इंडियन मेडिकल असोसिएशन, जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ, नेहरू स्मृती संग्रहालय आदींचा समावेश
नवी देहली – देशातील ६ सहस्र संस्थांचा परदेशी देणगी परवाना रहित करण्यात आला आहे. यांत इंडियन मेडिकल असोसिएशन, जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ, आयआयटी देहली, नेहरू स्मृती संग्रहालय अन् ग्रंथालय आदींचा समावेश आहे. मदर तेरेसा यांच्या संस्थेसह अन्य १७९ संस्थांचे परवाना नूतनीकरणाचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत, तर अन्य अर्जांची पडताळणी चालू आहे. परवाना रहित झालेल्यांपैकी काही संस्थांनी त्यांच्या परदेशी देणगी नियमन (एफ्.सी.आर्.ए. – ‘फॉरेन कंट्रीब्युशन रेग्युलेशन अॅक्ट’) परवान्याच्या नूतनीकरणासाठी अर्ज केले नसावेत किंवा केंद्रीय गृहमंत्रालयाने त्यांचे अर्ज फेटाळले तरी असावेत, अशी शक्यता सरकारी अधिकार्यांनी व्यक्त केली. परदेशी देणग्यांसाठी कोणत्याही अशासकीय संस्था आणि संघटना यांना ‘एफ्.सी.आर्.ए.’ नोंदणी करणे अनिवार्य आहे. ‘एफ्.सी.आर्.ए.’ कायद्यानुसार नोंदणीकृत अशासकीय संस्था (एन्.जी.ओ. – नॉन गर्व्हमेंटल ऑर्गनायझेशन) आणि त्यांच्या सहकारी संस्था यांचे प्रकल्प अन् कार्यक्रम यांचे नियमन केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने करण्यात येते.
Oxfam India, Jamia Millia Islamia among close to 6,000 NGOs who lost their FCRA license after not applying for renewalhttps://t.co/ayMKgdCIjj
— OpIndia.com (@OpIndia_com) January 1, 2022
१. एफ्.सी.आर्.ए.नुसार ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत २२ सहस्र ७६२ संस्था नोंदणीकृत होत्या; परंतु १ जानेवारी २०२२ या दिवशी नोंदणीकृत संस्थांची संख्या १६ सहस्र ८२९ वर आली; कारण ५ सहस्र ९३३ संस्थांची नोंदणी रहित झाली. त्यांपैकी ५ सहस्र ७८९ संस्थांनी परवाना नूतनीकरणासाठी अर्जच केला नव्हता, असा दावा सरकारी अधिकार्यांनी केला.
२. ‘मुदत संपण्याआधी संस्थांना परवाना नूतनीकरणाविषयीची स्मरणपत्रे पाठवण्यात आली होती; परंतु ३१ डिसेंबरपर्यंत अनेक संस्थांनी अर्ज केले नव्हते. त्यामुळे त्यांना अनुमती कशी देणार ?’, असा प्रश्न संबंधित अधिकार्यांनी केला.
३. अर्ज फेटाळलेल्या किंवा परवाना रहित झालेल्या संस्थांमध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र, भारतीय लोक प्रशासन संस्था, लाल बहादूर शास्त्री मेमोरियल फाऊंडेशन, लेडी श्री राम कॉलेज फॉर वूमन, देहली कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, ऑक्सफॅम इंडिया इत्यादी संस्थांचा समावेश आहे.
४. मेडिकल काऊंसिल ऑफ इंडिया (एम्.सी.आय.), देशभर १२ पेक्षा अधिक रुग्णालये चालवणारी इमॅन्युएल हॉस्पिटल असोसिएशन, विश्व धर्मायतन, महर्षि आयुर्वेद प्रतिष्ठान, नॅशनल फेडरेशन ऑफ फिशरमेन कोऑपरेटिव्हज लिमिटेड, इंडिया इस्लामिक कल्चरल सेंटर, गोदरेज मेमोरियल ट्रस्ट, देहली पब्लिक स्कूल सोसायटी आदींचा समावेश नोंदणी रहित झालेल्या संस्थांमध्ये आहे.