मुंबई – राज्यात ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबई शहरातील काही भागांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ११ टक्के झाली आहे. त्यामुळे राज्यभरात निर्बंधाची कठोर कार्यवाही केली जाईल. हे निर्बंध वाढवलेही जाऊ शकतात; मात्र सध्याच्या घडीला राज्य सरकार दळणवळण बंदीचा कोणताही विचार करत नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी १ जानेवारी या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना दिली.
मंत्री टोपे पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या बैठकीत याविषयी सविस्तर चर्चा झाली. दळणवळण बंदीचा परिणाम हा अर्थकारणावर होतो. गरिबांना त्याचा फटका बसतो. त्या वेळी तूर्तास दळणवळण बंदी लागणार नाही. मुंबई शहरातील कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. राज्यात १ जानेवारी या दिवशी नवीन कोरोनाच्या रुग्णांचा आकडा १२ ते १५ सहस्रांवर जाण्याची शक्यता आहे. गेल्या २ दिवसांमध्ये कोरोनाच्या रुग्णांचा आकडा दुप्पट झाला आहे. मुंबई, ठाणे आणि रायगड या परिसरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या भागांमध्ये बेड आणि ऑक्सिजन यांची उपलब्धता पाहून पुढील निर्णय घेतले जातील. राज्यात जेव्हा ७०० मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता भासू लागेल, तेव्हा आपोआपच दळणवळण बंदी लागेल.