(म्हणे) ‘हिंदुत्वनिष्ठ नेत्यांच्या भडकाऊ विधानांचा निषेध करावा !’

  • हिंदुत्वनिष्ठांनी धर्मसंसदेत केलेल्या भाषणांचे प्रकरण

  • देशातील १०० हून अधिक मान्यवरांचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना पत्र !

  • या मान्यवरांनी कधी ‘१५ मिनिटांसाठी पोलिसांना बाजूला केल्यास १०० कोटी हिंदूंना पाहून घेऊ’ अशी धमकी दिल्यावर राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना पत्र लिहिले होते का ? – संपादक
  • मुसलमानेतर आणि विशेषकरून हिंदू यांच्या विरोधात गरळओक करून अनेकांना आतंकवादी कृत्ये करण्याची चिथावणी देणार्‍या अन् अशा अनेक हत्यार्‍या आतंकवाद्यांचे प्रेरणास्थान असणार्‍या झाकीर नाईक याच्या विरोधात कधी या मान्यवरांनी निषेधाचा एक शब्दतरी उच्चारला आहे का ? – संपादक
  • शुक्रवारच्या नमाजानंतर मशिदींमधून इमामांकडून केल्या जाणार्‍या जिहादी विचारांच्या भाषणांविषयी या मान्यवरांनी कधी पोलिसांना तरी पत्र लिहिले आहे का ? अशा भाषणांवरूनच फ्रान्समध्ये मशिदींना टाळे ठोकले जात आहे ! – संपादक
  • ‘अल्ला हू अकबर’ (अल्ला महान आहे) अशा घोषणा देऊन हिंदूंच्या मंदिरांवर, तसेच हिंदूंवर आक्रमण करणार्‍यांच्या विरोधात या मान्यवरांनी असे पत्र कधी लिहिले आहे का ? – संपादक
  • काश्मीरमध्ये ३ दशकांपूर्वी हिंदूंचा वंशसंहार करून त्यांना पलायन करण्यास बाध्य केल्याच्या प्रकरणी या मान्यवरांनी कधी तोंडातून ‘ब्र’देखील उच्चारला आहे का ? – संपादक
  • खिस्ती मिशनर्‍यांकडून आदिवासी आणि गरीब हिंदू यांचे आमिष दाखवून होत असलेले धर्मांतर रोखण्याविषयी या मान्यवरांनी कधी आवाज उठवला आहे का ? – संपादक

नवी देहली – हिंदुत्वनिष्ठ नेत्यांनी हरिद्वार, रायपूर आदी ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांमध्ये मुसलमानांविषयी द्वेष पसरवणारी विधाने केली आहेत. हिंसाचाराला प्रोत्साहन देणार्‍या अशा भडकाऊ वक्तव्यांचा जाहीर निषेध करावा, तसेच दोषी व्यक्तींवर कडक कारवाई करावी, असे पत्र ५ माजी नौदल आणि वायूदल प्रमुख यांच्यासह १०० मान्यवरांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद अन् पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे. यांमध्ये माजी नौदलप्रमुख एल्. रामदास, विष्णु भागवत, अरुण प्रकाश, आर्.के. धोवान; माजी वायूदलप्रमुख एस्.पी. त्यागी, तसेच माजी सनदी अधिकारी, पत्रकार, अधिवक्ता, अर्थतज्ञ आदींचाही समावेश आहे.

या पत्रात म्हटले आहे की,

१. हरिद्वार येथे झालेल्या ३ दिवसीय धर्मसंसदेत हिंदुत्वनिष्ठ नेते आणि साधू-संत यांनी जी प्रक्षोभक भाषणे केली, त्याचा आम्ही निषेध करतो. या नेत्यांनी ‘भारतात हिंदु राष्ट्र स्थापन करायचे असून ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रसंगी हत्यारे बाळगा’, ‘हिंदुत्वाचे संरक्षण करण्यासाठी विशिष्ट समुदायाचे शिरकाण करा’, अशी वक्तव्ये केली.

२. ‘म्यानमारप्रमाणे पोलीस, सैन्य आणि प्रत्येक हिंदु यांनी हत्यारे बाळगावीत अन् एका समुदायाचा नरसंहार करावा’, असे उद्गार हिंदु रक्षा सेनेचे स्वामी प्रबोधानंद यांनी धर्मसंसदेत काढले होते.

३. देशाच्या सीमेवर सध्या तणावग्रस्त स्थिती आहे. अशा स्थितीत देशात काही मंडळी करत असलेल्या भडकाऊ वक्तव्यांमुळे बाह्य शक्तींना हातात आयते कोलीत मिळू शकेल. पोलीस असो वा सैन्य त्यांच्यामध्ये असलेल्या ऐक्याच्या भावनेला चिथावणीखोर भाषणांमुळे तडा जाऊ शकतो. त्यामुळे या सर्व प्रकारांकडे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतिशय गांभीर्याने पहाण्याची आवश्यकता आहे.