामुळे शौचालयात ब्रह्मांडातील लयकारी (लयाचे कार्य करणारी) ईश्वरी शक्ती कार्यरत होते. साधक शौचालयात गेल्यावर लय करणार्‍या ईश्वरी शक्तीमुळे त्यांच्यावरील त्रासदायक (काळ्या) शक्तीचे आवरण आणि मनातील नकारात्मक विचार अशा सर्व रज-तमाचा लय होतो. यामुळे सर्वाधिक आध्यात्मिक स्तरावरील लाभ शौचालयात झाल्याचे जाणवते.’’

श्री. निषाद देशमुख

३. कुटुंबातील कुणीही लिहावयास वही-लेखणी इत्यादी आणले नसल्याने परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वतःच हे सूक्ष्म ज्ञान कागदावर लिहिणे

मी हे पटकन सांगितले. माझे सांगून झाल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले मला म्हणाले ‘‘थांब हं. मी हे ज्ञान लगेच लिहून घेतो.’’ त्यांचे वाक्य ऐकून मी आणि सर्व कुटुंबीय स्तब्ध झालो; कारण मी ते सहजच बोललो होतो. त्या वेळी माझे वय १७ – १८ वर्षांचे होते. मी तरुण असल्याने माझी अशी काही न काही बडबड नेहमी चालूच असायची. त्यामुळे तिकडे घरातील कुणीही लक्ष देत नसत. त्यामुळे ‘माझे बोलणे परात्पर गुरु डॉक्टरांनी गांभीर्याने घेणे’, हे माझ्यासाठी पुष्कळच आश्चर्यकारक होते.

४. शिकायला मिळालेली सूत्रे

४ अ. ‘सेवेसाठी वा सत्संगाला जातांना वही आणि लेखणी घेऊन जायला हवे’, हे लक्षात येणे : त्या वेळी आमच्याकडून मोठी चूक झाली होती. ती म्हणजे ‘दैवी पालट बघायला जातांना ते लिहून घेण्यासाठी वही आणि लेखणी समवेत नेली पाहिजे’, हे आमच्या कुणाच्याही लक्षात आले नव्हते. आमच्याकडे वही आणि लेखणी नसल्याने आम्ही कुणीही ते ज्ञान त्यांना लिहून देऊ शकत नव्हतो. परात्पर गुरु डॉक्टरांनी मी सांगितलेली ज्ञानाची वाक्ये मला परत म्हणायला सांगितली. मी ते त्यांना कसेबसे सांगितले. त्या वेळीही परात्पर गुरु डॉक्टरांनी माझी स्थिती समजून घेऊन स्वतःच योग्य वाक्यरचना करून ते ज्ञान लिहून घेतले.

४ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वतः लिहिण्याची कृती करून सतत शिकण्याच्या स्थितीत रहाण्याचा संस्कार केल्याचे जाणवणे : आमच्यापैकी कुणीही वही आणि लेखणी घेऊन न गेल्याने ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना स्वतःच ती माहिती लिहावी लागली’, याचे मला आणि कुटुंबातील सर्वांना पुष्कळ वाईट वाटले. त्यानंतर मी आणि घरातील सर्वजण सत्संग किंवा अन्यत्र सेवेला जातांना सतत वही-लेखणी सोबत ठेवू लागलो. या प्रसंगात स्वतः लिहिण्याची कृती करून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आमच्यावर सतत शिकण्याचा स्थितीत रहाण्याचे संस्कार केले. यांतून परात्पर गुरु डॉ. आठवले ‘स्वतःच्या प्रत्येक कृतीतून साधकांना घडवून कसे परिपूर्ण करतात ?’, ते आम्हाला प्रत्यक्ष शिकायला मिळाले. यासाठी गुरुमाऊलींच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !’

– श्री. निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.७.२०२०, दुपारी १.३४)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक