फोंडा (गोवा) येथील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. प्रताप कापडिया (वय ७२ वर्षे) यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यावर रुग्णालयात आलेले अनुभव आणि अनुभूती !

‘३ ते २३.४.२०२१ या कालावधीत मी (श्री. प्रताप कापडिया) पुणे येथे असतांना कोरोनामुळे रुग्णाईत होतो. १५ दिवस मला रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्या कालावधीत मला आलेले अनुभव आणि देवाने दिलेल्या अनुभूती देवाच्या चरणी अर्पण करतो. (भाग १)

प्रातिनिधिक छायाचित्र

१. ताप आल्यावर तो न उतरणे, कोरोना चाचणीचा अहवाल ‘निगेटिव्ह’ आल्यानंतरही ताप येणे आणि मुलाने ही ‘कोविड न्यूमोनिया’ची लक्षणे असल्याचे सांगणे

श्री. प्रताप कापडिया

२ ते २३.४.२०२१ या कालावधीत मी पुणे येथे असतांना मला काही दिवस ताप येत होता. माझा मुलगा उज्ज्वल आधुनिक वैद्य (डॉक्टर) असल्याने त्याने मला गोळ्या दिल्या; पण माझा ताप उतरत होता आणि पुन्हा येत होता. नंतर मला खोकलाही येऊ लागला. माझा कोरोना चाचणीचा अहवाल ‘निगेटिव्ह’ आला. नंतरही मला ताप येत होता. तेव्हा उज्ज्वल म्हणाला, ‘‘ही ‘कोविड न्यूमोनिया’ची (covid-pneumonia ची) लक्षणे आहेत.’’

२. रक्तातील प्राणवायूचे प्रमाण न्यून झाल्यावर ते वाढण्यासाठी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला नामजप कुटुंबियांनी १ घंटा केल्यावर प्राणवायूचे प्रमाण ३ टक्क्यांनी वाढणे

८.४.२०२१ या दिवशी रात्री १.३० वाजता माझ्या अंगात ताप होता आणि माझ्या रक्तातील प्राणवायूचे प्रमाण ८९ झाले होते.  (‘सर्वसाधारण व्यक्तीच्या रक्तातील प्राणवायूचे प्रमाण ९५ टक्क्यांपेक्षा जास्त असते.’ – संकलक) माझी पत्नी (सौ. देवी कापडिया, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) आणि मुलगी (कु. भाविनी कापडिया, आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) यांनी माझ्या रक्तातील प्राणवायूचे प्रमाण वाढण्यासाठी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला नामजप १ घंटा केला. त्या वेळी माझ्या रक्तातील प्राणवायूचे प्रमाण ३ टक्क्यांनी वाढले; पण ते ९२ टक्क्यांच्या पुढे जात नव्हते. माझा ताप उतरण्यासाठी कुटुंबियांनी माझ्या कपाळावर मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या; पण माझा ताप उतरायचा आणि थोड्या वेळाने मला पुन्हा ताप यायचा.

३. साधकाला रुग्णालयात भरती करण्याचे ठरवल्यावर आलेल्या अडचणी आणि जाणवलेली सूत्रे

३ अ. घराजवळच्या सर्व रुग्णालयांत संपर्क केल्यावर कुठेच खाटा उपलब्ध नसल्याने घरापासून दूर असलेल्या रुग्णालयात भरती करण्याचे ठरवणे : ९.४.२०२१ या दिवशी पहाटे ५.४५ वाजता उज्ज्वलने मला रुग्णालयात न्यायचे ठरवले. त्याने सकाळी ६ ते ८ या कालावधीत घराजवळच्या सर्व रुग्णालयांत संपर्क केला; परंतु कुठेच खाटा उपलब्ध नव्हत्या. एका रुग्णालयात ३ – ४ वेळा भ्रमणभाष केल्यावर प्रत्येक वेळी तेथील कर्मचारी ‘थोड्या वेळात कळवतो’, असेच उत्तर देत होते. ते रुग्णालय घरापासून २० कि.मी. दूर असल्याने ते शेवटचा पर्याय म्हणून ठेवले होते. शेवटी मला त्या रुग्णालयात भरती करायचे ठरले.

३ आ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे ‘देव सतत तुमच्या समवेत आहे’, हे वाक्य आठवल्यावर ‘दूरच्या रुग्णालयात भरती व्हावे लागणे’, हे देवाचेच नियोजन आहे’, हे लक्षात येणे आणि मनातील नकारात्मक विचार नाहीसा होणे : घरापासून दूर असलेल्या रुग्णालयात भरती होण्याची माझी इच्छा नव्हती. माझ्या मनात विचार आले, ‘रुग्णालय घरापासून दूर असल्यास उज्ज्वलला तेथेच रहावे लागेल. घर दूर असल्याने साधकांना माझ्यासाठी जेवण पाठवायला लागेल.’

काही दिवसांपूर्वी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी एका प्रसंगात उज्ज्वलला संपर्क केला असता त्यांनी त्याला ‘तू कसा आहेस ?’, असे विचारले होते. तेव्हा उज्ज्वलने त्यांना सांगितले होते, ‘‘बाबांना ताप येत असून तो उतरत नाही; म्हणून मला जरा काळजी वाटते.’’ त्या वेळी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सांगितले, ‘‘देव सतत तुमच्या समवेत आहे. काळजी करायला नको.’’

वरील प्रसंग आठवल्यावर मला वाटले, ‘मी कुठल्या रुग्णालयात भरती व्हायचे ?’, हेही देवानेच ठरवले आहे; कारण तो माझ्या समवेत आहे. ‘ते रुग्णालय दूर आहे, तर कसे होणार ?’, असा विचार मी करायला नको.’

४. रुग्णालयातील अनुभव

४ अ. मुलाने ओळखीच्या आधुनिक वैद्यांना संपर्क करून वडिलांच्या स्थितीविषयी सांगितल्यावर आपत्कालीन विभागातील आधुनिक वैद्यांनी त्यांना लगेच भरती करून घेणे : ९.४.२०२१ या दिवशी सकाळी मला रुग्णालयात भरती करण्यात आले. ‘कोविड बाह्य रुग्ण तपासणी विभाग’ दुसर्‍या इमारतीत २०० ते ३०० मीटर अंतरावर होते. मला एवढे चालणे शक्य नव्हते; म्हणून उज्ज्वलने त्याच रुग्णालयातील त्याच्या एका ओळखीच्या वरिष्ठ आधुनिक वैद्यांना भ्रमणभाष करून माझी स्थिती कळवली. तेव्हा त्यांनी आपत्कालीन विभागातील आधुनिक वैद्यांना भ्रमणभाष करून मला लगेच तेथे भरती करून घ्यायला सांगितले. त्या वेळी मला वाटले, ‘उज्ज्वल आधुनिक वैद्य असल्याने तो ‘या स्थितीत मी चालायला नको’, असा निर्णय घेऊ शकला. अन्य वयस्कर आणि कोरोना झालेले रुग्ण एवढे दूर कसे जात असतील ?’

४ आ. कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता असलेल्या विभागात न ठेवता सर्व तपासणी होईपर्यंत वेगळ्या खोलीत ठेवणे आणि तपासणी झाल्यावर ‘कोविड न्यूमोनिया’ झाल्याचे निदान होणे : कोरोनाविषयक आपत्कालीन (कॅज्युअल्टी) विभागातील आधुनिक वैद्य मला तपासायला आले. त्यांना वाटले, ‘मला ‘इमरजन्सी’ (कोविड असण्याची शक्यता असलेल्या) वॉर्डमध्ये न ठेवता सर्व तपासणी होईपर्यंत वेगळे ठेवायला हवे.’ त्यामुळे त्यांनी मला एका वेगळ्या खोलीत ठेवले होते. माझ्या खोलीच्या जवळच परिचारिकांची एकत्रित बसण्याची जागा होती. त्यामुळे खोलीतून हाक मारल्यास कुणीही साहाय्याला येऊ शकेल, असे होते. खोली मोठी असल्याने उज्ज्वल माझ्यापासून दूर अंतरावर बसू शकत होता. दीड दिवसाने माझे ‘सी.टी. स्कॅन’ झाले. त्यात मला ‘कोविड न्यूमोनिया’ झाल्याचे निदान झाले.’ (क्रमशः)

-श्री. प्रताप कापडिया (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), फोंडा (गोवा)

भाग २ वाचा पुढील मार्गिकेवर : https://sanatanprabhat.org/marathi/541196.html

 येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक