गुरुचरणी लीन आणि भावमग्न असणारे सुमन म्हणजेच कपिलेश्वरी, (फोंडा) गोवा येथील सनातनच्या ६२ व्या समष्टी संत पू. (श्रीमती) सुमन नाईक (वय ७२ वर्षे) !

६ जानेवारी २०२२ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण पू. सुमनमावशींचे बालपण आणि त्यांनी केलेले कर्मकांडातील विधी अन् त्या वेळी त्यांना आलेल्या अनुभूती, यांविषयीची सूत्रे पाहिली. या लेखात पू. सुमनमावशी सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यानंतर त्यांना घडलेले प.पू. भक्तराज महाराज यांचे दर्शन, पू. सुमनमावशींनी केलेल्या सेवा आणि त्यांचा परात्पर गुरुदेवांप्रतीचा उत्कट भाव, यांविषयीची सूत्रे जाणून घेऊया.

पौष शुक्ल पक्ष द्वितीया (४.१.२०२२) या दिवशी पू. सुमनमावशी यांचा ७३ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त हा लेख येथे प्रसिद्ध करत आहोत.

मागील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा ः https://sanatanprabhat.org/marathi/541411.html


पू. (श्रीमती) सुमन नाईक

३. सनातन संस्थेशी संपर्क

३ अ. कपिलेश्वर मंदिरातील पुजार्‍यांनी सनातनच्या सत्संगाला जाण्याविषयी सुचवणे आणि घरून विरोध असतांनाही सत्संगाला जाणे ः मी प्रतिदिन सकाळी कपिलेश्वर देवाचे (कवळे, गोवा) दर्शन घेऊन देवळाभोवती प्रदक्षिणा घालायचे. एक दिवस तेथील पुजारी मला म्हणाले, ‘‘तू एवढ्या सगळ्या देवांची नावे घेऊन भक्ती करतेस, तर फोंडा, गोवा येथील वरच्या बाजारात विठोबाच्या मंदिरात सनातनचा सत्संग चालतो, तेथे का जात नाहीस ? तेथे तुला पुष्कळ शिकायला मिळेल.’’ त्यांचे बोलणे ऐकून मला चांगले वाटले; पण मला सत्संगाला जायला घरून अनुमती मिळणार नव्हती. माझे यजमान (कै. तुलसीदास नाईक) कडक स्वभावाचे होते. एक दिवस मी यजमानांना न सांगता सत्संगाला गेले.

३ आ. सनातनच्या सत्संगाला गेल्यावर तेथील वातावरण पाहून भारावून जाणे ः वर्ष १९९५ मध्ये पहिल्याच दिवशी मी सनातनच्या सत्संगाला गेल्यावर बाहेरच्या बाजूला सर्व पादत्राणे व्यवस्थित रांगेत लावलेली होती. ते पाहून मला चांगले वाटले. सत्संगात भजनाचा कार्यक्रम होता. तो सत्संग पाहून मी भारावून गेले.

३ इ. प.पू. भक्तराज महाराज यांच्या अमृत महोत्सव सोहळ्याला जाण्याची संधी मिळणे

३ इ १. आर्थिक स्थिती नसल्यामुळे इंदूर येथे प.पू. भक्तराज महाराज यांच्या अमृत महोत्सव सोहळ्याला जाण्याचे टाळणे; मात्र त्याच वेळी एका व्यक्तीने त्याच्याकडून बर्‍याच वर्षांपासून येणे बाकी असलेली रक्कम दिल्याने सोहळ्याला जाता येणे ः वर्ष १९९५ मध्ये इंदूर येथे प.पू. भक्तराज महाराज यांच्या अमृत महोत्सव सोहळ्याला जाण्यासाठी साधक मला आग्रह करत होते. माझ्या मनात इच्छा असूनही आर्थिक अडचणीमुळे मी जाण्याचे टाळत होते, तरीही साधकांनी इंदूर येथे जाण्यासाठी माझे नाव नोंदवले. मी धाडस करून यजमानांना याविषयी सांगण्याचा प्रयत्न केला; मात्र ते काहीच बोलले नाहीत. इंदूर येथे जाण्याच्या ४ दिवस आधी एक व्यक्ती आमचे बरेच वर्षे येणे बाकी असलेले पैसे घेऊन आली. याआधी पैसे वसुलीसाठी त्या व्यक्तीचा बराच पाठपुरावा करूनही ती पैसे देण्याचे टाळत होती. यामुळे आम्ही त्या पैशांची आशा सोडली होती. त्या व्यक्तीने योग्य वेळी आम्हाला पैसे आणून दिले. ते पैसे मिळाल्यामुळे मला इंदूर येथे जाता आले. ती माझ्यासाठी एक मोठी अनुभूती होती. मी सनातन संस्थेत आल्यावर ही माझी पहिली अनुभूती होती.

३ इ २. इंदूर येथील आश्रम म्हणजे वैकुंठ असल्यासारखे वाटणे, प.पू. भक्तराज महाराज यांच्या दर्शनानंतर सनातन सोडून अन्यत्र कुठेही न जाण्याचे ठरवणे ः इंदूर येथील आश्रमात गेल्यावर मला तो वैकुंठ असल्यासारखे वाटत होते. मी प.पू. भक्तराज महाराज यांचे दर्शन घेण्यासाठी रांगेत उभे राहिले. तेव्हा त्यांना बघून माझ्या मनात ‘हे कसले महाराज ! यांनी भगवे कपडे घातले नाहीत. हा एक साधा माणूस आहे’, असा विचार आला. माझ्यापुढे एक व्यक्ती त्यांचे दर्शन घेण्यासाठी उभी होती. त्यांनी त्यांच्या हातातील फुले अर्पण करण्यासाठी पुढे केली. तेव्हा त्याला न बघताच प.पू. भक्तराज महाराज म्हणाले, ‘‘तुला चमत्कार बघायचे होते, तर इथे कशाला आलास ?’’ ती व्यक्ती थोडी गडबडल्यासारखी झाली आणि भयभीत होऊन दर्शन घेऊन गेली. हा प्रसंग बघितल्यावर माझ्या अंगावर शहारे आले आणि मनात एक प्रकारची भीती निर्माण झाली. काही वेळापूर्वी माझ्या मनातही त्यांच्याविषयी विकल्प निर्माण झाला होता. त्यासाठी मी मनातल्या मनात त्यांची क्षमायाचना केली. मी प.पू. भक्तराज महाराज यांचे दर्शन घेतले. त्या वेळी मी ठाम निश्चय केला, ‘आता मी सनातन सोडून अन्यत्र कुठेही जाणार नाही.’

४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीच्या भावामुळे आश्रमात गेल्यावर सतत भावाच्या स्थितीत रहाता येणे

परात्पर गुरु डॉ. आठवले सुखसागर येथे सत्संग घ्यायचे. त्या सत्संगाला मी जाऊ लागले. ते सत्संगाला आल्यावर ज्या ठिकाणी त्यांनी चरण ठेवले होते, तेथील धूळ मी डोक्याला लावली. माझ्या मनात ‘मला संतांचा प्रसाद ग्रहण करायला मिळाला, तर त्याचा मला पुष्कळ लाभ होईल’, असा विचार आला. त्यानंतर मी स्वयंपाकघरात हात धुण्यासाठी गेले. तेथे एका साधकाने प.पू. डॉक्टरांचे ताट धुण्यासाठी ठेवले होते. त्या ताटाला एक प्रसादाचा बारीक कण चिकटला होता. तो मी भावपूर्णरित्या ग्रहण केल्यावर माझी पुष्कळ भावजागृती झाली. आश्रमात गेल्यावर मला पुष्कळ उत्साह जाणवत असे आणि मी सतत भावाच्या स्थितीत रहात असे. त्यानंतर मला आश्रमात जेवढा उत्साह वाटत असे, तेवढाच उत्साह मला घरीही अनुभवता येत असे.

५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने अध्यात्मप्रसार आणि साधकांना मार्गदर्शन करता येणे

५ अ. मला घरचा विरोध असतांनाही जोमाने अध्यात्मप्रसार करणे ः वर्ष १९९६ ते २०१५ पर्यंत मी प्रसारसेवा केली. प्रसार करतांना दिवसेंदिवस माझा उत्साह वाढत होता. मला त्या काळात अध्यात्मप्रसार करण्यास घरचा फार विरोध होत होता; पण त्या विरोधाला न जुमानता परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने मला अधिक जोमाने प्रसार करावासा वाटत असे. त्या वेळी ‘विरोधाला सामोरे कसे जायचे ?’, याविषयी परात्पर गुरु डॉक्टर मला आतून सुचवत होते आणि त्याप्रमाणे माझ्याकडून कृती होत होती.

५ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आध्यात्मिक पातळी ६० टक्के गाठल्याचे घोषित केल्यानंतर उत्तरदायी साधकांनी साधकांना मार्गदर्शन करायला सांगितल्यावर भीती वाटणे; परंतु ‘गुरुदेवच मार्गदर्शन करणार आहेत’, असा भाव ठेवल्याने साधकांना मार्गदर्शन करता येणे : परात्पर गुरु डॉक्टरांनी मी आध्यात्मिक पातळी ६० टक्के गाठल्याचे घोषित केल्यावर उत्तरदायी साधकांनी मला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन साधकांना मार्गदर्शन करायला सांगितले. त्या वेळी मला थोडी भीती वाटली. माझ्या मनात ‘मला लिहिता, वाचता येत नाही, तर मी काय मार्गदर्शन करणार ?’, असा विचार येत होता. त्यानंतर ‘मी कोण मार्गदर्शन करणारी ? गुरुदेवच करवून घेतील’, असा भाव ठेवून मी मार्गदर्शन करत असे. त्या वेळी गुरुदेव एकेक सूत्र सुचवून माझ्याकडून बोलवून घेत होते आणि ते सूत्र सत्संगातील साधकांना आवश्यक असे. यामुळे त्या साधकांचीही भावजागृती होत असे. मी केवळ निमित्तमात्र होते. ‘मी काय बोलत आहे ?’, हे माझे मलाच कळत नव्हते, तसेच ‘सत्संगाचे २ घंटे कसे संपायचे ?’, तेही माझ्या लक्षात यायचे नाही.’ (क्रमश:)

– (पू.) श्रीमती सुमन नाईक, कपिलेश्वरी, फोंडा, गोवा. (२९.८.२०२१)