महाराष्ट्रातील ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्प अपूर्ण !

ऑगस्ट २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्मार्ट सिटी’ (अद्ययावत सोयीसुविधा असलेले शहर) या महत्त्वाकांक्षी योजनेमध्ये महाराष्ट्रातील १० शहरांचा समावेश केल्याची घोषणा केली. तेव्हा शहरी जीवनाच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करणे, स्वच्छ पर्यावरण सोयी उपलब्ध करणे, वाहतूक व्यवस्था आधुनिक बनवणे आणि स्थानिक भागांचा विकास अन् तांत्रिकदृष्ट्या समर्थ बनवणे, अशी उद्दिष्टे घेतली होती; मात्र ही उद्दिष्टे साध्य होणार का ? ‘स्मार्ट सिटी’ केव्हा निर्माण होईल ? अशी शंका येईल, एवढेच काम या ५ वर्षांमध्ये झालेले आहे, हे गंभीर आणि प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. गेल्या ५ वर्षांमध्ये ‘स्मार्ट सिटी’च्या दृष्टीने दाखवण्यासारखे कोणतेही काम पूर्ण न होणे म्हणजे कामात कुठेतरी पाणी मुरत आहे का ? असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?

‘ठाणे स्मार्ट सिटी’मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार होत आहे. महापालिकेच्या ताब्यात जागा नसतांनाही, तसेच अनेक ठिकाणी कामांची निविदा निघूनही कामे अधर्वट असून तीही कामे निकृष्ट दर्जाची होतांना दिसून येत आहेत. ‘पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी’मधील कामांत तब्बल २५० कोटी रुपयांच्या कामाला ‘तांत्रिक मान्यता’ घेतली नसल्याचे समोर येत आहे. सर्व कामांची चौकशी करण्याची वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून त्याची नोंद घेतली जात नाही, असा नागरिकांचा आरोप आहे. ‘नाशिक स्मार्ट सिटी’च्या विविध ठिकाणी चालू असलेल्या कामांमध्ये अनियमितता असून प्रकल्पांचे काम कुठपर्यंत आले आहे, याची माहिती देण्यासही अधिकारी टाळाटाळ करत आहेत. सर्व प्रकल्प संथ गतीने चालू असून त्यातून पैशांची उधळपट्टीच होत आहे. ही काहीच उदाहरणे येथे दिली आहेत. अशी स्थिती राज्यातील सर्वच म्हणजे १० शहरांतील (‘स्मार्ट सिटी’तील) प्रकल्पांची आहेत.

कोणतेही काम दर्जाप्रमाणे केले जात नाही आणि जी कामे झाली, ती बहुतेक वरवरची अन् रंगरंगोटीची अधिक असलेली दिसून येतात. विकासकामांऐवजी भ्रष्टाचार, दिरंगाई, अनागोंदी कारभार यांमुळे ‘स्मार्ट सिटी’ प्रत्यक्षात अनुभवण्याऐवजी चर्चेचा विषय होत आहे, हे दुर्दैवी आहे. नागरिकांकडून मिळालेल्या कररूपी निधीचा उपयोग करून त्याचा जनतेला लाभ व्हावा, ही जनतेची माफक अपेक्षाही पूर्ण होत नसेल, तर ‘हिंदु राष्ट्र आणण्याविना पर्याय नाही’, असे जनतेला वाटल्यास चूक ते काय ? देशाची सर्व स्थिती पहाता जनतेने आता हिंदु राष्ट्र आणण्यासाठी प्रयत्न करावेत.

– श्री. अमोल चोथे, पुणे