गुरुचरणी लीन आणि भावमग्न असणारे सुमन म्हणजेच सनातनच्या ६२ व्या समष्टी संत पू. (श्रीमती) सुमन नाईक (वय ७३ वर्षे) !

७ जानेवारी २०२२ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘पू. (श्रीमती) सुमन नाईक यांचा सनातन संस्थेशी संपर्क कसा आला ? साधनेच्या आरंभीच्या काळात पू. (श्रीमती) सुमनमावशी यांना आलेल्या अनुभूती, त्यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रतीचा भाव’ यांविषयीची सूत्रे पाहिली. या लेखात त्यापुढील सूत्रे पाहूया.

पू. (श्रीमती) सुमन नाईक

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/541695.html

६. संतपद घोषित केल्यानंतर

६ अ. संतपद घोषित केल्यानंतर साधकांना मार्गदर्शन करण्यासाठी गेल्यावर मराठी बोलता येत नसतांनाही परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने मराठीतून सहजतेने बोलता येणे आणि उत्साह अन् आनंद जाणवणे : माझे संतपद घोषित केल्यावर मी साधकांना मार्गदर्शन करण्यासाठी गेल्यावर मला कसलीच भीती वाटत नव्हती. मला एक प्रकारचा उत्साह आणि आनंद जाणवत होता. माझी भाषा कोकणी असल्यामुळे मला मराठी बोलता येत नव्हते, तरीही परात्पर गुरु डॉक्टर मला योग्य ते शब्द सुचवून माझ्याकडून मराठीतून बोलवून घेत होते.

६ आ. मार्गदर्शनाला गेल्यावर ‘गुरुदेव आसंदीत बसून मार्गदर्शन करणार आहेत’, असा भाव ठेवणे आणि मार्गदर्शन केल्यावर आनंदात वाढ होणे : मी मार्गदर्शनाला ज्या ठिकाणी जात होते, तेथे साधक मला बसण्यासाठी आसंदी ठेवत असत. त्या वेळी मी ‘गुरुदेवा, हे सगळे तुमच्यासाठी ठेवले आहे. तुम्हीच आता इकडे येऊन बसा आणि साधकांना मार्गदर्शन करा’, अशी भावपूर्ण प्रार्थना करून मी मार्गदर्शनाला आरंभ करत असे. ‘मी जसजसे बोलत असे, तसतशी माझ्या आनंदात वाढ होत आहे’, असे मला जाणवायचे आणि त्या वेळी माझ्याकडून गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त होत असे.

७. साधकांसाठी नामजपादी उपाय करतांना आलेली अनुभूती

७ अ. साधकांसाठी नामजपादी उपाय करतांना सनातनच्या तीनही गुरूंप्रती भाव ठेवणे, नामजपादी उपाय करतांना ध्यान लागणे आणि वेळेचे भान न रहाणे : साधकांसाठी नामजपादी उपाय करण्यापूर्वी मी स्थानदेवता आणि वास्तुदेवता यांना प्रार्थना करून नामजप करत असे. साधकांसाठी नामजप करतांना मी ‘माझा देह हे एक पायपुसणे आहे. ते पायपुसणे मी भूमीवर अंथरले आहे. मानेच्या भागावर श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे चरण आहेत. मधे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे चरण आणि पायावर श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे चरण आहेत’, असा भाव ठेवायचे. साधकांसाठी नामजप करतांना मधूनमधून माझे ध्यान लागायचे. नामजप करण्याची वेळ संपल्याचेही माझ्या लक्षात येत नसे.

८. पू. सुमनमावशी यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला उत्कट भाव

८ अ. परात्पर गुरुदेवांची भेट झाल्यावर मला त्यांना व्यावहारिक प्रश्न विचारावेसे वाटले नाहीत; पण मी घरी असतांना गुरुदेवांचा धावा करते, तेव्हा त्यांना सर्वकाही सांगत असे.

८ आ. गुरुदेवांची तीव्रतेने आठवण येऊन भावजागृती होणे, ‘गुरुदेव विसरले असतील’, असे वाटून त्यांना कळकळीने हाक मारणे आणि अर्ध्या घंट्याने गुरुदेवांनी आश्रमात बोलावून घेऊन ‘मी तुम्हाला विसरलो नाही’, असे सांगणे : एक दिवस मला गुरुदेवांची तीव्रतेने आठवण येऊन माझी भावजागृती होत होती. मी गुरुदेवांना कळकळीने हाक मारली, ‘हे देवा, तू मला विसरलास का ?’ त्यानंतर अर्ध्या घंट्याने ‘मला आश्रमात बोलावले आहे’, असा भ्रमणभाष आला. परात्पर गुरुदेवांच्या खोलीत प्रवेश करतांना ते मला म्हणाले, ‘‘मी तुम्हाला विसरलो नाही.’’ त्यांचे बोलणे ऐकून मी गोंधळून गेले आणि ‘काय बोलावे ?’, ते मला सुचले नाही.

८ इ. ‘तुम्ही सर्वांची मावशी होणार’, असे गुरुदेवांनी सांगणे आणि पुढे सर्वांनी ‘पू. मावशी’ असे संबोधणे : एक दिवस गुरुदेव मला म्हणाले, ‘‘आता तुम्ही सर्वांच्या मावशी होणार.’’ त्याची प्रचीती आता मला येत आहे. आता मला सर्व साधक ‘पू. मावशी’ असे संबोधतात. माझा ज्या साधकांशी परिचय नाही, ते साधकही मला ‘पू. मावशी’, असे संबोधतात. त्या वेळी मला गुरुदेवांच्या बोलण्याची आठवण होऊन माझी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त होते.

८ ई. ‘सूर्यनारायण हेही परात्पर गुरुदेवांचे रूप आहेत’, असा भाव ठेवून साधकांसाठी प्रार्थना करणे : मी पूर्वीपासून प्रतिदिन सकाळी सूर्याची नावे घेऊन सूर्यदेवाला नमस्कार करत असे. आता मी ‘सूर्यनारायण हेही परात्पर गुरुदेवांचे रूप आहे’, असा भाव ठेवून नमस्कार करते. त्या वेळी सूर्यनारायण मला निळा, पिवळा आणि लाल अशा वेगवेगळ्या रंगांत दिसतो. त्या वेळी माझ्याकडून प्रार्थना होते, ‘गुरुदेवा, तुम्हीच सूर्यनारायणही आहात. हे सूर्यनारायणा, तुझ्या किरणांनी सर्व साधकांवरील त्रासदायक शक्तीचे आवरण नष्ट होऊ दे. तुमचे चैतन्य सगळ्यांना मिळू दे. प्रसारसेवा करणार्‍या साधकांना तुमच्या किरणांतून शक्ती मिळू दे. कोरोना संसर्गाचे संकट नष्ट होऊन सर्व साधकांचे रक्षण होऊ दे.’

९. कृतज्ञता

साधना करण्यासाठी मला आमच्या सगळ्या कुटुंबीयांची साथ मिळाली. त्यामुळे मी साधना जोमाने करू शकले. मी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करते.’                                    (समाप्त)

– (पू.) श्रीमती सुमन नाईक, कपिलेश्वरी, फोंडा, गोवा. (२९.८.२०२१)


पीठ पेरून केलेल्या भाज्या खाण्याची सवय नसणे, परात्पर गुरु डॉ. आठवले यांना महाप्रसाद अर्पण केल्यावर त्या भाज्यांना खमंग वास येत असल्याचे जाणवणे आणि भाज्यांना अवीट गोडी असणे

‘१.६.२०२१ या दिवसापासून मी काही दिवसांसाठी सनातनच्या गोवा येथील आश्रमात रहायला गेले होते. त्या वेळी मला ‘मी माहेरी जात आहे’, असे वाटत होते. मी तेथे असतांना एक दिवस दुपारच्या महाप्रसादात वांग्याची आणि दुसरी एक भाजी, अशा दोन वेगळ्या भाज्या पीठ पेरून केल्या होत्या. मला अशा पद्धतीने शिजवलेल्या भाज्या खाण्याची सवय नसल्याने ‘त्या भाज्या माझ्याकडून सेवन होतील’, असे मला वाटत नव्हते. त्याच वेळी महाप्रसादाचा अव्हेर करणेही मला शक्य नव्हते. मी नेहमीप्रमाणे परात्पर गुरु डॉक्टरांना भोजन अर्पण केले. मी तोंडात घास घालत असतांना भाज्यांना खमंग वास येत असल्याचे मला जाणवले. खाल्ल्यावर त्या भाज्यांना अवीट गोडी असल्याचे माझ्या लक्षात आले. आवड-नावड न ठेवता ईश्वराचा प्रसाद समजून अन्न सेवन करायला शिकवल्यामुळे मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली.’

– (पू.) श्रीमती सुमन नाईक, कपिलेश्वरी, फोंडा, गोवा (१८.७.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक