मुंबई – मुंबईत ३ सहस्र कोटी रुपयांच्या पाण्याची चोरी होत असल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. या प्रकरणाची विशेष अन्वेषण पथकाद्वारे चौकशी करण्याची मागणी शेलार यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी भूजल सर्वेक्षण आयुक्त यांना एक पत्र लिहिले आहे.
या पत्रात शेलार यांनी म्हटले आहे की, मुंबईतील विहिरींमधून पाण्याचा उपसा अनधिकृतपणे होत आहे. ज्यांनी अनधिकृतपणे पाण्याची लूट केली आहे, त्यांच्यावर गुन्हे नोंद करून कारवाई करण्यात यावी. मुंबईत १९ सहस्रांहून अधिक विहिरी असून १२ सहस्र ५०० बोअरवेल आहेत. २१६ अवैध जलविहिरींपैकी एकाच जलकुंभातून ८० कोटी रुपयांच्या पाण्याची चोरी झाल्याचे प्रसिद्धी माध्यमांतून उघड झाले आहे. त्यामुळे या प्रकरणाचे त्वरित अन्वेषण करण्यात यावे.