दैनिक ‘सनातन प्रभात’ प्रत्येक घरी पोचवण्यासाठी प्रयत्न करणे, ही समष्टी साधनाच आहे ! – सद्गुरु सत्यवान कदम

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या रत्नागिरी आवृत्तीचा २२ वा वर्धापनदिन सोहळा भावपूर्ण वातावरणात साजरा !

रत्नागिरी, ९ जानेवारी (वार्ता.) – २८ नोव्हेंबर १९९९ पासून दैनिक ‘सनातन प्रभात’ची रत्नागिरी आवृत्ती चालू झाली. हे दैनिक चालू झाल्यापासून एकही दिवस सुट्टी न घेता अव्याहतपणे चालू आहे. दैनिक ‘सनातन प्रभात’ हे व्यक्तीनिष्ठ नसून राष्ट्रनिष्ठ आणि धर्मनिष्ठ आहे. दैनिकाचा मुख्य उद्देश ‘हिंदूंना धर्मशिक्षण देणे’ हा आहे. धर्मशिक्षणासह धर्मरक्षणासाठी हिंदूंमध्ये जागृती कशी करावी ? धर्मद्रोही विचारांचे खंडण कसे करावे ? राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी वैध मार्गाने आपण काय प्रयत्न करू शकतो ? आदी गोष्टींविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’मधून दिशादर्शन करण्यात येते.

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वर्धापनदिन विशेषांकाचे प्रकाशन करताना डावीकडून श्री. संजय जोशी, सद्गुरु सत्यवान कदम आणि श्री. हरिश्चंद्र वेंगुर्लेकर

हिंदु संस्कृती आणि धर्म यांच्या रक्षणासाठी, तसेच समाज नीतीमान होण्यासाठी समाजमनावर साधनेचे महत्त्व बिंबवण्याचा प्रयत्न दैनिक ‘सनातन प्रभात’ सातत्याने करत आहे. दैनिक ‘सनातन प्रभात’ म्हणजे प्रतिदिन मिळणारा सत्संग आहे. त्यामुळे दैनिक ‘सनातन प्रभात’मधील दृष्टीकोन आपण आचरणात आणले, तर त्याचा आपल्याला लाभच होईल. दैनिक ‘सनातन प्रभात’ प्रत्येक घरी पोचवण्यासाठी प्रयत्न करणे, हीसुद्धा समष्टी साधनाच आहे, असे मार्गदर्शन सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांनी केले.

सद्गुरु सत्यवान कदम

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या रत्नागिरी आवृत्तीचा २२ वा वर्धापनदिन सोहळा ९ जानेवारी २०२२ या दिवशी दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळेत शहरातील टी.आर्.पी. बस स्टॉपजवळ अंबर सभागृहात भावपूर्ण वातावरणात साजरा झाला. त्या वेळी ते मार्गदर्शन करत होते.

यावर्षी कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे  ‘सनातन प्रभात’चा वर्धापनदिन सोहळा येथील जिल्हाधिकारी डॉ. बी.एन्. पाटील यांच्या आदेशान्वये मर्यादित उपस्थितीत साजरा करण्यात आला. या सोहळ्याच्या प्रारंभी शंखनाद करण्यात आला. त्यानंतर सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांनी दीपप्रज्वलन केले.

या वेळी व्यासपिठावर दैनिक ‘सनातन प्रभात’चे प्रतिनिधी श्री. हरिश्चंद्र वेंगुर्लेकर आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. संजय जोशी उपस्थित होते.

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वर्धापनदिन सोहळ्यातील मान्यवरांचे उद्बोधक विचार !

आदर्श रामराज्य स्थापन करायचे असेल, तर त्याविषयी आतापासून चिंतन असणे आवश्यक ! – हरिश्चंद्र वेंगुर्लेकर, प्रतिनिधी, दैनिक ‘सनातन प्रभात’

‘सनातन प्रभात’ आणि ‘सनातन प्रभात’चे वाचक यांच्यात कुटुंबभावना निर्माण झाली आहे. याच कुटुंब भावनेने आम्हीही आताच्या आपत्काळात आपल्या सर्वांना आध्यात्मिक स्तरावरील कोणते नामजपादी उपाय करावेत ? मनाची स्थिती सकारात्मक रहाण्यासाठी स्वयंसूचना कशा घ्याव्यात ? हे सांगितले. आम्ही कोरोनासारख्या भयंकर आजारातून बरे झालेल्या अनेक साधकांचे अनुभव आणि अनुभतीही प्रकाशित केल्या. भगवंताच्या अनुसंधानात राहून प्रयत्न केल्यावर परिस्थितीवर मात करता येते. याविषयी वाचकांना दिशा देण्याचा आमचा प्रयत्न होता. ‘सनातन प्रभात’ने कोरोनाच्या काळात देशात अराजकसदृश स्थिती का निर्माण झाली ? व्यवस्था किंवा यंत्रणा कुचकामी का ठरत आहेत ? यांविषयी विविध संपादकीय दृष्टीकोन देऊन किंवा सदरे चालू ठेवून लोकांना चिंतन करण्यास प्रवृत्त केले आहे; कारण आपल्याला आदर्श रामराज्य स्थापन करायचे असेल, तर त्याविषयी आतापासून चिंतन केले पाहिजे. यासाठीच आगामी आपत्काळाला, तिसर्‍या महायुद्धामुळे निर्माण होणार्‍या स्थितीला सामोरे कसे जायचे ? याचे सविस्तर मार्गदर्शन करून ‘सनातन प्रभात’ समाजाला सिद्ध करत आहे. दैनिक ‘सनातन प्रभात’मधील बातम्या आता ‘डेली हंट’ या न्यूज ॲपवर प्रसिद्ध होत आहेत. टेलीग्राम, इन्स्टाग्राम, ट्विटर आदींच्या माध्यमातूनही हे कार्य गुरुकृपेने चालू आहे. आगामी काळात हिंदु राष्ट्राचा विचार कोट्यवधी लोकांपर्यंत पोचवण्यासाठी ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून कार्य चालूच राहील. ‘सनातन प्रभात’ नियतकालिक घराघरांत पोचवण्यासाठी प्रयत्न करून आपणही या कार्यात सहभागी होऊन गुरुकृपा संपादन करूया.

हिंदूंच्या देवता, संस्कृती आणि राष्ट्रपुरुष यांच्या अवमानाला वैध मार्गाने विरोध कसा करावा ? याची दिशा ‘सनातन प्रभात’मधून मिळते ! – संजय जोशी, हिंदु जनजागृती समिती

आज विविध व्यासपिठांवरून हिंदु देवतांची विटंबना, राष्ट्रपुरुषांचा अवमान होत असतो. हिंदूंचा बुद्धीभेद करण्याचे कार्य चालू असते. या सर्वांना धर्मशिक्षित हिंदूंनी कसा विरोध करावा ? तसेच बुद्धीभेद करणार्‍यांचे परखडपणे खंडण कसे करावे ? हे ‘सनातन प्रभात’मधून शिकायला मिळते. फ्रान्समधील ‘चार्ली हेब्दो’ या नियतकालिकाने पूर्वी महंमद पैगंबर यांची विटंबना केली होती. आता त्यांनी, ‘भारतात ऑक्सिजनचा तुटवडा असतांना हिंदूंच्या ३ कोटी ३३ लाख देवता काय करत आहेत ?’, असा प्रश्न विचारला. त्यांना हिंदु धर्मात ३३ कोटी देवता आहेत, हेही ठाऊक नाही. या अवमानाविषयी ‘सनातन प्रभात’च्या मुख्य पानावर ठळकपणे बातमी प्रसिद्ध करण्यात आली आणि त्या बातमीत ‘आकाशातील बाप तुम्हाला साहाय्य करील’, असे चर्चमधून सांगितले जाते, तर ‘शार्ली हेब्दो आताच्या स्थितीवरून त्यावर प्रश्न का विचारत नाहीत ?’, असा प्रश्न कुणी उपस्थित केला, तर त्यावर ‘शार्ली हेब्दो काय उत्तर देणार आहे ?’, असे विचारण्याचे काम केले.

‘सनातन प्रभात’ नियतकालिकांनी हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी, वाचक, धर्मनिष्ठ यांच्यामध्ये ईश्वरनिष्ठा, सत्यनिष्ठा, धर्माविषयीची ओढ निर्माण केली. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी २२ वर्षांपूर्वी दूरदृष्टी ठेवून ‘सनातन प्रभात’ सर्वांसमोर आणले. ‘सनातन प्रभात’मधील परखड लिखाण आणि योग्य दृष्टीकोन यांमुळे धर्मप्रेमींना योग्य दिशा मिळाली. आज अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन केले जात आहे आणि हिंदूंवर टीका केली जात आहे. अशा वेळी समाजाला योग्य दिशा देण्याचे काम ‘सनातन प्रभात’ करत आहे. हिंदु धर्मावरील आघातांच्या विरोधात आवाज उठवून सर्वांमध्ये धर्म आणि राष्ट्र निष्ठा निर्माण करण्याचे काम ‘सनातन प्रभात’ करत आहे. अशा सनातन प्रभातचे वाचक व्हा आणि इतरांनाही वाचक बनवा !

वर्धापनदिन सोहळ्यात वाचकांनी व्यक्त केलेले मनोगत हिंदूंना त्यांच्या तेजाची आणि शक्तीची जाणीव करून देण्यात दैनिक ‘सनातन प्रभात’चा सिंहाचा वाटा ! – श्री. रणजीत गद्रे, रत्नागिरी 

मनोगत व्यक्त करतांना दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचक श्री. रणजीत गद्रे म्हणाले की, ७४ वर्षांत जे समाजमाध्यमांनी केले नाही, ते दैनिक ‘सनातन प्रभात’ने केले आहे. याचा वाचक म्हणून मला अभिमान वाटतो. ‘सनातन प्रभात’चा महत्त्वाचा उद्देश हिंदु राष्ट्राची स्थापना हा आहे. ‘सनातन प्रभात’ सांगते धर्म टिकला, तर राष्ट्र टिकेल आणि राष्ट्र टिकले, तर तुम्ही-आम्ही टिकू. भ्रष्टाचाराच्या बातम्या प्रतिदिन अन्य वृत्तपत्रांमध्ये येतात; पण त्याला पायबंद कसा घालायचा ? हे दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये सांगितले जाते. २२ वर्षांपूर्वी लावलेले एक छोटेसे रोप आज एका मोठ्या वृक्षामध्ये रूपांतरीत होत आहे आणि इथून पुढे मोठ्या वटवृक्षामध्ये रूपांतरीत व्हावे, अशी इच्छा व्यक्त करतो. हिंदूंना त्यांच्या तेजाची आणि शक्तीची जाणीव करून देण्यात दैनिक ‘सनातन प्रभात’चा सिंहाचा वाटा आहे. संस्कृती, धर्म, राष्ट्रभक्ती यांविषयी अभिमान आणि आदर निर्माण करण्याची वैचारिकता ‘सनातन प्रभात’ने दिली आहे.

राजकारणविरहीत असलेला सनातन प्रभात ! – श्री. जयंत बिवलकर

दैनिक ‘सनातन प्रभात’चे वैशिष्ट्य म्हणजे या दैनिकात कोणतेही राजकारण नाही. दैनिकातील लिखाण प्रसिद्ध करतांना त्यामध्ये काही चूक झाली, तर अन्य कोणत्याही वृत्तपत्रात याविषयीची ‘शासन’ व्यवस्था नाही. जी व्यवस्था दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये आहे. दैनिकामध्ये येणारी व्याकरणासंदर्भातील माहितीही उपयुक्त आहे.

सनातन प्रभात मधून धर्मशिक्षण मिळते ! – सौ. निशिगंधा साने

देवतांची उपासना कशी करावी ?, विधीवत पूजन कसे करावे ? याविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये छापून येत असते. आपल्याला आपल्यातील एक-एक दोष घालवायचा आहे, तर यासाठी काय करावे लागेल ? याविषयी हे दैनिक अनेक वर्षे मार्गदर्शन करत आहे.  मंदिर सरकारीकरण, महिलांवरील अत्याचार, लव्ह जिहाद, आतंकवाद आदी घटनांवर योग्य तो दृष्टीकोन देणारे हे पहिलेच दैनिक आहे, असे मनोगत सनातन प्रभातच्या वाचिका सौ. निशिगंधा यांनी व्यक्त केले.

‘सनातन प्रभात’मधून देव, देश आणि धर्म यांची माहिती मिळते ! – श्री. रमेश केळकर, रत्नागिरी

कुलदेवता आणि श्री गुरुदेव दत्ताच्या नामजपाचे महत्त्व, पूजा सात्त्विक पद्धतीने कशी करावी ? याविषयीची माहिती मला ‘सनातन प्रभात’मधून मिळाली. ‘सनातन प्रभात’चा वाचक झाल्याने मी खूप आनंदी आहे. माझ्या आयुष्यात बर्‍यात वेळा अडचणी आल्या; पण सनातनचा भक्कम आधार असल्याने मी वेळोवेळी अडचणीवर मात करू शकलो आहे. या दैनिकातून देव, देश आणि धर्म यांविषयी माहिती मिळते. ‘लव्ह जिहाद’ हे शब्द केवळ ‘सनातन प्रभात’मध्येच वाचायला मिळाले. मी एस्.टी. महामंडळात कामाला आहे. तिथे प्रत्येक महिन्याच्या ३० तारखेला निरोप समारंभ होतो. तिथे मी वक्तृत्व करतो; मात्र तेथे बोलणे आणि येथे बोलणे, यामध्ये मला फरक जाणवतो.

विशेष

सौ. स्नेहा ताम्हनकर

१. ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे संस्थापक-संपादक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वर्धापनदिनानिमित्त दिलेल्या संदेशाचे वाचन सनातनच्या साधिका ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. अंजली करंबेळकर यांनी केले.‘हिंदु राष्ट्राची स्थापना’, हे दैनिकाचे ध्येय वाक्य साध्य करा’, असे आवाहन त्यांनी या संदेशाच्या माध्यमातून केले.

२. या सोहळ्याचे सूत्रसंचालन ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधी सौ. स्नेहा ताम्हनकर यांनी केले.

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वाचकांचे अभिप्राय

डॉ. सुरेश गोते, पाचल, तालुका राजापूर.

दैनिक ‘सनातन प्रभात’ हे केवळ पत्रक नसून ईश्वरी कार्य आहे. ‘सनातन प्रभात’मुळे आपली संस्कृती, इतिहास आणि हिंदु धर्माविषयी हिंदूंमध्ये जनजागृती होत आहे, तसेच हिंदु राष्ट्र स्थापनेमध्ये ‘सनातन प्रभात’ची महत्त्वाची भूमिका असेल.

किशोर पटेल, रत्नागिरी

दैनिक ‘सनातन प्रभात’मधून धर्माविषयी जाणीव करून दिली जाते. धर्मांतराविषयीच्या बातम्या ‘सनातन प्रभात’मधून पोचवल्या जातात. तसेच दैनिकातून हिंदु धर्माचे महत्त्व समजते. दैनिक ‘सनातन प्रभात’वाचून आम्ही धर्माचरण करायला प्रारंभ केला. समाजामध्ये आम्ही एकत्र येतो, तेव्हा कपाळाला टिळा लावतो आणि नामस्मरण करतो.