तब्बल १७ गुन्ह्यांची नोंद असलेला इचलकरंजी येथील माजी नगरसेवक संजय तेलनाडेला अटक : ५ दिवस पोलीस कोठडी

इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर), २ जानेवारी – हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी असे १७ विविध प्रकारचे गुन्हे नोंद असलेला आणि गेल्या अडीच वर्षांपासून पसार असलेला माजी नगरसेवक संजय तेलनाडे याला कोल्हापूर पोलिसांनी पुण्यात १ जानेवारी या दिवशी अटक केली. त्याला २ जानेवारी या दिवशी न्यायालयात उपस्थित केले असता ५ दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे. (इतके गंभीर गुन्हे असणारी व्यक्ती नगरसेवक पदावर होती, हे यंत्रणेला लज्जास्पद ! – संपादक)

माजी नगरसेवक संजय तेलनाडे हा ‘एस्.टी. सरकार गँग’ नावाच्या टोळीने संघटित गुन्हेगारी करत असे. संजय तेलनाडे आणि त्याचा भाऊ माजी नगरसेवक सुनील तेलनाडे यांच्यावर पोलिसांनी १८ मे २०१९ या दिवशी ‘मोक्का’खाली गुन्हा नोंद केला होता. गुन्हा नोंद होताच तेलनाडे बंधू पसार झाले. तेलनाडे यांनी सर्वाेच्च न्यायालयापर्यंत जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न केले; मात्र यात यश आले नाही. १ जानेवारी या दिवशी संजय तेलनाडे हा पुण्यातील आंबेगाव येथे येणार आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर कोल्हापूर पोलिसांच्या पथकाने पुणे पोलिसांच्या सहकार्याने त्याला आंबेगाव येथे अटक केली. सुनील तेलनाडे हा अद्याप पसारच असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. संजय तेलनाडे याला अटक करणार्‍या पथकातील पोलीस अधिकार्‍यांना कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी ३५ सहस्र रुपयांचे बक्षीस घोषित केले आहे.