‘३.१.२०२२ या दिवसापासून पौष मास चालू आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.
१. हिंदु धर्मानुसार ‘प्लव’नाम संवत्सर, शालिवाहन शक – १९४३, उत्तरायण, हेमंतऋतू, पौष मास आणि शुक्ल पक्ष चालू आहे.
(साभार : दाते पंचांग)
२. शास्त्रार्थ
२ अ. भानुसप्तमी : रविवारी येणार्या सप्तमीला ‘भानुसप्तमी’ म्हणतात. या दिवशी सूर्याच्या उपासनेला विशेष महत्त्व असल्याने सूर्याेदयसमयी सूर्याला अर्घ्य द्यावे, तसेच गायत्री मंत्र म्हणावा. ९.१.२०२२ या दिवशी ‘भानुसप्तमी’ आहे.
२ आ. भद्रा (विष्टी करण) : ज्या दिवशी ‘विष्टी’ करण असते. त्या काळालाच ‘भद्रा’ किंवा ‘कल्याणी’ असे म्हणतात. भद्रा काळात शुभ आणि मंगल कार्ये करत नाहीत; कारण त्या कार्यांत विलंब होण्याचा संभव असतो. ९.१.२०२२ या दिवशी सकाळी ११.०९ पासून रात्री ११.४१ पर्यंत आणि १३.१.२०२२ या दिवशी सकाळी ६.१० पासून सायंकाळी ७.३३ पर्यंत विष्टी करण आहे.
२ इ. दुर्गाष्टमी : प्रत्येक मासाच्या अमावास्येनंतर येणार्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला ‘दुर्गाष्टमी’ म्हणतात. या दिवशी श्री दुर्गादेवीचे व्रत करतात. अनिष्ट शक्तींचा नाश होऊन भयमुक्त होण्यासाठी हे व्रत करतात. या दिवशी दुर्गासप्तशतीस्तोत्र, कवच, अर्गलास्तोत्र आदी देवीस्तोत्रांचे वाचन करतात. १०.१.२०२२ या दिवशी दुपारी १२.२५ पर्यंत अष्टमी तिथी आहे.
२ ई. शाकंभरीदेवी उत्सवारंभ : पौष शुक्ल अष्टमी तिथीपासून पौष पौर्णिमेपर्यंत शाकंभरीदेवीचा उत्सव साजरा केला जातो. प्राचीन काळी दुष्काळ पडल्यावर ऋषिमुनींनी देवीची आराधना केली. त्यामुळे पर्जन्यवृष्टी झाली आणि प्रथम शाक म्हणजे पालेभाज्या उगवल्या. लोकांनी त्या पालेभाज्यांचा नैवेद्य दाखवून तो प्रसाद म्हणून घेतला. ‘दुष्काळ संपला’, या प्रसंगाची आठवण म्हणून अजूनही हा कुलधर्म पाळला जातो. शक्य त्या भाज्यांचा नैवेद्य देवीला समर्पण करतात; म्हणून या देवीला ‘शाकंभरीदेवी’ म्हणतात. १०.१.२०२२ पासून १७.१.२०२२ पर्यंत शाकंभरीदेवीचा उत्सव आहे.
२ उ. अमृतयोग : नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने ‘अमृतयोग’ किंवा ‘अमृतसिद्धीयोग’ होतो. रविवारी हस्त नक्षत्र, सोमवारी मृग नक्षत्र, मंगळवारी अश्विनी नक्षत्र, बुधवारी अनुराधा नक्षत्र, गुरुवारी पुष्य नक्षत्र, शुक्रवारी रेवती नक्षत्र आणि शनिवारी रोहिणी नक्षत्र असेल, तर ‘अमृतयोग’ किंवा ‘अमृतसिद्धीयोग’ होतो. अमृतयोगावर कोणतेही शुभ कार्य केल्यावर यश प्राप्त होते. मंगळवार, ११.१.२०२२ या दिवशी सकाळी ११.१० पर्यंत अश्विनी नक्षत्र असल्याने अमृतयोग आहे. मंगळवारी अश्विनी नक्षत्र आल्याने जो अमृतसिद्धीयोग होतो, तो गृहप्रवेशास वर्ज्य करावा.
२ ऊ. पुत्रदा एकादशी : श्रावण शुक्ल पक्ष एकादशी आणि पौष शुक्ल पक्ष एकादशी या दोन्ही एकादशींना ‘पुत्रदा एकादशी’ म्हणतात. या दिवशी भगवान विष्णु आणि श्री लक्ष्मी यांची पूजा करतात. ‘पुत्रदा एकादशीच्या व्रताने दांपत्याला पुत्र संतती होते’, असे मानले जाते. या दिवशी श्री विष्णूचे नामस्मरण आणि कीर्तन करावे. या दिवशी ‘एकादशी माहात्म्य’ आणि ‘श्रीविष्णुसहस्रनाम’ यांचे वाचन करतात. १३.१.२०२२ या दिवशी पुत्रदा एकादशी आहे.
२ ए. धनुर्मास समाप्ती : सूर्य ग्रहाचा धनु राशीत प्रवेश झाल्यावर दुसर्या दिवशी धनुर्मासाचा प्रारंभ होतो. भोगीच्या दिवशी म्हणजे मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी धनुर्मास समाप्ती असते. १३.१.२०२२ या दिवशी धनुर्मास समाप्ती आहे.
२ ऐ. भोगी : मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा उत्सव साजरा करतात. या दिवशी तीळमिश्रित भाकरीसह उष्णतावर्धक भाज्या खातात. १३.१.२०२२ या दिवशी भोगी आहे.
२ ओ. मन्वादि : पौष शुक्ल पक्ष एकादशी या तिथीला ‘मन्वादियोग’ होतो. या दिवशी केलेल्या श्राद्धाचे विशेष फल सांगितले आहे. १३.१.२०२२ या दिवशी मन्वादियोग आहे.
२ औ. घबाड मुहूर्त : हा शुभ मुहूर्त आहे. १३.१.२०२२ या दिवशी सायंकाळी ७.३३ पासून १४.१.२०२२ या दिवशी रात्री ८.१८ पर्यंत आणि १५.१.२०२२ या दिवशी रात्री ११.२१ पासून रात्री १२.५८ पर्यंत घबाड मुहूर्त आहे.
२ अं. यमघंटयोग : रविवारी मघा, सोमवारी विशाखा, मंगळवारी आर्द्रा, बुधवारी मूळ, गुरुवारी कृत्तिका, शुक्रवारी रोहिणी आणि शनिवारी हस्त नक्षत्र एकत्र आल्यास ‘यमघंटयोग’ होतो. हा अनिष्टयोग आहे. प्रवासासाठी हा योग पूर्णतः वर्ज्य करावा. गुरुवारी १३.१.२०२२ या दिवशी सायंकाळी ५.०७ पर्यंत कृत्तिका नक्षत्र असल्याने यमघंटयोग आहे. तसेच शुक्रवार १४.१.२०२२ या दिवशी रात्री ८.१८ पर्यंत रोहिणी नक्षत्र असल्याने यमघंटयोग आहे.
२ क. मकरसंक्रांत : सूर्याचा मकर राशीत प्रवेश झाल्यावर पुण्यकाळाच्या दिवशी मकरसंक्रांत हा सण साजरा करतात. १४.१.२०२२ या दिवशी पुण्यकाल दुपारी २.२९ पासून सूर्यास्तापर्यंत आहे. महाराष्ट्रात ‘मकरसंक्रांत’, तामिळनाडूमध्ये ‘पोंगल’ आणि पंजाबमध्ये ‘लोहरी’ या नावाने हा सण प्रसिद्ध आहे. थंडीच्या दिवसात येणार्या या सणाला तिळासारख्या स्निग्ध पदार्थाच्या समवेत उष्णता निर्माण करण्यासाठी गुळाचा वापर केला जातो. संक्रांतीच्या दिवशी केलेले तीर्थस्नान आणि दान पुण्यकारक मानले आहे.
२ ख. शनिप्रदोष : प्रत्येक मासातील शुक्ल आणि कृष्ण त्रयोदशीला ‘प्रदोष’ असे म्हणतात. शनिवारी येणार्या प्रदोष तिथीला ‘शनिप्रदोष’ म्हणतात. १५.१.२०२२ या दिवशी शनिप्रदोष आहे. संततीसुखासाठी आणि जीवनात येणार्या अडचणींच्या निवारणार्थ शनिप्रदोष हे व्रत करतात. प्रदोष या व्रताची देवता ‘शिव’ आहे. या दिवशी सायंकाळी शिवपूजन करावे, तसेच शिवकवच आणि शिवमहिम्नस्तोत्र वाचावे.
२ ग. करिदिन : मकरसंक्रांतीच्या दुसर्या दिवशी ‘किंक्रांत’ म्हणजेच ‘करिदिन’ असतो. ‘या दिवशी कोणतेही शुभ कार्य करू नये’, असा प्रघात आहे. १५.१.२०२२ या दिवशी किंक्रांत आहे.
– सौ. प्राजक्ता जोशी (ज्योतिष फलित विशारद, वास्तु विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल शास्त्री, हस्ताक्षर मनोविश्लेषण शास्त्र विशारद आणि हस्तसामुद्रिक प्रबोध), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.
(२६.१२.२०२१)
टीप १ – भद्रा (विष्टी करण), दुर्गाष्टमी, घबाड मुहूर्त, अमृतयोग, एकादशी, प्रदोष आणि करिदिन यांविषयीची अधिक माहिती पूर्वी प्रसिद्ध केली आहे.
टीप २ – वरील सारणीतील शुभ / अशुभ दिवस पाहून ‘दिवस अशुभ आहे’, हे कळल्यावर ‘प्रवास किंवा इतर सेवा केल्यास त्याचे अशुभ परिणाम भोगावे लागतील’, अशी शंका साधकांच्या मनात निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा साधकांनी संतांची पुढील वचने लक्षात ठेवावीत. १. हरिचिया दासा हरि दाही दिशा । भावें जैसा तैसा हरि एक ।। – संत एकनाथ अर्थ : भक्ताला सर्वत्र देवाचेच दर्शन होते. भक्ताचा जसा भाव असतो, त्या स्वरूपात त्याला देव दिसतो. २. तुका म्हणे हरिच्या दासा । शुभ काळ दाही दिशा ।। – संत तुकाराम अर्थ : तुकाराम महाराज म्हणतात, ‘भक्तासाठी सर्व दिशा आणि वेळ ही शुभच असते.’ ज्या व्यक्तीच्या मनात सतत ईश्वरप्राप्तीचा ध्यास आहे, अशा भक्ताची काळजी ईश्वर घेतो.’ |