जम्मूच्या वैष्णोदेवी मंदिर परिसरात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये १२ जणांचा मृत्यू

वैष्णोदेवी मंदिराचे सरकारीकरण झालेले असतांनाही तेथे अशा प्रकारची घटना घडते, हे प्रशासनाला लज्जास्पद ! हिंदूंच्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्री अशा घटना सातत्याने घडूनही त्यावर ठोस उपाययोजना न काढणारे व्यवस्थापन काय कामाचे ? – संपादक

जम्मू (जम्मू-काश्मीर) – कटरा येथील वैष्णौदेवी मंदिर परिसरामध्ये भाविकांमध्ये रात्री २.४५ च्या सुमारास झालेल्या चेंगराचेंगरीत १२ जणांचा मृत्यू झाला, तर २० जण घायाळ झाले. ही चेंगराचेंगरी मंदिराच्या गर्भगृहाबाहेर प्रवेशद्वार क्रमांक ३ जवळ झाली. चेंगराचेंगरीनंतर यात्रा काही काळासाठी स्थगित करण्यात आली होती; मात्र आता ती चालू करण्यात आली आहे.

१. काही प्रत्यक्षदर्शींच्या मते दगड पडल्याच्या अफवेमुळे ही चेंगराचेंगरी झाली, तर ‘दोन गटांत झालेल्या वादातून ही चेंगराचेंगरी झाली’, असेही म्हटले जात आहे. तसेच माता वैष्णौदेवी भवन मार्गावर पुष्कळ गर्दी होती. ही गर्दी पाहूनच भीती निर्माण होत होती. त्यातूनच ही चेंगराचेंगरी झाली, असेही काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

२. लोकांनी सांगितले, ’यामध्ये प्रशासनाचीही चूक आहे. जेव्हा गर्दी होत होती, तेव्हा त्यांनी लोकांना अडवले का नाही ?’

३. एका भक्ताने सांगितले, ‘दर्शनासाठी एवढ्या पावत्या का फाडण्यात आल्या ? प्रमाणापेक्षा अधिक पावत्या फाडल्या गेल्यामुळे गर्दी होऊन ही दुर्घटना घडली.’

४. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले, ‘माता वैष्णौदेवी मंदिर परिसरात काही भाविक दर्शन घेतल्यानंतर तिथेच थांबले. त्यामुळे तिथे गर्दी झाली. तसेच लोकांना बाहेर पडण्यासाठी जागा मिळेना. अरुंद अशा मार्गातून जागेत लोक येत जात होते. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली.’