‘माय लॉर्ड’, ‘योर लॉर्डशिप’ ‘योर ऑनर’ शब्दांचा वापर टाळा !

ओडिशा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशांची अधिवक्त्यांना सूचना

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांत अशा प्रकारचे शब्द अद्यापही वापरले जाणे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद ! आतातरी शासनकर्त्यांनी हे शब्द कायमस्वरूपी हटवण्यासाठी, तसेच न्यायालयातील अधिवक्ते आणि न्यायाधीश यांचा पोषाख पालटून तो भारतीय करण्याचा प्रयत्न केला पाहिजे ! – संपादक

ओडिशा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एस्. मुरलीधर

भुवनेश्‍वर (ओडिशा) – ओडिशा उच्च न्यायालयातील न्यायाधिशांना ‘माय लॉर्ड’ (स्वामी अथवा ‘सर’), ‘योर लॉर्डशिप’ (प्रभुत्व असलेल्या व्यक्तीला नमन), ‘योर ऑनर’ (सन्मानित व्यक्तीला नमन), ‘ऑनरेबल’ (माननीय) अशा शब्दांचा वापर करू नये, अशी सूचना उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एस्. मुरलीधर यांनी अधिवक्त्यांना केली आहे. या शब्दांच्या ऐवजी ‘सर’ किंवा अन्य पर्यायी शब्द वापरू शकतो, असेही न्यायाधिशांनी म्हटले आहे. अशा प्रकारचा नियम नसल्याने न्यायालय थेट आदेश देऊ शकत नसल्याने याला सूचनेच्या स्तरावरच पाहिले जात आहे.

१. यापूर्वी वर्ष २०२० मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी एका अधिवक्त्याला ‘योर ऑनर’ असा शब्द वापरल्यावरून रोखले होते. ‘तुम्ही अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात युक्तीवाद करत आहात का ? ‘योर ऑनर’चा वापर तेथील सर्वोच्च न्यायालयात होतो, भारताच्या नाही’, असे सरन्यायाधीश बोबडे यांनी म्हटले होते.

२. वर्ष २०२० मध्ये कोलकाता उच्च न्यायालयाचे तत्कालीन मुख्य न्यायाधीश थोट्टाथिल बी. नायर राधाकृष्णन् यांनी बंगाल, तसेच अंदमान आणि निकोबर येथील न्यायालयीन अधिकार्‍यांना अन् अधिवक्त्यांना ‘माय लॉर्ड’ अथवा ‘लॉर्डशिप’ याऐवजी ‘सर’ असे म्हणण्याचे आवाहन केले होते.